कराड तहसील मधील गौणखनिज परवानग्या तपासा..!

सर्वच गौण खनिज उपशांची चौकशी गरजेची.

कराड तहसील मधील गौणखनिज परवानग्या तपासा..!
कराड तहसील मधील गौणखनिज परवानग्या तपासा..!

कराड तहसील मधील गौणखनिज परवानग्या तपासा..!

सर्वच गौण खनिज उपशांची चौकशी गरजेची.

अनिल कदम/उंब्रज

कराड तालुक्यातील मुरूम उपशाबाबत दै.प्रीतिसंगमने प्रकाशित केलेली  महसुलचा गोलमाल ही वृत्त मालिका  नागरिकांच्यात अन्यायाविरुद्ध उठाव निर्माण करण्यासाठी चैतन्य निर्माण करणारी ठरली आहे.महसूल कर्मचारी कोरोना महामारीच्या नावाखाली गत सहा महिन्यांपासून नागरिकांना वेठीस धरत आहेत.महसूल मधील काही प्रामाणिक कर्मचारी इमानेइतबारे आपले काम करीत असून काही झारीतील शुक्राचार्य कोरोना महामारीला वरकमाई करण्याची सुवर्णसंधी म्हणून वापर करीत आहेत.यामुळेच मुरूम उपशा सारख्या घटनांना बळकटी येऊन शासन महसुलाचे अतोनात नुकसान होत आहे.यामुळे कराड तहसील मधील दिलेल्या गौण खनिज उपशाच्या सर्वच परवानग्या तपासण्याची गरज असून सर्वच गौण खनिज उपशांची चौकशी करणे क्रमप्राप्त असल्याची नागरिकांची चर्चा आहे.

कराड तालुक्यातील गावांमध्ये सजामध्ये गावकामगार तलाठी हजर नसणे,नागरिकांना दाखले अथवा उताऱ्यासाठी ताटकळत ठेवणे,वारस नोंदी रखडवने अशी कामे करून घेण्यासाठी चिरीमिरी मागणे यासाठी मुद्दाम कामाला विलंब लावणे असे प्रकार नित्याचेच झाले असून सर्वसामान्य नागरिक या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने महसूल मधील कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.महसूल सजा मध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची खबर तसेच अवैध गौण खनिज उपसा याची इत्यंभूत माहिती गावकामगर तलाठी,कोतवाल यांना असते परंतु सवईला चटावलेली यंत्रणा नागरिकांचे शोषण करण्यातच धन्यता मानत आहे.

कराड तालुक्यातील उत्तर व दक्षिण विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी बेमालूमपणे मुरूम,दगड व माती उपसा झाला आहे.तर काही ठिकाणी फक्त नाममात्र रॉयल्टी चलन भरले असून अमर्याद मुरूम उपसा झाला आहे.कराड दक्षिण मधील असंख्य नागरिकांनी दै. प्रीतिसंगम च्या वृत्त मालिकेची दखल घेत उंडाळे परिसरातील अवैध गौण खनिज उपशाच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे.यामुळे उंडाळे भागात महसूल प्रशासन फक्त वसुलीलाच येत असल्याची कैफियत अनेकांनी मांडली आहे या सर्व बाबींचा उलगडा या वृत्त मालिकेत दै प्रीतिसंगम करणारच आहे.

शेरे,शेणोली,वहागाव,कामथी, संजयनगर(शेरे),टाळगाव या परिसरात महसूल विभागाने दिलेल्या मुरूम व दगड उत्खनन परवानग्या अनेक ठिकाणी तक्रारींमुळे गाजल्या आहेत. परंतु स्थानिक पातळीवर सेटिंग करून महसूल कर्मचारयासह ठेकेदारांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. यामुळे शासनाला लाखो रुपयांच्या महसुलाला गंडा घातला गेला असून सातारा जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे गंभीरपणे लक्ष दिले तर अनेकांचे बिंग फुटले जाईल आणि शासकीय महसुलाची होणारी चोरी रोखली जाईल अशी मागणी कराड तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

 

३८ मुरूम उपशांचा पाठपुरावा करणार

कराड तहसील कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तालुक्यातील दक्षिण व उत्तर मतदारसंघात ३८ ठिकाणी मुरूम व दगड उपसा आणि वाहतुकीसाठी कराड तहसील कार्यालयाने परवानगी दिलेली आहे या सर्वच ठिकाणी कमी रॉयल्टी आणि परवानगी पेक्षा जादा उपसा असे प्रकार घडले आहेत सर्वच ठिकाणांचा आढावा दै.प्रीतिसंगम बातमीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे यामध्ये कोणताही मुरूम उपसा आणि त्याची नियमावली यातील फरक तसेच नागरिकांच्या तक्रारी यांचीही बाजू महसुलसह जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.

 

तक्रारींची दखल घेतली नाही

दै.प्रीतिसंगमने महसुलचा गोलमाल ही महसूल विभागाची पोलखोल करणारी वृत्त मालिका प्रसिद्ध केल्यानंतर अवैध गौनखनिज उपशा विरुद्ध तक्रार करणारे कराड तालुक्यातील जागरूक नागरिक दै.प्रीतिसंगमने रोखठोक भूमिका प्रसिद्ध केल्याबाबत अभिनंदन करीत आहेत.बहुतांश जणांच्या तक्रारींना महसूल विभागाने केराची टोपली दाखवली होती.तर काही तक्रारदारांना ठेकेदारांनी दमबाजी करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता.यामुळे दडपशाहीला घाबरलेल्या नागरिकांचा आवाज बनून सदरची वृत्तमालिका बेधडक सुरू ठेवल्याने खाजगीत अनेकांनी दै प्रीतिसंगमचे कौतुक केले आहे.