पुणे पदवीधर निवडणूक लढविणार नाही :- सारंग पाटील

पुणे पदवीधर निवडणूक लढविणार नाही :- सारंग पाटील

कराड / प्रतिनिधी

२०१४ साली झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला मी राष्ट्रवादी व मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून सामोरा गेलो होतो. या निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी माझा पराभव झाला होता. पराभव झाल्यानंतर खचून न जाता २०२० साली होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या निर्णयाने मी तयारीला लागलो होतो. दरम्यानच्या काळात पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान सेलचा प्रमुख म्हणूनही मी काम पाहिले. पक्षाच्या बूथ कमिटी प्रकल्पासाठी नवीन तांत्रिक प्रणाली विकसित करता आली. त्यानिमित्ताने राज्यभर फिरून बूथ स्थराच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देता आले व यातून मला स्वतःलाही खूप शिकता आले. पक्ष कार्यात सक्रीय राहून पदवीधर मतदारसंघातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या पाचही जिल्ह्यात संपर्क कायम ठेवता आला. तसेच निवडणुकीच्या अनुशंगाने कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांच्या माध्यमातून यावेळी सुद्धा आम्ही पदवीधरांची उच्चांकी मतदार नोंदणी केलेली आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये घडलेल्या अनपेक्षित घडामोडींमध्ये अचानक लागलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आमचे नेते आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे माझे वडील आदरणीय खा. श्रीनिवास पाटील साहेबांनी ही निवडणूक लढवली होती. आपल्या सर्वांच्या पाठबळावर व खा. पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तमाम मतदारांनी त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयाने सातारा जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा मतदारांनी श्रीनिवास पाटील साहेबांना दिली आहे. याची जबाबदारी आणि जाणीव त्यांचा कुटुंबीय म्हणून मला देखील आहे. त्यानुसार मतदारसंघातील सर्व कामे योग्य रीतीने हाताळली जावीत, खासदारांचे संसदेतील कामकाज उठावदार असावे ही मतदारांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच अनेक विकास निधींची कमतरता येण्याची शक्यता आहे व लोकसंपर्काचे सार्वजनिक समारंभ, सभा घेणे अवघड आहे. पुणे पदवीधर निवडणूक जाहीर होण्याची तारिख निघून गेली आहे. तसेच यापुढे ही निवडणुक कधी लागेल हे निश्चित सांगता येत नाही. कोरोनाच्या सद्यस्थितीत अशा संकटाच्या काळात निवडणूकीचा मुद्दा महत्वाचा करणे, प्रचाराची भूमिका घेणे हे नैतिकदृष्ट्या मला योग्य वाटत नाही. यापेक्षा खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्यावर जिल्ह्यातील जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहणे ही आमची बांधिलकी आहे. त्यामुळे मतदारसंघात अधिक लक्ष, संपर्क ठेवणे गरजेचे असल्याने त्यास माझे प्राधान्य असले पाहिजे असे मला वाटते.

या कारणांमुळे पुणे पदवीधर निवडणूक लढवू नये अशा निर्णयापर्यंत मी पोहोचलो आहे. नोंदणी प्रक्रियेत सहकार्य केलेल्या बहुतांश कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी आमचे नेते आदरणीय पवार साहेबांना दि. १० जुलै रोजी पत्र लिहून आगामी पुणे पदवीधर निवडणुकीसाठी माझ्या नावाचा विचार करू नये हे नम्रपणे कळविले आहे. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब यांनाही मी तसे कळविले आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाला योग्य पर्याय शोधण्यासाठी व संभाव्य उमेदवाराला पूर्व तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून वेळेत पक्षाला हे कळविणे हे माझे कर्तव्यच होते. त्याचप्रमाणे कार्यकर्ते, मतदार व माध्यमांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये  म्हणून माझी ही भूमिका आपल्या माध्यमातून जाहीर करीत आहे. तसेच पक्ष जो उमेदवार देईल त्यास माझे संपूर्ण सहकार्य राहिल. 

२०१४ मध्ये उमेदवार म्हणून मला जी संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय पवार साहेबांचा व पक्षाचा ऋणी आहे. तसचे पदवीधर निवडणूकीच्या अनुशंगाने कार्यकर्ते व हितचिंतकांनी अहोरात्र कष्ट घेऊन मला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा देखील मी ऋृणी असून सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्यांचे आमच्या समाजिक व राजकीय जीवनात मोठे सहकार्य लाभले असून यापुढील काळातही ते आम्हाला मिळेल अशी आशा बाळगतो.