कृषी खाते,ग्रामविकास विभागाने हात वर केले,महसुलने बळीराजाला तारले

पी एम किसान योजना कराड तहसील रात्रंदिवस ऑनलाईन

कृषी खाते,ग्रामविकास विभागाने हात वर केले,महसुलने बळीराजाला तारले

उंब्रज/प्रतिनिधी

मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान किसान योजना देशात मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे.वर्षातील प्रत्येक चार महिन्यात दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा होत आहेत.परंतु के वाय सी तसेच तांत्रिक डाटा अपुरा असल्याने काही लाभार्थ्यांना पैसे मिळताना अडचण निर्माण होत असल्याची बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर देशातील सर्वच राज्यात याबाबत जनजागृती करून अपूर्ण डाटा पूर्ण करण्याची मोहीम युद्धपातळीवर हातात घेण्यात आली आहे.याबाबत कृषी आणि ग्रामविकास विभागाने हात आखडता घेतल्याने याचा सर्व भार महसूल विभागांवर आला असल्याने पी एम किसान योजना पात्र आणि वंचित लाभार्थीना मिळण्यासाठी कराड तहसील कार्यालय रात्रंदिवस ऑनलाईन असून कृषी खाते,ग्रामविकास विभागाने हात वर केले,महसुलने बळीराजाला तारले अशीच भावना तालुका वासीयांच्यात निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यातील पी एम किसान योजनेत डाटा अपूर्ण असणाऱ्या गावांची संख्या १७१४ असून ५०६२७२ लाभार्थी या योजनेपासून वंचित होते यांपैकी कराड तालुक्यातील २१९ गावे आणि ८६९५७ लाभार्थी वंचित राहत होते परंतु दि ४ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार १५६ गावे पोर्टलवर अपलोड झाली असून ६३ गावे अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कराड तालुक्यातील ६०९१० लाभार्थ्यांचा डाटा अपलोड झाला असून ६६५२ जणांचा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू असून केवायसी अपूर्ण असणाऱ्या पात्र लाभार्थीनी आधार अपडेशन तातडीने करून घेणे महत्त्वाचे आहे यासाठी सर्व सेतू आणि सी एस सी सेंटर शनिवार रविवार सुरू ठेवण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.

पी एम किसान ही योजना कृषी खात्याच्या माध्यमातून पार पडणे आवश्यक असताना महसूल विभाग यामध्ये भरडला गेल्याने महसूल कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक झाली आहे.अहोरात्र युद्धपातळीवर काम करून मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी,कोतवाल व पोलीस पाटील यांच्या अविरत कष्टाने ही योजना बळीराजा पर्यत पोहोचणार असून एकही पात्र लाभार्थी वंचित राहून नये यासाठी कराड प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार,निवासी नायब तहसीलदार आनंदराव देवकर व सर्व कर्मचारी रात्रीचा दिवस करून सुमारे चौपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यासाठी झटत आहेत.

बळीराजाचा आशीर्वाद मिळणार

पी एम किसान ही शासनाची योजना असून तळागाळातील गोरगरीब बळीराजाला यामुळे बहुमोल मदत होत आहे.या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी कराड तहसील कार्यालय प्रयत्नशील असून आमचे सर्व कर्मचारी रात्री दोन दोन वाजेपर्यंत अविरत डाटा फिडिंगचे काम करीत आहे.या कामाला तालुक्यातील पोलीस पाटलांची बहुमोल मदत झाली असून सुमारे ५४ कोटी रुपये यामुळे तालुक्यातील वंचित लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहेत.७ सप्टेंबर शेवटची तारीख असून अपूर्ण असणारी केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावी

विजय पवार
तहसीलदार कराड