कराड सोसायटी मतदारसंघातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील - पृथ्वीराज चव्हाण

जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याठिकाणी समविचारी उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केले आहेत. त्यासाठी सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही भेटून त्यांच्याशी याविषयावर चर्चाही केली आहे. परंतु, त्याला कितपत यश येते, हे येत्या दोन दिवसात समजेल.

कराड सोसायटी मतदारसंघातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील - पृथ्वीराज चव्हाण

कराड सोसायटी मतदारसंघातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील 

पृथ्वीराज चव्हाण : कराड पालिकेत 'मलकापूर पॅटर्न' राबविण्याचे संकेत

कराड/प्रतिनिधी :

     जिल्हा बँक निवडणुकीत कराड सोसायटी गटातून दोन अर्ज असल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याठिकाणी समविचारी उमेदवारांमधील संघर्ष टाळण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही भेटून त्यांच्याशी याविषयावर चर्चाही केली आहे. परंतु, त्याला कितपत यश येते, हे येत्या दोन दिवसात समजेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

     येथील त्यांच्या निवास्थानी रविवारी ७ रोजी दुपारी पत्रकारांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही पक्षीय पातळीवरील नव्हे; तर सहकारातील निवडणूक आहे. दिवंगत विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे आणि माझे तात्विक मतभेद जरुर होते. मात्र, विलासकाका हे सहकारातील आणि जिल्हा  काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी ५४ वर्षे जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे कराड सोसायटी मतदारसंघात नक्कीच त्यांची ताकद आहे. यामुळे येथील समविचारी उमेदवारांमध्ये संघर्ष होऊ नये, अशी इच्छा असल्याने त्यादृष्टीने आपण प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

     ते म्हणाले, जिल्ह्यात दिवंगत किसनवीर आबा, लक्ष्मणराव तात्या अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधानानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबातील वारसांना त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदार संघातूनच संधी देण्यात आली होती. मात्र, विलासका उंडाळकर यांच्या वारसांबाबत तसे घडताना का दिसत नाही? हा मुद्दा घेवून आपण राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून त्यांच्यासोबत यावर सविस्तर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

     दरम्यान, डग्ज, अंमली पदार्थांची तस्करी, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरण यावर उपस्थित प्रश्नाच्या उत्तरादाखल बोत्लता ते म्हणाले, 20 हजार कोटींचे  हेरॉईन बंदरावर आलेल्या प्रकरणाला कोणी दडपलं? एवढी मोठी कंसायमेन्ट कोणी व कोणाच्या नावावर पाठवली होती? हे सर्व प्रकरण दडपण्यासाठी ड्रग्जचे प्रकरण काढले आहे का? तसेच मूळ प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे उद्योग सुरु आहेत का? या सर्व प्रकरणाची माहिती समोर आली पाहिजे. तसेच गुन्हा घडला असल्यास त्याची चौकशीही झाली पाहिजे. एनसीबी ही यंत्रणा पूर्णपणे केंद्र सरकारची आहे. त्या यंत्रणेने चांगले काम करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी आहे. तसेच वानखेडे प्रकरणात केंद्र सरकारने खरी माहिती द्यावी. वानखेडे प्रकरणात केंद्र सरकारने खरे सांगितले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कराड पालिकेत मलकापूर पॅटर्न

कॉंग्रेस पक्षाची  सर्वच निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवण्याची भूमिका आहे. त्यानुसार कराड नगरपालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी प्राथमिक चर्चा सुरु आहे. त्यामध्ये कराड पालिका पक्ष चिन्हावरच लढवावी, अशी त्यांचीही मागणी असून कराड पालिका निवडणूकीतही काँग्रेसकडून 'मलकापूर पॅटर्न' राबविण्याचे अप्रत्यक्ष संकेतही आ. चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना दिले.

 

कराड विमानतळाच्या २० किमी परिघामध्ये बांधकाम निर्बंधाचे आदेश केंद्रस्तरावरील आहेत. परंतु, त्यामुळे कराड व परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने याबाबत राज्यातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडेही सविस्तर माहिती उपलब्ध नाही.