जगाची पिडा वाळक्याच्या खांद्यावर, कोरोनाचा कहर , गरीबांच्या उरावर

संकटाला संधी समजायचे शेअर बाजाराचे तत्व माणूसकीचा घात करून ठेवेल. कलिंग देशात युद्धानंतर सम्राट अशोक जेव्हा युद्धभूमीवर गेला तेव्हा तेथील हाडामासाचे चिखल पाहून युद्ध जिंकल्याचा त्याला पश्चाताप झाला. त्याला वैराग्य आलं व त्याने राजधर्माचा त्याग केला ही आपल्या देशभूमीची परंपरा आहे. जर आपल्या सोबतचे जगच जर अंतर्धान पावलं तर जगण्याला तरी अर्थ उरतो का? मग कशाला इतका हव्यास ? आणखी एक गोष्ट प्रकर्षाने मांडावी वाटते ती म्हणजे आयुष्यभर सत्ता भोगणारे नेते नेमके काय करताहेत? निवडणूकीत शेकडो कोटी खर्च करताहेत, मटणाच्या पंगती उठवताहेत अन आता डाळ भात तरी देताहेत का? शासनाच्याच फंडातले शासनालाच मदत वर्ग करून देतायत. गंगेत उभं राहून तिथलीच ओंजळ उचलून हरहर गंगे करून तेच पाणी परत गंगेत सोडतात तसंच चाललयं! पदरचे काय दिले या लोकांनी? खूप कठोर लोकांवर खूप येडे होवून जनता प्रेम करते.

जगाची पिडा वाळक्याच्या खांद्यावर, कोरोनाचा कहर , गरीबांच्या उरावर

जगाची पिडा वाळक्याच्या खांद्यावर,
कोरोनाचा कहर , गरीबांच्या उरावर

सज्जन यादव (कवठे)

"संकटकाळी सौद्याची भाषा बोलू नये'' असे पूर्वापार म्हटले जाते. हा आमच्या संस्कृतीचा  रिवाज आहे. मात्र जसजसे कोरोनाचे संकट अधिकाअधिक गडद होत चाललयं तसतसा संस्कृतीचा हा रिवाज व मानवतेचा आवाज शिल्लक राहील का याबद्दल आता मात्र शंका दाटू लागलीय. कारण जसजसा लाॕकडाऊन वाढत चाललाय तसतसा महागाईचा निर्देशांक आभाळाला भिडायला लागलाय. 

अनेक वस्तूंचे भाव आत्ताच २५-३०% नी वाढलेत व हे रहाटगाडगं अजूनही किती दिवस चालेल? तोपर्यंत ते भाव अजून कुठे जातील? मग आधीच हाताचे काम थांबलेल्या हातावरील पोट असणाऱ्या गरीबांचे हाल काय असतील? त्यांना जगवणे हे सरकार आणि मानवतेच्या आवाक्यात असेल का? का यातून उत्क्रांतीचा भडका होवून जाईल अन गरीबी नव्हे तर गरीबच संपून जाईल! अशा शंका शक्यता निर्माण होवू लागल्यात. नुकतेच जागतीक आरोग्य संघटनेने (W.H.O) कोरोना पेक्षा भूकबळीने जगात जादा लोक मरतील व हा आकडा २७-३० कोटी इतका असेल असे भाकीत नुकतेच केलेय. पण ही परिस्थिती अन्नटंचाईमुळेच होईल असे नाही. सगळ्या जगात उडालेला हाहाकार पाहता काही दिवसातच आंतरराष्ट्रीय सामंजस्यही ढासळून जाईल व अत्यावश्यक वस्तूंच्या देवघेवीवर प्रत्येक जण निर्बंध आणेल किंवा कारणे सांगून देणे टाळेल. आफ्रिके सारख्या खंडात अगोदरच दरवर्षी हजारो लोक भूकबळीचे शिकार ठरतात. विकसित देशांतही गरीबीचा इंडेक्स मोठा आहे. गरीबाची दुनिया नाही असं उद्वेगाने नेहमी म्हटले जाते पण ते का याचे उत्तर एकंदर सध्याच्या वर्तमानाने अधोरेखित केलयं! मूळात दिवसभर सूर्याखाली अंग पोळून घेतल्याशिवाय गरीबाला संध्याकाळी आपले पोट थंड करता येत नाही. जागतीक महामारी प्रथमच आली असेल पण गरीबाच्या जीवनात रोजचीच महामारी असते. काम करून घाम पुसत पुसत मिळालेला रोज घेऊन सायंकाळी घरी जाता जाता एखाद्या दुकानाकडे वळायचं ,१० रू.ची चटणी, १० रू.चा चहा , १० रू.चा साखऱ्या , प्लॕस्टिक पिशवीला दोऱ्याने बांधून २० रू.चे गोडत्याल , डाळ, मसाला त्याच फडक्यात बांधून त्याला घामाचा सुगंध द्यायचा अन् ते चिटूक मिटूक घेऊन जायचं तेव्हाच चूल पेटणार व मगच मूलही हसणार अशी परिस्थिती.नाष्ट्याचे जिन्नस अन् मिठाईचा तर सहसा वासही नाही. जग खातं त्या पदार्थांची नांवेही त्याला ठाऊक असतात का नाय कुणास ठाऊक? डाळभात व चटणीभाकरी हेच त्याच्या पाचवीला पूजलेले भूकलाडू व तहानलाडू . 

