'जनरल पब्लिक'ची कराड महसूल मध्ये फरफट

सरळमार्गी माहिती मिळणे दुरापास्तच

'जनरल पब्लिक'ची कराड महसूल मध्ये फरफट

'जनरल पब्लिक'ची कराड महसूल मध्ये फरफट

सरळमार्गी माहिती मिळणे दुरापास्तच


रावसाहेबांच्या दृष्टीने 'जनरल पब्लिक'ला महसूल प्रशासनाची माहिती देण्यास संकोच वाटत असल्याने सर्वसाधारण माहितीसाठी दरवेळी'माहिती अधिकाराचा'पर्याय वापरावा लागणे हे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने चुकीची बाब असून लोकशाहीत प्रशासनाने जनतेसाठी केलेले कार्य,कारवाया या सर्वांसाठी खुल्या असल्या पाहिजेत.कराड तालुका म्हणजे क्रीम पोस्टिंग याची जाण महसूल प्रशासनातील अण्णासाहेब ते रावसाहेब या सर्वानाच आहे.यामुळे कृष्णा,तारळी, कोयना,मांड नदीकाठ अशी अलिखित वर्गवारीची प्रथा महसूलमध्ये रूढ झाली आहे तलाठी व सर्कल यांनी आपली 'जहागिरी' असल्यासारखे काही भागांवर 'वतनदारी' पक्की केली असून रावसाहेबांना त्यांची 'वरदक्षणा'पोहोच झाला की मोहीम फत्ते झाले अशी धारणा बहुतांश अण्णासाहेब,रावसाहेब यांची झाली असल्याने शासन घाटयात तर कर्मचारी तोऱ्यात वावरू लागले आहेत.यामुळे माहितीसाठी जनरल पब्लिकची फरफट होत आहे.

नाममात्र गौणखनिज उपशाची रीतसर परवानगी घेऊन,रॉयल्टी चलन भरून वारेमाप मुरूम व गौण खनिज उपसा करण्याची सवय महसूल मधील कर्मचाऱ्यांनीच ठेकेदारांना लावली असल्याची चर्चा आहे वास्तवित पाहता गौण खनिज उपशाची कोणतेही सोपस्कार व नियमावलीची पडताळणी महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी करीत नाहीत. चिरीमिरी उकळण्यासाठी कारवाईचा बागुलबुवा तयार करून आपले खिसे गरम करण्याचे काम अंगवळणी पडले असून यामुळे शासनाला महसुलाला मुकावे लागत असल्याची चर्चा आहे.

कराड उत्तर मध्ये बऱ्याच ठिकाणी कोणतीही रॉयल्टी न भरता अमर्याद मुरूम तसेच गौणखनिज उपसा झाला असून काही ठिकाणी अत्यल्प रॉयल्टी भरून हजारो ब्रास मुरूम उपसा बेकायदेशीर पणे केला असल्याची चर्चा आहे यामधील बहुतांश ठिकाणांची चर्चा जोरात असून याबाबतची सविस्तर बातमी दै.प्रीतिसंगांच्या माध्यमातून  लेखमालेत विस्तृत स्वरूपात वेळोवेळी प्रसिद्ध प्रसिद्ध केलेली आहे.यामध्ये महसूल विभागाचे जाणूनबुजून झालेले दुर्लक्ष अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांच्या पथ्यावर पडले असून चिरीमिरीसाठी डोंगराच्या टेकड्या भुईसपाट करण्याची सुपारी काही जणांनी घेतली आहे.यासाठी महसूल प्रशासन 'येड पांघरून पेड गाव'ला जात असल्याने गौण खनिजांची अमर्याद लूट करून मालामाल झालेल्यांचा पर्दाफाश होणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

कराड दक्षिण मतदार संघात उंडाळे, कासारशिरंबे,संजयनगर शेरे,तांबवे,शेणोली भागातून अमर्याद गौणखनिज उपसा झाला असून नावापुरते चलन शासन दप्तरी दाखल केले आहे.दै प्रितिसंगमच्या वृत्त मालिकेनंतर काही जणांनी वाढीव रकमेचे चलन भरल्याची चर्चा आहे.परंतु हे म्हणजे 'वराती मागणं घोडं'असा प्रकार असल्याची चर्चा आहे. वाळूपेक्षा मोठा घोळ या मुरूम उत्खननात झाला असून महसूल विभागाने चिरीमिरी साठी आपले लक्ष इतर गौण खनिजाकडे केंद्रित केल्याने कराड तालुक्यातील मुरूम उत्खननांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढणार असून बराच काळ दुर्लक्षित राहिलेला मुरूम,दगड,व माती घोटाळ्याकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष दिले तर अनेक बड्या धेंडांसह महसूल कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा बुरखा फाटणार असून यामुळे शासनाला महसूल स्वरूपात मोठी रक्कम मिळेल अशी खळबळजनक चर्चाच तालुक्यातील जनतेत आहे.

यामुळे कराड तालुक्यातील अवैध गौणखनिज उपशाकडे जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी स्वतः लक्ष देऊन महसूल प्रशासनामधील जिल्ह्यासह तालुक्यातील झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला पाहिजे तरच बोकाळलेले महसूल प्रशासन ताळ्यावर येईल अन्यथा निसर्गाने नटलेला कराड तालुका अधिकारी व कर्मचाऱ्यांची घरे भरण्यासाठी कायमच कुरतडला जाईल.जनतेसाठी नाही तर किमान माजी मुख्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री यांचा तालुका म्हणून तरी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

 

कुळकायदा विभाग चर्चेत

भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी कुळकायदा विभागाच्या परवानगी शिवाय भोगवटादार वर्ग एक होत नाहीत ही परवानगी जमीन विक्री अथवा हक्क तबदिल करताना अत्यावश्यक असते परंतु यावेळी चालणारे झोल हे गुपचूप सुरू असतात कारण विकणारा अडचणीत तर घेणार गब्बर असतो यामुळे 'तेरी भी चूप मेरी भी चूप'च्या खेळात कुळकायदा शाखा आपला हात साफ करत असल्यची चर्चा आहे..या शाखेतील अनेक केसेसच्या सुनावण्या या चिरीमिरी न दिल्याने अनेक वर्षे सुरू आहेत.तारीख पे तारीखचा सिलसिला आजही सुरू आहे.

 

पुरवठा विभाग  व सेतूची कायमचीच ओरड

पुरवठा शाखा किंवा सेतू मध्ये अर्ज किंवा दाखला काढावयाचा असेल तर ठराविक ठिकाणाचा अर्ज असला की काहीही न विचारता सही होते परंतु नागरिक थेट अर्ज घेऊन गेले असता त्याची उडणारी तारांबळ आणि होणारी धावपळ ही रावसाहेब व मध्यस्थ उघड्या डोळ्याने बघत असतात या ठिकाणचे अधिकारी आपल्या जागी कमी इतरत्र जास्त लक्ष देत असल्याने नागरिकांना कायमच ताटकळत थांबावे लागते.रेशनकार्डावर नाव दाखल करणे म्हणजे एक प्रकारचे अग्निदिव्यच पार पाडावे लागण्यासारखा प्रकार आहे.