कोरोनाविरुद्धच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलची नेत्रदीपक कामगिरी

कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या 87 वयाच्या वृद्धासह 6 जणांना डिस्चार्ज; कराडसह वाळवा, कडेगाव तालुक्याला दिलासा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलची नेत्रदीपक कामगिरी

कराड / प्रतिनिधी 

रोज नवनव्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याच्या बातम्यांमुळे भयग्रस्त व हवालदिल झालेल्या कराड तालुकावासीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. आज कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 6 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, यामध्ये 87 वर्षीय वृद्धाचा आणि 3 वर्षीय बालकाचाही समावेश आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 12 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, कोरोनाविरुद्धच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलकडून होत असलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

सर्दी, ताप अशी लक्षणे असलेली आगाशिवनगर येथील 87 वर्षीय वृद्ध व्यक्ती, तसेच मूळ कडेगाव तालूक्यातील येतगाव येथील पण सध्या आगाशिवनागर येथे राहणारा 33 वर्षीय युवक, वनवासमाची येथील 3 वर्षीय मूल आणि 57 वर्षीय गृहस्थ, तसेच रेठरे बुद्रुक येथील 42 वर्षीय गृहस्थ आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील 48 वर्षीय गृहस्थ यांना 23 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमधील विशेष कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्स करत असलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफकडून घेतल्या जात असलेल्या विशेष काळजीमुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून तांबवे, म्हारुगडेवाडी, डेरवण, ओगलेवाडी, बाबरमाची, चरेगाव येथील 6 कोरोनामुक्त रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज करण्यात आले. यात सातत्य राखत कृष्णा हॉस्पिटलमधील यशस्वी उपचारामुळे आज आणखी 6 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. 

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन, कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीपणे लढल्याबद्दल कोरोनामुक्त रुग्णांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. 

यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की सध्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 40 हुन जास्त कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, हे सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आमचे सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ प्रयत्न करत आहेत. यापैकी बऱ्यायशा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. भविष्यात दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढली तरी त्या रुग्णांना सामावून घेऊन, त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यास आमची यंत्रणा सक्षम आहे.

यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

'कृष्णा'च्या डॉक्टरांमुळेच मी झालो बरा..!

आज जवळपास 87 वर्षे झाली, मला कसला आजार नाही की कसली गोळी! पण या कोरोनाच्या आजारामुळेच आज इतके दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. या 15 दिवसात कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व लोकांनी मला बरं करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. माझ्यासाठी त्यांनी दिलेल्या या सेवेचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कृष्णा हॉस्पिटलचा सक्षम स्टाफ असल्याने लोकांनी कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही. पण सर्वांनी स्वतःची योग्य काळजी घ्यावी, अशा आत्मविश्वासपूर्ण शब्दांत  आगाशिवनगर येथील 87 वर्षीय कोरोनामुक्त वृद्ध गृहस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

'कृष्णा'च्या प्रयोगशाळेत 'कोविड-19'च्या चाचण्यांना प्रारंभ

नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने कृष्णा हॉस्पिटलला 'कोविड-19'च्या चाचण्या करण्यास परवानगी दिली असून, गेल्या 2 दिवसांपासून या चाचण्यांना प्रारंभ करण्यात आला आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या 'मोल्युक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक्स' विभागामार्फत या चाचण्या केल्या जात असून, दररोज किमान 40 स्वॅबची चाचणी करण्याची क्षमता येथे उपलब्ध करण्यात आली आहे.