कराड तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी क्रशर सील

प्रांताधिकारी व तहसीलदार यांची धडक कारवाई

कराड तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी क्रशर सील
खडी क्रशर विद्युत डी पी सील करताना महसूल कर्मचारी
कराड तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी क्रशर सील

कराड तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी क्रशर सील

प्रांताधिकारी व तहसीलदार यांची धडक कारवाई

उंब्रज/प्रतिनिधी

नांदलापूर कालगाव ता.कराडसह तालुक्यातील खडी क्रशर चालू असणाऱ्या गावच्या हद्दीत अवैधरित्या उत्खनन होत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी बाबत कराड प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली असून प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांच्या पथकाने बुधवार दि.१५ रोजी धडक कारवाई करीत अवैध रित्या चालू असणारे गौण खनिज उत्खनन थांबवले आहे.तसेच पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून गेल्या तीन वर्षात पहिलीच मोठी कारवाई महसूल विभागाने केली असल्याने १ सप्टेंबर नंतर प्रशासनाच्या 'उत्तम' कारभारामुळे जनतेच्या डोळ्यात 'आनंद' दिसू लागला आहे.कराड तालुक्यातील सर्वच खडी क्रशर धारकांनी आवश्यक कागदपत्रे,परवानग्या भरलेली रॉयल्टी चलने यांची माहिती दोन दिवसात जमा करण्याचे आदेश प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांनी दिले आहेत.

अवैध गौण खनिज उत्खनन आणि खडी क्रशर याबाबत कराड तालुक्यातील जनतेत नेहमीच असंतोष निर्माण होत आहे.पर्यावरणाची हानी होऊन नैसर्गिक साधन सामग्रीचे नुकसान होत असल्याबाबत सामाजिक संघटना तसेच कार्यकर्ते अनेकवेळा आक्रमक झाले होते.परंतु गत दोन वर्षांच्या कार्यकाळात तत्कालीन कराड तहसीलदार यांनी बोटचेपे धोरण स्वीकारल्याने नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली होती.यामुळे प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांच्या कारवाईचे स्वागत नागरिकांच्यातून होत आहे.तसेच अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

शासन नियमांची अवहेलना करून अवैध गौण खनिज उत्खनन करणारे तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असून विनापावती गौण खनिज खरेदी करणारे यांच्यावर स्थानिक मंडलाधिकारी,गावकामगार तलाठी यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करणार आहे.यामुळे कोणीही चोरटी वाळू अथवा गौनखनिज विनापावती खरेदी करू नये

आनंदराव देवकर
प्रभारी तहसीलदार, कराड