संचारबंदीतही कराडात ‘मटका’ जोमात

संचारबंदीतही कराडात ‘मटका’ जोमात

संचारबंदीतही कराडात ‘मटका’ जोमात


कराड / प्रतिनिधीः-


सध्या देशात कोरोना महामारीमुळे अटी, शर्तीच्या आधारे व्यवसाय सुरू आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून कराडात अवैद्य धंदे जोमात सुरू आहेत. यात प्रामुख्याने जुगार अड्डे आणि मटका खुलेआम सुरू आहे. प्रत्येक कार्यक्रम वेबद्वारे होत आहेत. झूम अ‍ॅपचा वापर करून बहुतांशी बैठका होत आहेत. अशातच ऑनलाईनचा फायदाही या अवैद्य व्यवसायिकांनी सुरू ठेवला आहे. मटकाही अशाच पद्धतीने मोबाईलद्वारे सुरू असल्याने पोलिसांचे याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष आहे. कराड शहरात मटक्यावरून अनेक गुन्हे घडले आहेत. असे असतानाही हा खुलेआम मटका कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे. याची चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी करावी.


लॉकडाऊनच्या काळात हॉटेल, बार, दारूची दुकाने बंद होती. पण काही ठिकाणी छुप्या पद्धतीने दारूविक्री सुरू होती. दर मात्र दुप्पट होते. पहिल्या 100 दिवसात शिल्लक असणारा दारूचा कोटा या दुकानातून गायब झाला कसा. याची साधी चौकशीही कोणी केली नाही. मदीरा सुरू झाली आणि मंदिरे बंद आहेत यावर सध्या देशात चर्चा सुरू आहे. मदिरा विकणारे मालामाल झाले तर आमआदमी उपाशी मरण्याची वेळ आली. अवैद्य धंदे अशा प्रकारे राजरोस सुरू राहणे हे कशाचे धोतक आहे. याकडे पोलिस कानाडोळा करतात की जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. हा संशोधनाचा विषय आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यानी याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.


कराड शहरात मटक्यावरून खुन झाला. मोक्का लावण्यात आला. काही कालखंड कराडातील मटका बंद पडला. हा मटका पुन्हा केंव्हा सुरू झाला हे समजण्यासाठी संचारबंदीचा कालखंड पहायला मिळाला. गेल्या महिन्यापासून हा मटका राजरोसपणे सुरू आहे. पानटपर्‍या नगरपालिकेने काही ठिकाणच्या अतिक्रमणात काढल्या आहेत. मात्र, ज्या ज्या ठिकाणी मटका घेतला जात होता. त्या त्या ठिकाणी हे मटक्याच्या चिटठ्या देणारे हे दबा धरून बसलेले असतात. त्यांची नेहमीचे गिर्‍हाईक त्यांना शोधत येतात आणि हा व्यवसाय सुरू राहतो. याची सर्व माहिती पोलिसांनी असायलाच हवी. मात्र, त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. मटका सुरू कोणी केला, यातून कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल. यात शंका नाही. वारंवार या व्यवसायामुळे शहरात छोटे-मोठ्या मारामार्‍या झालेल्या पहायला मिळाल्या आहेत. भविष्यातही कराड अशामुळे अशांत होईल. येऊ घातलेला गणोशोत्सव आणि इतर सण कसेबसे अटी व शर्तीच्या आधीन राहून पार पडतील. पण यात अशा घटना घडू नये याची काळजी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी करणे गरजेचे आहे. हे नविन मटका बुकी कोण? यांचा शोध घेवून त्यांच्यावर जिल्हा पोलिस प्रमुखांनी कारवाई करावी.

इतरांना अटी तर मटका खुला


सध्या देशात अटी व शर्तीवर काही बाजारपेठा सुरू आहेत. तर अद्यापही हॉटेल्स, जिम्स, शाळा हे सर्व बंद आहेत. व्यापार्‍यांना सकाळी 9 ते 7 या कालखंडात दुकाने उघडावयास परवागनी आहे. तर अनेक व्यवसायिकांना अटी व शर्तीचे नियम आहेत. मात्र, शहरात मटका खुला सुरू आहे. तो कोणाच्या आशिर्वादाने.

कराडात मटका किंग कोण?


कराड शहरामध्ये मटक्याच्या वादातून गोळीबारासह खून होण्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण शहर हादरले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी आपला दबदबा निर्माण करत, शहरात सुरू असलेला मटका बंद केला. तर काहींना मोक्का लावला. हे सर्व घडले असताना पुन्हा मटका सुरू झाला कसा? आणि याचा किंग कोण? याची चर्चा कराड शहरात सध्या जोमाने सुरू आहे.