तलाठी-सर्कलांची ‘धावाधाव’ःवाळू माफिया ‘चिडीचूप’

तलाठी-सर्कलांची ‘धावाधाव’ःवाळू माफिया ‘चिडीचूप’

कराड/प्रतिनिधीः-

कराड तालुक्यात सुरू असलेला गौण खनिजमधील काळाबाजार आणि त्याचे गौडबंगाल आम्ही जाहिर केले. काही अधिकार्‍यांनी फाईली आपटल्या. जणूकाही जे घडते आहे ते मला माहितच नाही. अशा अविर्भावात वावरण्याचे काम सुरू केले. ज्यांनी कराड तालुक्यात तळ ठोकला आहे. अशा सर्कल तलाठ्यांचा पर्दाफाश झाला आणि त्यांनी धावाधाव सुरू केली. म्हणे तो मी नव्हेच अशी गांधारीची भुमिका घेवून प्रत्येकजण ऐकमेकांकडे संशयाने बघू लागला. तर काहींनी इतरांना सांगून आपण यातून सुटतो का याचा मार्गही अवलंबला. आमच्यातील काही महाभागांनी रावसाहेबांना कानमंत्र दिला. रावसाहेब ही त्या कानमंत्राचा वापर करत मी काही पाहिले नाही. अशा भुमिकेत दिसू लागले आणि उंब्रज ते वहागांव या पट्ट्यात सुरू असलेले वाळू उपशाचे माफिया चिडीचूप झाले. आजपर्यंत अनेक छापे टाकले. रात्री-अपरात्री फिरण्यासाठी व वाळू माफियांना धरण्यासाठी जी पथके तयार करण्यात आली. त्यांनी आत्तापर्यंत किती वाळू माफियांच्यावर गुन्हे दाखल केले, हे एकदा रावसाहेबांनी जाहिर करावे. म्हणजे तालुक्यातील जनतेला समजेल. रात्रीस खेळ चाले... किती फायद्याचा ठरला व किती तोट्याचा ठरला..! छापे टाकले असतील तर किती महसूल जमा झाला. तालुक्यात असणार्‍या विटभट्ट्या किती? त्यातील कायदेशीर कितीं? बेकायदेशीर किती? लाल माती उत्खननात कोण कोण लाल झाले? स्टोन क्रशर किती? किती खाणपट्ट्यांचा परवाना आहे व त्यांनी किती महसूल भरला आहे. या सर्व बाबी तालुक्यातील जनतेला कळाव्यात आणि याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनीही घ्यावी. त्यांनी जर चौकशी केली तर कराड तालुक्यातील महसूल उत्खननात सुरू असलेला काळा बाजार निश्चितच उघड होईल व तो जिल्ह्यातील सर्वांना समजेल. आपल्या खात्याच्या दिव्याखाली अंधार ठेवण्यापेक्षा त्याचा उजेड निर्माण करण्याचे धाडस जिल्हाधिकार्‍यांनी दाखवावे, अशी मागणी तालुक्यातील जनतेच्यावतीने होत आहे.
तालुक्यात म्हंटले तर अनेक प्रकारे राजरोस, बेकायदेशीर धंदे सुरू आहेत. हे धंदे शासनाचा महसूल बुडवून सुरू आहेत. याचे दुःख सर्वांना होते. एखाद्या वेळेला सोने घेणे परवडेल पण वाळू नको. अशी म्हणण्याची वेळ बांधकाम व्यवसायिकांच्यावर आली आहे. बांधकाम व्यवसायिक ही आता वाळू वापरावयाचे बंद झाले आहेत. 

