कराडकरांसाठी राष्ट्रीय उपशास्त्रीय व सुफी संगीत महोत्सवाची पर्वणी

कराडकरांसाठी राष्ट्रीय उपशास्त्रीय व सुफी संगीत महोत्सवाची पर्वणी

27 व 28 रोजी आयोजन : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचा उपक्रम, नागरिकांसाठी नाट्य संगीताचीही मेजवानी 

कराड/प्रतिनिधी : 
                        भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने कराड येथे दोन दिवसीय राष्ट्रीय उपशास्त्रीय आणि सुफी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय उपशास्त्रीय आणि सुफी संगीत महोत्सव होणार असून दुसऱ्या दिवशी सायंकाळी नाट्य संगीत संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्कृती मंत्रालय भारत सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे संचालक दीपक खिरवडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 
                        येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे बुधवारी 27 व गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत हा संगीत महोत्सव पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आवर कल्चर हे असून बुधवारी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय उपशास्त्रीय आणि सुफी संगीत महोत्सव होणार असून त्यामध्ये गीत-ए-महफिल या कार्यक्रमात हिंदी कव्वाली आणि सुखी गाण्यांची मैफल रंगणार आहे. त्यामध्ये प्रसिद्ध गायक गौरव दांडेकर, स्नेहा कुलकर्णी-दांडेकर, अजित विसपुते, भाग्यश्री अभ्यंकर गीत गायनाचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना सचिन जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांची उत्कृष्ट संगीत साथ लाभणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती विद्याधर ज. रिसबूड यांची असून कार्यक्रमाचे निवेदन गौरी भिडे या करणार आहेत. 
                         तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी नाट्य संगीत संध्या या कार्यक्रम होणार असून त्यामध्ये नागरिकांसह कलारसिक व नाट्य संगीतप्रेमींना मराठी संगीत नाटक परंपरेतील नाट्यसंगीताच्या मैफिलीचीही मेजवानी मिळणार आहे. या मैफिलीत प्रसिद्ध गायक ओंकार प्रभूघाटे, निमिष कैकाडी, नीलाक्षी पेंढारकर आणि पंडित सुरेश बापट हे गीत गायनाचे सादरीकरण करणार आहेत. धनंजय पुराणिक हे त्यांना तबल्याची उत्तम साथ देणार असून मकरंद कुंडले हे संवादिनीचे काम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदक गौरी भिडे आणि सौरभ सोहनी हे असणार आहेत. 
                          तसेच या संपूर्ण कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून या संगीत महोत्सवाचा लाभ शहरातील नागरिकांसह तालुक्यातील कलारसिक व संगीत नाट्यप्रेमींनी घ्यावा, असे आवाहनही  खिरवडकर यांनी केले आहे.