कराड नगरपालिकेकडून महिला बचत गट व योध्यांचा सन्मान

कराड नगरपालिकेने विविध उद्योगात कार्य करणाऱ्या महिला बचत गटांसह विविध संस्था व योध्यांचा करण्यात आला. यामध्ये शाकंभरी, विघ्नहर्ता महिला बचत, सिटी कंप्यूटर इंस्टिट्यूट व शोएब सय्यद यांचा समावेश असून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्धल पालिकेच्या वतीने हा सत्कार केला.

कराड नगरपालिकेकडून महिला बचत गट व योध्यांचा सन्मान
शाकंभरी महिला बचत गट

कराड नगरपालिकेकडून महिला बचत गट व योध्यांचा सन्मान

 

शाकंभरी, विघ्नहर्ता महिला बचत, सिटी कंप्यूटर इंस्टिट्यूट व शोएब सय्यद यांचा सत्कार

 

कराड/प्रतिनिधी :

      येथील नगरपालिकेने विविध उद्योगात कार्य करणाऱ्या महिला बचत गटांसह विविध संस्था व योध्यांचा करण्यात आला. यामध्ये शाकंभरी, विघ्नहर्ता महिला बचत, सिटी कंप्यूटर इंस्टिट्यूट व शोएब सय्यद यांचा समावेश असून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्धल पालिकेच्या वतीने हा सत्कार केला. 

     शहरातील शुक्रवार पेठेत दहा महिलांचा शाकंभरी महिला बचत गट गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. याच गटातील चार महिला व एका युवकाने मिळवून ओम शिवरत्न कापूर व्यवसाय सुरु केला असून त्यांना बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्जही मिळाले. या गटाने सामाजिक बांधिलकी जपत  कोरोना महामारीत दहा दिवस कार्वे नाका, श्री हॉस्पिटल शेजारील झोपडपट्टी, स्टेडियम परिसरातील घरे, हायवेवरील वीटभट्टी आदी. भागात संपूर्ण जेवण बनवून वितरित केले. तसेच त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण  मास्कही तयार करून त्याचे वाटपही केले होते. अशाप्रकारे सामाजिक भान जपणाऱ्या व आपल्या बरोबर इतरही महिलांना प्रेरित करणाऱ्या या गटाचे काम कौतुकास्पद असल्याने  नगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

       तसेच शुक्रवार पेठेतील दहा महिलांचा विघ्नहर्ता महिला बचत गट 2008 सालापासून कार्यरत आहे. या गटाने ज्याला जमेल तसे पापड बनविणे, कुरडया विकणे, मेणबत्ती बनवणे, ब्लाऊज शिवणे आदी. व्यवसाय सुरु केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याची काळजी म्हणून इतरांसाठी जवळपास 2000 पेक्षा अधिक मास्कसह जीवनावश्यक वस्तूंचे, गरीब महिलांसाठी साड्यांचे वाटप, लहान मुलांना कपड्यांचे वाटप, खाऊचे वाटप केले. त्यांच्या या कामामुळे इतर बचत गटातील महिलांना, सेवाभावी संस्थांनाही यातून प्रेरणा मिळाली. अशाप्रकारे सामाजिक भान जपणाऱ्या व आपल्या बरोबर इतरही महिलांनाही प्रेरित करणाऱ्या बचत गटाचाही नगरपालिकेमार्फत सत्कार करण्यात आला.

       सिटी कंप्यूटर इंस्टिट्यूट, कराड ही संस्था मागील २० वर्षापासून शहर व परिसरात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कम्प्युटर, कॉम्प्युटर टायपिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग आदी. प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेने वरील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण  व वृक्ष संवर्धन, रोजगार मेळावे, अन्नदान तसेच मोफत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण असे अनेक वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. सिटी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट, कराड या संस्थेतील विद्यार्थिनींनी कोरोना कालावधीमध्ये स्वतः 500 पेक्षा जास्त दर्जेदार मास्क बनवून त्याचे गरजूंना मोफत वाटप केले. याबद्धल त्यांचाही पालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

        तसेच शनिवार पेठेतील शोएब सय्यद या अतिशय गरीब कुटुंबातील युवकानेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आईचे घरकाम तर वडील इस्त्रीच्या दुकानात कामाला असून घरात दोघेजण भाऊ. घरचं परिस्थितीमुळे कसेतरी रडतखडत आठवीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर वडिलांना हातभार लावायचा म्हणून बरीच छोटी-मोठी कामेही त्याने केली. यामधून मिळणाऱ्या पैशांवरच त्याचे कुटुंब चालत होते. त्यानंतर शोएबने कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी आवश्यक मशीन्स खरेदीसाठी त्याने पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या विभागाकडे कर्जासाठी मदत मागितली. बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन त्याने त्याचा व्यवसाय सुरू केला. तसेच कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत त्याने उरलेल्या कपड्यातून मास्क तयार केले. याच काळात त्याने भाजीपाला वितरण, वारणा कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी आपल्या जमापुंजीतून एक वेळचे जेवण दिले. तसेच स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्यांच्या शेजारील दोन कुटुंबातील लोकांना ऑक्सिजन मशीन लावून त्याचे प्राणही त्याने वाचविले. स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीतही दुसऱ्याचा विचार करून त्यांना आनंद देण्यासाठी झटणाऱ्या या मुलाचाही नगरपालिकेतर्फे सत्कार करून त्याचे कौतुक करण्यात आले.