कराड तालुक्यात अनेकठिकाणी रात्रीचा वाळू उपसा करून वाळू साठे तयार करायचे आणि जशीजशी लोकांना हवी तशीतशी विकायची. डेपो मारलेली वाळू कोणाला दिसणार नाही. अशा शेतात नेहून ठेवायची. हे गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे. वाळू माफियांना रोखणे अवघड होवू लागले आहे. महसूल अधिकार्‍यांनी तलाठी, सर्कलांना पुढे करायचे आणि पंचनामे करायला लावायचे. चोरट्या वाळू माफियांना गुन्हा दाखल करण्याची धमकी या बिचार्‍यांनी द्यायची आणि पंचनामे केलेली कागदपत्रे तहसिल कार्यालयात आणून द्यायची. तेथे असलेले इतर कर्मचारी मग हा कोणाचा, हा आपल्याला भेटू शकतो का? खरच याच्यावर गुन्हा दाखल करायचा का? याची छानबीन करतात. गरज पडली तर मग यांनाच मध्यस्थी घालायचे आणि मग अर्थव्यवहार पुर्ण करायचा. छाप्याची कागदपत्रेही गायब होतात, अन् धरलेली वाहनेही सुटतात.
तारळी, कृष्णा नदीवर वाळू उपसा करणारे वाळू माफिया गप्प झाले आहेत. येथील सर्व सजामध्ये काम करणारे सर्कल तलाठी आपआपल्या गावामध्ये गेल्या तिन दिवसांपासून दिसत आहेत. सकाळी आलेले महाभाग 6 वाजेपर्यंत कार्यालयात असतात. आजपर्यंत येथील ग्रामस्थांना सातबाराच्या उतार्‍यावर सही लागायची असली तरी त्यांना कराडला यावे लागत होते. मात्र, सध्या हे आपआपल्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. तर वाळू माफियाही चिडीचूप झाले आहेत.  उत्तरमांड नदीवर गेल्या आठवड्यात एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर वाळूने भरलेले सापडले. ते एका राजकीय पदाधिकार्‍याचे होते. तर जेसीबी एका पक्षाच्या कार्यकर्त्याचा होता. पकडल्यानंतर दिवसभर खमंग चर्चा झाली. मात्र, त्यांच्यावर कोठेही गुन्हा दाखल झाल्याचे पहायला मिळाले नाही. अथवा त्यांच्या नावे महसूल खात्यात चलनही फाटल्याले दिसले नाही, मग हे सुटले कसे? कोणी सोडले ? आणि हे सोडण्यासाठी किती मलिदा मिळाला? दुसर्‍यास शिकवे तत्वज्ञान आणि मी कोरडा पाशान अशी अवस्था महसूलच्या अधिकार्‍यांची झाली आहे. चोर सोडून सन्याशाला फासी देत आहेत. एखाद्या बांधकामावर वाळू दिसली तर तलाठी लगेच याची विचारणा करतात. मात्र, ज्यांनी आपल्याला हवे ते देवून वाळू उपसची त्याच्यावर कारवाई करत नाहीत. हे असे किती दिवस चालणार. वाळूचा बेकायदेशीरपणा आम्ही पोलखोल केला आहे. आज कराड उत्तरमधील तर वाळू माफिया चिडीचूप झाले आहेत, पण किती कालखंड झाले हे माहित नाही. पण त्यांना दुसर्‍यांची घरे दाखवू नका? आपणाला पाहिजे असतील तर खुशाल चालवा? तुमच्यावर कारवाई करायला जिल्हाधिकारी सक्षम आहेत. ते काय करायचे ते ठरवतील. आलेल्या बातम्या उपजिल्हाधिकार्‍यांना नका पाठवू त्या जिल्हाधिकार्‍यांना पाठवा म्हणजे त्यांनाही कळेल हा जिल्हा कसा आहे. ते नवीन आहेत. आल्यापासून कोविड 19 साठी काम करत आहेत. त्यांना कदाचित इतर माहिती अद्याप मिळाली नसेल, म्हणून ती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. याची दखल त्यांनी घेतली आहे. लाल मातीत लाल झालेले अनेक पैलवान पाहिलेले आहेत. पण या लाल मातीतून आर्थिक दृष्ट्या जे पैलवान झालेले आहेत, त्यांचाही पोलखोल आम्ही करू, मग यातून खडी आणि क्रश कसे मिक्स करून वापरले जाते, हेही जनतेला महिती होईल. यापुर्वी कराड तालुक्यातील सर्व क्रेशर बंद होती. ती कशी चालू झाली आहेत. याची माहिती घेण्याची काम. सुरू आहे. यथाअवकाश यावरही प्रकाश टाकू...