कराडच्या मुख्याधिकार्‍यांना एक वर्षासाठी मुदतवाढ तर सातारच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे

कराडच्या मुख्याधिकार्‍यांना एक वर्षासाठी मुदतवाढ तर सातारच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे

कराड/प्रतिनिधीः-

कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.आज नगर विकास विभागाने राज्यातील अनेक मुख्याधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले.दरम्यान कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना मुदतवाढ मिळाल्याने कराड नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्याधिकारी शंकर गोरे यांना मात्र शासनाने प्रतीक्षेत ठेवले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अधिकार्याोंच्या बदल्या वर्षभर लांबवणीवर टाकल्या होत्या. मात्र सामान्य प्रशासन विभागाने अधिकार्‍यांच्या बदल्या पुन्हा सुरु केल्या आहेत. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या जागी अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने सोमवारी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. मात्र कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याचे आदेश नगरविकास खात्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी दिले.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा पहिला क्रमांक आणण्यामध्ये मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. कराड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी यशवंत डांगे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून गेल्या तीन वर्षांमध्ये यशवंत डांगे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन विविध प्रकारची कामे केली आहेत.
कराड नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिकांचा विविध उपक्रमांमध्ये सहभाग असावा यासाठी विविध कल्पना राबवून त्या यशस्वी केल्या आहेत. त्यांनी शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अतंर्गत काम करताना अनेक नवनवीन कल्पना राबवत शहराचा कायापालट केला आहे.
दरम्यान, रंजना गगे या सातारा पालिकेच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी असल्याचे मानले जात आहे. सातारा शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या महत्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे आव्हान रंजना गगे यांच्यासमोर आहे. सातारा शहरातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वय साधून रंजना गगे यांना काम करावे लागणार आहे. दरम्यान, मावळते मुख्याधिकारी शंकर गोरे यांना अद्याप कुठेही नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.