'गरीबाचे दाणे पसाभर ,श्रीमंतांचे मोती घरभर'

त्याप्रमाणे सगळी जिंदगी भाकरीचा चंद्र शोधण्यातच संपते पण लख्ख पोर्णिमेचा चंद्र त्याला कधी दिसतच नाही. सुखासिन माणसांना रोज लाॕकडाऊन असला तरी काय फरक पडणार नाही ; पण गरिबाला एखादी विश्रांतीही परवडत नाही. म्हणून आजारही पाठीवर टाकून कष्टाला कवटाळण्याला तो नेहमीच प्राधान्य देतो. त्याला जगण्याची काळजी नसते तर काळजीपूर्वक जगायच असतं. कारण त्याला कधी भरपगारी रजा नसते. काम नसेल तवा चुलीवरचा तवा तापेल का नाय याची शाश्वती नसते.काल केलेलं कालच खतम झालेलं असतं. 

पैशाचे नाटक अन् भुकेचे सांत्वन

करता येत नाही.दुखलं खुपलं तर डोकशीला लावायला आणलेलं बाटलीच्या तळाला जावून बसलेलं *खोबरेलत्याल* हे त्याचं औषध. मार्च एण्डिंगच्या बजेटमुळे त्याच्या जीवनात काय वेगळं कधीच घडत नाही. उलट प्रत्येक बजेट त्याचे बजेट बिघडवून टाकते. कारण शीणवटा घालवायसाठी कधीतरी त्याला टाकभर घ्यावी लागते तेव्हा तीही नाव्वान्नाव दर बजेटगणिक महाग झालेली असते.अशी ही गरीब जात आज आयुष्यातील सर्वात अवघड परीक्षा देते आहे. 

कोरोना मुळे नव्हे तर त्याच्या आडून भडकत चाललेल्या महागाईमुळे

 ही परिस्थिती ओढवत चाललीय त्यामुळे W.H.O ने जे सांगितलय त्या दिशेने तर जग चालले नाही ना? असेच वाटायला लागलेय.कोरोना हे जगापुढील एक अनोळखी संकट आहे. अजून किती दिवस जगाच्या माथ्यावर ते मुक्कामी  असेल हे अनिश्चित आहे .अख्ख्या जगावर एकाचवेळी असे संकट यापूर्वी बहुतेक कधी आले नसावे. त्यामुळे अवघे जग सुन्न होणे हा जगासाठी पहिलाच कठोर अनुभव असावा. निसर्गाचा रोष इतका भयंकर असतो की शेवटी विज्ञानालाही दोष देण्यावाचून पर्याय नसतो. हा कोरोना तसाच आहे. एका बटणावर क्षणात हजारो जीव घेता येतील असली शस्त्रे विज्ञानाच्या सहाय्याने जगाने विकसित केली पण माणसं जगवायला , वाचवायला एखादे असे बटण विज्ञानाला शोधता आले नाही. याचा प्रगत देशांसह सर्वांनाच आज पश्चाताप होत असेल. मूळात जगातले अनेक देश आजही अन्नधान्य उत्पन्नात स्वयंपूर्ण नाहीत. अशा देशांना इतर देशातून आयात करून आपली भूक भागवावी लागते. त्यातच महापूर , दुष्काळ यासारख्या निसर्गकोपाचे तांडव सतत कोठे ना कोठे चालू असतेच त्यामुळे भूक हा अव्वल दर्जाचा जागतीक प्रश्न होवू पाहतोय. पण त्याहून गंभीर एक प्रश्न आहे तो म्हणजे अतिरिक्त वा पुरेसा साठा असूनही अनियंत्रित विपणनामुळे त्याचे दर वेगाने वाढू लागलेत. सर्वच देशातील निर्यात आज थांबलेली असतानाही हे भाव वाढत असतील तर उद्या जग सुरळीत होईल व मागणीप्रमाणे मालांची निर्यात सुरू होईल तेव्हा ते दर काय असतील? तेव्हा गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीय सुद्धा महागाईचे भक्ष ठरतील. रेशनवर अल्प किंमतीत केवळ गहू व तांदूळ दिला म्हणजे सरकारची जबाबदारी संपली किंवा गरीबांची अडचण दूर झाली असे नाही. जगण्यासाठी अजून बराच मोठा शिदा लागतो व त्याच्या दरावर सरकारने काटेकोर लक्ष ठेवले पाहीजे अन्यथा कोरोनात अडकलेल्या व्यवस्थेच्या हतबलतेचा व जनतेच्या अडचणींचा लाभ उठवण्याचे काम घावूकपणे सुरू होईल नव्हे तर सुरूच झाले आहे. व कोरोना गेला तरीही 

माणुसकीची ही तूट पुढे काही दिवस टाळूवरील लूट सुरूच ठेवेल. 

