रावसाहेब...कर्तव्यात कसूर करू नका..!

तासवडे औद्योगिक वसाहतीतील मुरूम प्रकरण गुंडाळले ?

रावसाहेब...कर्तव्यात कसूर करू नका..!

रावसाहेब...कर्तव्यात कसूर करू नका..!

 

तासवडे औद्योगिक वसाहतीतील मुरूम प्रकरण गुंडाळले ?

 

अनिल कदम/उंब्रज

 

तासवडे ता.कराड येथील औद्योगिक वसाहतीत राजरोसपणे उत्खनन केलेल्या मुरूमाचे पंचनामे धूळ खात पडले तर नाहीत ना ? केलेल्या पंचनाम्याचे पुढे काय सोपस्कार झाला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता 'रावसाहेबांपासून आण्णासाहेबांच्या' चुप्पीने सर्व काही अलबेल झाले आहे. 'उलटा चोर कोतवाल को डाटे'अशी अवस्था महसूल विभागाची झाली असून नागरिकांच्यात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.

 

तासवडे येथील सी १/२ आणि सी१५ मधील अवैध मुरूम उत्खनन प्रकरण एक महिना झाला तरी चिडीचूप असल्याने गुंडाळले असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांच्यात आहे.याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता प्रायव्हेट पब्लिक कशी काय माहिती मागू शकतात असे उत्तर मिळाले आहे.याबाबत लेखी पत्र मुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूलमंत्री,कराड प्रांताधिकारी, सातारा जिल्हाधिकारी,यांना लिखित स्वरूपात पाठवले आहे. तसेच अंदाजे पंचनामा न करता सदर उत्खनन मोजणी खात्याकडून मोजमाप करून याबाबत दंड आकारणी व वसुली केली पाहिजे अशी परिसरातील ग्रामस्थांची कुजबुज आहे.परंतु रक्षकच भक्षक होत असल्याने सरकारी बाबू कायमच जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याची चर्चा आहे.

 

सदरचे मुरूम उत्खनन प्रकरण हे जिल्हाधिकारी सातारा यांची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आले आहे.असे दंडाच्या नोटिशी मध्ये नमूद करण्यात आले आहे.औद्योगिक वसाहतीतील सी १५ प्लॉट नक्की कुठून मुरूम आणून भरला याची खातरजमा महसूल विभागाने केली पाहिजे,महसुलचेच काही जण अवैध उत्खनन करणाऱ्या सदर प्लॉट धारकाची वकिली करून आपले बिंग फुटू नये याची काळजी घेत आहेत.यामुळे दोषी असणाऱ्या सर्वांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी लोकांच्यातून मागणी होत आहे.

 

सी १/२ मधील उत्खनन केलेला प्लॉट व सी १५ मधील मुरूम भरलेला प्लॉट महसूल कर्मचाऱ्यांना उत्खनन होताना दिसले नाही का ? याबाबत लोकांच्यात उलटसुलट चर्चा असून,याप्रकरणी महसूल मधील काहीजणांनी फार मोठा 'हात' मारल्याची चर्चा पसरली आहे.सदरचे उत्खनन करण्यामागचे संपूर्ण रॅकेट जिल्हाधिकारी यांनी शोधून काढून यावर कडक कारवाई केली पाहिजे.अशी मागणी तासवडे,वराडे व औद्योगिक वसाहत परिसरातून होत आहे.

 

तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा बोकाळला असून महसूल खाते बातमी आली की कारवाईचा फार्स राबवित आहेत.परंतु अनेक ठिकाणी बेमालूमपणे गौण खनिज उपसा सुरू असून महसूल कर्मचारी मालामाल होऊन गरगरीत झाले आहेत अशी चर्चा आहे.तक्रारदारांची नावे अवैध गौण खनिज उपसा करणारांना सांगितली जात असल्याने गोपनीय खबरे भूमिगत झाले आहेत.

 

मसूर परिसरातील अवैध मुरूम उपसा चर्चेत

 

मसूर परिसरातील एका ठिकाणचा मुरूम उपसा दिवसाढवळ्या सुरू असून सर्कल,तलाठी चिडीचूप बसल्याने परिसरातील नागरीकांच्यात अ'संतोष' वाढला आहे.महसूल खाते कोरोना महामारीच्या नावाखाली दडत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.यामुळे महसूल विभागाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचा बोभाटा झाला आहे.महसूल प्रशासनात काही शिखंडी कार्यरत असून तोंडावर गोड बोलून तक्रारदारांची बोळवण करण्यात धन्यता मानत आहेत.