उदयदादा उत्तरेला विसरू नका...!

कार्यकर्त्यांची साद,कमी झाला संवाद

उदयदादा उत्तरेला विसरू नका...!

कराड / प्रतिनिधी

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे दिवंगत माजी आमदार,मंत्री,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर(काका) यांचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्राबल्य जिल्ह्याच्या राजकारणात कोणीही विसरू शकत नाही.उत्तरेच्या ताकतीवर दक्षिणेत राजकारण करण्यात काका वाकबगार असल्याची चर्चा आजही घडत असते.सुमारे वीस ते तीस हजारांचा निर्णायक मतांचा संच कायमच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काकांना साथ देत होता यामुळे दक्षिणेच्या राजकारणात 'एकमेकांना अप्रत्यक्षपणे मदत करण्याची राजकीय भूमिका पार पाडली जात होती'तुम्ही तुमचे राजकारण करा मी माझे राजकारण करतो असा अलिखित करारच झाला होता असेही जुने जाणते कार्यकर्ते खाजगीत चर्चा करीत असतात.

काकांच्या निधनानंतर पस्तीस वर्षानंतर राजकारणाचा उलटा प्रवास झाल्याचीच चर्चा घडत असून कराड उत्तरची नेतेमंडळी दक्षिणेत भाजपचे नेते अतुल भोसलेंना हाताशी धरून उदयसिंह पाटलांना दक्षिणेत चारी मुंड्या चित करण्यासाठी धडपडत असल्याची वावटळ उठली आहे.यामुळे काका समर्थक उदयदादांनी उत्तरेतील गट पुन्हा सक्रिय करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पूर्ण ताकतीने लढावे यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

कराड उत्तरमधील काँग्रेसच्या गोटात सध्या शांतता असून पक्षाची नेतेमंडळी आपापली कामे करून घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जात असल्याने उत्तरेतील काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले असल्याची चुणूक कराड दक्षिण मधील एका कार्यक्रमात सज्जन यादव यांच्या भाषणातून उल्लेखित झाले आहे.यामुळे काकांच्याच भाषेत सांगायचे झाले तर दक्षिणेचा मार्ग उत्तरेतून जात असून यासाठी उदय दादांनी जाणीवपूर्वक हालचाल करणे गरजेचे आहे असेही काही कार्यकर्ते खाजगीत सांगत आहेत.

काका हयात असे पर्यत उत्तरेतील काका गटाला ताकत देण्याचे काम केले जात होते मग ते कोयना संघाच्या अध्यक्षपदी नेमणूक असो अथवा खरेदी विक्री संघाचे पद किंवा पंचायत समितीचे मानाचे पद असेल कार्यकर्त्यांचा सन्मान होत होता यामुळे काकांच्या विचारला उत्तरेतून बळकटी मिळत होती आणि पर्यायाने एक दबावगट निर्माण होऊन दक्षिणेची वाट सुखर होत होती यामुळे उदय दादांनी उत्तरेत सक्रिय होऊन गटाला चालना दिली तरच दुसऱ्याच्या दावणीला जाणारे कार्यकर्ते स्वगृही परतणार आहेत अन्यथा वैरणीच्या नादात मेहनतीला कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत