तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने शेतकरी चिंतेत 

तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने शेतकरी चिंतेत 

 

कराड / प्रतिनिधी : 
                गत आठवड्यापासून कराड तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सुरुवातीला पुरेशा पावसाअभावी जिल्ह्याच्या पूर्व भागातील पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर काहीशा सक्रीय झालेल्या मान्सूनने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने त्यांनी उरल्या-सुरल्या पेरण्या घाईघाईने उरकल्या होत्या. परंतु, पिकांच्या ऐन उडवणीदरम्यानच पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे दिसून येत आहे. 
            कराड तालुक्यातील पूर्वेच्या काही भागासह मसूर, हेळगाव, इंडोली भाग व त्या लगतच्या भागातील पेरण्या अपुऱ्या पावसामुळे खोळंबल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोकण किनारपट्टीसह जिल्ह्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई-गडबडीत पेरणीची कामे उरकून घेतली. परंतु, त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने उशिरा पेरणी झालेल्या भागातील पिकांच्या उगवणीवर चांगलाच परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  
             तसेच तालुक्यात पश्चिमेकडील बहुतांशी भागात धुळवापीवर पेरण्या केल्या जातात.  त्यामुळे सुरुवातील पडलेल्या पावसावर तेथील शेती हिरवीगार होते. मात्र, या भागातील मुरमाड जमिनीमुळे पावसाने ओढ दिल्यानंतर काही दिवसातच या जमिनीतील ओल कमी होते. त्यामुळे येथील पिकांच्या उगवणीवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. परंतु, या भागातील वातावरणामुळे ही पिके काही प्रमाणात तरुन जातात. 
           परंतु, तालुक्याच्या पूर्वेकडील अवर्षण व दुष्काळसदृश भागातील पिके मात्र अपुऱ्या पावसामुळे अल्पावधीतच कोमेजून जात असल्याचे दिसून येते. तसेच तालुक्यातील मध्य भागातील पट्या हा काळ्या व दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवणाऱ्या मातीचा भाग असल्याने येथील जमिनीला पुरेशा प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. परंतु, याही भागातील पिकांना सध्या पावसाची गरज भासत असून एकंदरीत पिकांच्या पूर्ण उगवणीसह पीक वाढीसाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची आस लागून राहिली आहे.