प्रांताधिकारी कडक शिस्तीचे ,पण शांत कसे काय ..!

धडाकेबाज महसूल अधिकारी म्हणून नावलौकिक

प्रांताधिकारी कडक शिस्तीचे ,पण शांत कसे काय ..!

प्रांताधिकारी कडक शिस्तीचे ,पण शांत कसे काय ..!

धडाकेबाज महसूल अधिकारी म्हणून नावलौकिक

कराड तालुक्यातील चाललेला अवैध गौनखनिज उपशाचा धिंगाणा कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या निदर्शनास येत असला तरी प्रांतसाहेब शांत कसे काय ? याबाबत तालुकावासीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध असणारे प्रांतअधिकारी यांची पुणे ग्रामीण मधील इंदापूर परिसरात तहसीलदार म्हणून असणारी कारकीर्द अवैध उत्खनन करणारांच्यात मोठी दशहत निर्माण करणारी ठरली असल्याची चर्चा होती.अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या वाळूच्या बोटी जिलेटीनच्या साहयाने उडवून देऊन अवैध गौणखनिज उपशाचे रॅकेट समूळ नायनाट करणारे अधिकारी म्हणून नावलौकिक आहे.अट्टल वाळूचोरांना गुडघे टेकायला लावणाऱ्या कामगिरी मुळे तहसीलदार तसेच प्रांताधिकारी म्हणून वर्धा,इंदापूर तसेच कोल्हापूर येथील कारकीर्द चांगलीच गाजली होती.गनिमी काव्यात हातखंडा असणारे प्रांताधिकारी यांच्या धडाकेबाज कामगिरीची गरज सध्या कराड तालुक्याला आवश्यकता असून तालुक्यासह जिल्ह्याचा महसूल वाढविणे तसेच अवैध उत्खननावर जरब बसविणे अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना कराड महसूल प्रशासनाला करारी बाणा व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर वचक निर्माण करण्याची गरज असल्याची चर्चा आहे.

१४ महसुली सर्कल,६८ गाव कामगार तलाठी,तसेच ५ नायब तहसीलदार आणि १ निवासी नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून कराड महसूल प्रशासनाचा कराड उत्तर व कराड दक्षिण अशा दोन विधानसभा मतदार संघातून कारभार चालविला जात आहे.महसूल प्रशासनातील सर्वच कर्मचारी कामचुकार अथवा खाबूगिरीतील नाहीत.परंतु डझनभर भ्रष्ट, कामचुकार आणि मलिदा लाटायला निर्ढावलेले कर्मचारी यांची माहिती घेऊन प्रांत अधिकारी यांनी त्यांना खड्यासारखे बाजूला केले पाहिजे तरच बाकी कर्मचारी सुतासारखे सरळ होऊन काम करतील.अन्यथा आडीतील एक आंबा नासला तर संपूर्ण आडीच खराब होण्याचा धोका असतो यामुळे महसूल प्रशासनातील वाईट प्रवृत्ती असणारे आण्णासाहेब यांना वेळीच लगाम घातला तर कराड महसूल प्रशासनाचा नावलौकिक पूर्वपदावर यायला वेळ लागणार नाही.यासाठी प्रांतअधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारने गरजेचे बनले आहे.

तालुक्यातील बहुतांश रावसाहेब आणि आण्णासाहेब हे एकाच ठिकाणी बरीच वर्षे खुंटी ठोकून  कर्तव्य बजावत आहेत.यामुळे अवैध उत्खनन करणारांशी सलगी वाढून गैरकृत्य करण्यास मोकळीक मिळत आहे.एका गावकामगार तलाठ्यांच्या हातात चार पाच गावचा कारभार असल्याने नदीकाठच्या सुपीक प्रदेशात नेमणुकीला असणारे आण्णासाहेब हे झोकात आहेत.यामुळे रावसाहेबांची मर्जी सांभाळली की हवे ते करा असा गोड गैरसमज होऊन बसला आहे. तारळी, कृष्णा,उत्तरमांड या कार्यक्षेत्रातील कर्मचारी यांची 'चारो उंगली घी मे और सर कढई मे'असा प्रकार होऊन बसला आहे.असे झारीतील शुक्राचार्य प्रांतअधिकारी यांच्या चाणाक्ष नजरेने शोधून खड्यासारखे बाजूला काढणे गरजेचे असल्याचे मत तालुक्यातील जनतेतून व्यक्त होत आहे.

प्रांतअधिकारी व निवासी नायब तहसीलदार यांनी या अगोदर एका ठिकाणी एकत्रित महसूल अधिकारी म्हणून कार्य केले आहे.यामुळे या दोघांचे सूर चांगलेच जुळत असणार अशी चर्चा नागरिकांच्यात असल्याने कराड उत्तर व दक्षिण असा मोठा पसारा असणाऱ्या तालुक्याचे महसूल प्रशासन एकसंघ ठेवताना प्रशासकीय अधिकारी म्हणून एकजूट महत्वाची आहे.प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या मधील दुवा म्हणून नायब तहसीलदार यांची भूमिका निश्चितच निर्णायक असते.

 

'आण्णासाहेब' महसूल मंडलातच'

रावसाहेबांची मर्जी असली की हवे ते सर्कल आणि पाहिजे ती सजा असा समज काहींचा झाला असल्याने प्रांताधिकारी यांनी झटका देण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा आहे.मदतनीस व्यक्तीच्या जीवावर कार्यालय सोडून तालुक्याच्या ठिकाणी 'चिरीमिरी'साठी पर्यटन करणाऱ्या आण्णासाहेबांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.शहरातील 'पॉश'ठिकाणी वास्तव्य करून आलिशान गाडीतून गावचे महसुलचे कारभारी रावसाहेबांच्या तोऱ्यात वावरू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांची परवड होऊ लागली आहे.यामुळे एकाच महसुली मंडलात बदलीचा सिलसिला सुरू असतो.लांबची बदली मिळाली तरी 'डेप्युटेशन'वर कारभार करणारे बरेच महाभाग महसूल विभागात कार्यरत आहेत.