कराडच्या लालमातीत सर्कल तलाठी यांची मज्जा ....!

नाममात्र रॉयल्टी वारेमाप उपसा महसुलची भूमिका शंकास्पद

कराडच्या लालमातीत सर्कल तलाठी यांची मज्जा ....!

कराडच्या लालमातीत सर्कल तलाठी यांची मज्जा

नाममात्र रॉयल्टी वारेमाप उपसा महसुलची भूमिका शंकास्पद

कराड / प्रतिनिधी


कराड तालुक्याचे तहासिलदारांसह निवासी नायब तहसीलदार तसेच महसूल विभागातील पाच ते सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनातील अधिकारी कोरोना बाधित असल्याची माहिती असल्याने मलकापूर येथील मंडलाधिकारी आणि गावकामगार तलाठी यांचे फावले असून कोयना नदीकाठी वीट भट्टीसाठी लागणारी तांबडी मातीचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. कराड शहराजवळ असलेल्या मलकापूरच्या हद्दीत वीट भट्टीसाठी तब्बल चार जेसीबी आणि ३० ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती उपसा सुरू आहे.अशावेळी कराड महसूल प्रशासनाला कोणीच वाली नसल्याने  अधिकारी व कर्मचारी झोपेच्या सोंगेत असल्याची चर्चा सुरू आहे.

वीट भट्टीसाठी लागणारी माती उपसा कोयना नदीकाठी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नदीकाठी माती उपसा केल्याने अनेक ठिकाणी नदीचे पात्र वाढलेले असून जमिनीचा काही भाग वाहून गेल्याचे चित्र दिसून येते. नदीकाठी मातीच्या उत्खनाने पावसाळ्यात पूरस्थिती लवकर निर्माण होते, तसेच नदीकाठी या माती उपसामुळे फटका बसतो. स्थानिक महसूल प्रशासनातील मंडलाधिकारी व गावकामगार तलाठी हे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून स्वतःचे खिसे गरम करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप नेहमीच तालुक्यातील नागरिक करत असतात.परंतु चिरीमिरीला सोकावलेली महसूल यंत्रणा रावसाहेबांच्या सोबत सलगी असणारे सर्कल तलाठी आपला हेतू साध्य करण्यात वाकबगार असल्याची चर्चाच कराड महसूल विभागात आहे.

कराडचे तहसिलदार विजय पवार यांच्यासह नायब तहसिलदार आनंदराव देवकर आणि महसूल विभागातील अनेकजण कोरोना बाधित या आठवड्यात आलेले आहेत. प्रशासनाचे अधिकारी कोरोना बाधित आढळल्याने माती उपसासाठी वीट भट्टी चालकांनी चक्क कोयना नदीपात्रात हाैदोस माजवला आहे. कराड जवळील मलकापूर हद्दीत तब्बल 4 जेसीबी आणि 30 ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने माती उपसा सुरू आहे. शासनाने घालून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवून हे उत्खनन सुरू आहे. यामुळे नदीपात्राची मोठी हानी होत आहे. माती उचलण्यासाठीचा किरकोळ ब्रासचा परवाना घेऊन हजारो ब्रास माती उसपली जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी होत आहे.

कोयना कृष्णा नदीपत्रालगत ट्रक्टरच्या साहाय्याने  लाल मातीची लूट सुरू आहे. याकडे महसूल विभागाने सोईस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. माती उपशातील आर्थिक गणितांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.कराड तालुक्याला कृष्णा-कोयना नद्यांचे मोठे पात्र लाभले आहे. लाल मातीचे सर्वाधिक क्षेत्र म्हणून कराडकडे पाहिले जाते. शेतीतील विविध प्रकल्पांसह बांधकाम व्यवसायात प्रमुख भुमिका बजावणारी वीट याच लाल मातीपासून बनली जाते. कराडच्या वीटेला राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठी मागणी आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेच्या मातीला सोन्याचा भाव आला आहे.या लाल मातीचा प्राधान्य क्रम शेतीसाठी राहिला तर तालुक्यातील नापीक जमीन सुपीक होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मात्र,अनेकांनी या मातीचे व्यवसायीकरण डोळयासमोर ठेवून मातीला हात घातला आहे. याकामी ठेकेदार कम् माती तस्करांना कराडचा महसूल विभाग उचलू लागताना दिसत आहे. 


नदीकाठीच्या अनेक गावात जेसीबी, पोकलॅन्ड आदी यंत्रे वापरून डंपर, ट्रक, ट्रक्टरच्या सहाय्याने लाल मातीचे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. यासाठी नाममात्र १०० ते ३०० ब्रासचा उत्खनन व वाहतूक परावाना घेतला जातो. प्रत्यक्षात संबंधित गट नंबरमध्ये मंजूर परवान्याच्या शेकडोपटीने जादा मातीचा उपसा केला जात आहे. शेतकर्‍यांकडून कवडीमोल किंमतीमध्ये मातीची खरेदी करून नाममात्र ब्रासचा परवाना काढायचा आणि हजारो ब्रास माती उपसा करायची, हे सुत्र सध्या वापरले जात आहे. या प्रकारात शासनाचा शेकडो ब्रासचा महसूल बुडवून अधिकारी कर्मचारी आपला खिसा गरम करून घेत आहेत.