राष्ट्रवादीच्या गटात शिवेंद्रबाबांचा वावर शरद पवारांची घेतली भेट

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राष्ट्रवादीच्या गटात शिवेंद्रबाबांचा वावर शरद पवारांची घेतली भेट

कराड/प्रतिनिधीः-


दोन जिल्ह्याच्या अधिकार्‍यांची कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कराड येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे खास हेलीकॉप्टरने कराडमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते वाहनाने कराड विश्रामधाम येथे आले. याचवेळी विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर आणि राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात गेलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेजण एकाच गाडीतून कराड विश्रामधाम येथे येवून थांबले होते. शरद पवारांचे आगमन होताच, या दोघांसह खा. श्रीनिवास पाटील यांच्याबरोबर पवारसाहेबांची 15 मिनिटे गुप्तगू झाली. राजकीय वर्तुळाला कलाटणी देण्याची घटना म्हणून याची चांगलीच चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीच्या कळपात भाजपाचे शिवेंद्रबाबा वारंवार शरद पवारांना भेटत असल्याने त्यांच्या मनात नेमके चाललय तरी काय?
विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आले. भाजपाची सत्ता येणार असे गृहित धरून अनेक राष्ट्रवादीतील नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केले होते. यामध्ये जावली मतदार संघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला. मात्र सत्तेचे पारडे उलटे फिरले आणि राज्यात महाविकासआघाडी सत्तेत आली. तेंव्हापासून ज्या ज्यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे सातारा दौर्‍यावर आल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी त्यांची भेट घेतली आहे. एक राजे वारंवार पवारसाहेबांना भेटत आहेत तर दुसरे राजे मात्र भाजपाचे राज्यसभेचे सदस्य झाले असून त्यांनी अद्याप पवारसाहेबांची भेट टाळली आहे.


कराडमध्ये होत असलेल्या कोरोना आढावा बैठकीत सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित असताना आणि कराड दक्षिण हा माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसघ असताना सुद्धा या बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची गैरहजेरी व भाजपाचे राज्यसभेचे सदस्य श्री.छ.उदयनराजे भोसले यांचीही अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनला होता. उदयनराजेंनी शरद पवारांची भेट टाळली असे म्हणतात. तर शिवेंद्रराजे सातत्याने शरद पवारांच्या भेटीला येतात. यामध्ये निश्चितच राजकीय डावपेच आहेत आणि या राजकीय डावपेचामध्ये शरद पवारसाहेब माहिर आहेत. पवारसाहेबांची वारंवार घेत असलेली भेट ही नक्कीच केवळ अनौपचारिक भेट नाही तर शिवेंद्रराजेंच्या मनात नेमके चाललय तरी काय? हा प्रश्न उपस्थित करणारी आहे. शिवेंद्रराजे राष्ट्रवादीच्या कळपात वारंवार सहभागी होत आहेत. आगामी होवू घातलेले जिल्हा बँकेचे राजकारणही यामध्ये दडले असावे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


शिवेंद्रबाबा-पवारसाहेबांच्यात गुप्तगू


सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजपाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज कराड येेथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विश्रामधाम येथे भेट घेतली. यावेळी विधानसभेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील यांच्यात सुमारे 15 मिनिटे गोपणीय बैठक पार पडली. या बैठकीचा तपशील समजू शकला नसला तरी आगामी काळात राजकीय घडामोडीची चाहूल लागताना दिसत आहे.