केवळ कोरोना बाधीत व त्याच्या संपर्कात आलेले लोक शोधण्यात सरकारची शक्ती शीण होत चाललीय. अनेक संस्था , दानशूर मंडळी जनता व सरकारच्या मदतीला उभी ठाकल्यात पण त्याच्या मर्यादा उघड्या पडू लागल्यात. त्यामुळे दिवस जातील तसतसे भीषणतेच्या लाटा आणखी उचंबळत राहतील. त्या भविष्याचा वेध आजच घेणे गरजेचे आहे. 

"लाॕकडाऊन और बढाना पडेगा" किंवा "तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो" 

केवळ असे म्हणून चालणार नाही.  रस्त्यावरील लोंढे धोपटून चालणार नाही. त्या लोंढ्यामध्ये काहीतरी अस्वस्थता आहे. आर्त भावना आहे. उद्याच्या तेलमिठाची भ्रांत आहे. गांवात रोजगार नव्हता म्हणून शहराकडे गेलेला लाखोंचा मजूर उपासमारीच्या भितीने आज पुन्हा गांवात येवू लागलाय. उद्या गांवातला मजूर त्याच भितीपोटी शहराकडे जाईल पण लगेच परिस्थिती सुरळीत होणार नाही त्यामुळे मिळेल त्या पुंजीवर त्यांना काम करावे लागेल तेव्हा कसेबसे जगणेही अवघड होईल कारण भडकलेली महागाई हे वास्तव असेल. मग घरातील आजारपणं, मुलांची शिक्षणं, प्रासंगिक खर्च हे सारं पराधीन असेल. त्यामुळे सरकारने या गोष्टीकडेही आतापासूनच लक्ष द्यायला हवयं! साठेबाजी करून दरवाढ करणाऱ्या संकटकालीन माफीयांवरही सरकारची नजर असायला हवी अन्यथा टंचाईच्या व पुरवठ्याच्या खोट्या जुजबी कारणास्तव अव्वाच्या सव्वा वाढणारी महागाईच कोरोना अगोदर गरीबांचा जीव घेईल व नंतर हा मोर्चा मध्यमवर्गीय मानवजातीकडे वळेल. उद्योग सुरू होतील, रोजगार काहीसा सुरळीत होईल, सरकार पॕकेज देईल पण त्याइतकीच गरज आहे ती विपणनातील काळाबाजार रोखण्याची. सरकारी पगार ,भत्ते याचेही आकडे काही काळापुरते लहान करण्याची गरज आहे. देशाचे अस्तित्व पणाला लागले असताना यांवर कुरकूर करण्याचा अधिकार कुणालाच नाही. जगण्यासाठी कुणाला कुणाच्या तोंडाकडे पाहायला लागू नये. सारा देश सन्मानाने जगणे महत्वाचे आहे.घरात थांबून कोरोनाविरूद्ध लढणारांसाठी असंख्य हात या आणीबाणीतही शेतात राबताहेत पण त्यांचा माल बाजारात जावू शकत नाही. फळे भाज्या फुले हे बांधावरच सडून जायला लागलीत. त्यासाठीचे कर्ज , मशागत , कष्ट सारं काही पाण्यात गेलंय. ते पुन्हा नव्याने उभं करायचय, मुलांना शिकवायचय, जित्राबांना जगवायचय, व हे करत असताना स्वतःच्या अस्तित्वावर मात्र प्रश्न उभे राहीलेले शेती/शेतकरी व अनेक घटक आहेत. त्याची आज काळजी वाहणे ही अखिल मनुष्यजातीची आद्य जबाबदारी आहे. काळ कसोटीचा आहे. सरकार माझ्या उद्योगधंद्यासाठी काय करतय का? याचा विचार करणे गैर आहे असे नाही पण ज्यांच्याकडे कष्ट हीच पुंजी असते त्याच्या देहालाही उद्योगाचा दर्जा देवून काहीतरी पॕकेज देणेची गरज आहे. अशी परिस्थिती  प्रथमच निर्माण झालीय. ती भागली तरच यापुढच्या जगाला अर्थ असणार आहे. अन्यथा उरलेलं जगं हे निव्वळ नखरेबहादरांचेच असेल. हे दीर्घकाळ चाललं तर त्यामुळे गरीब जातीचे काही प्रमाणात उच्चाटन झालेले असेल. असे होवू द्यायचे नाही हेच सध्या मानवतेपुढील आद्य कर्तव्य असले पाहीजे.