कराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ

कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीत तीन जिवंत ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकांच्या गळाला हे बॉम्ब लागले. कराड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केला आहे. तसेच दहशतवाद विरोधी पथकही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडूनही अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. सदर बॉम्ब सैन्य दलातील असल्याचा प्राथमिक अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

कराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ
ग्रेनेड हातबॉम्ब (संग्रहित फोटो)
कराड तालुक्यात ग्रेनेड हातबॉम्ब सापडल्याने खळबळ 

कराड/प्रतिनिधी : 

           तांबवे ता. कराड येथील नदीत ग्रेनेड हातबॉम्ब सापडले आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कोयना नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकांच्या गळाला चक्क तीन ग्रेनेड हातबॉम्ब लागले. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. याबाबतची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.

           याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड-पाटण मार्गालगत तांबवे ता. कराड येथील कोयना नदीवरील पुलानजीक साकुर्डी फाट्याच्या बाजूला नदीपात्रात काही युवक सोमवारी सकाळी मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यांनी मासे पकडण्यासाठी नदीच्या पाण्यात गळ टाकला. काही वेळाने गळाला मासा लागल्याच्या अंदाजाने त्यांनी गळ पाण्याबाहेर काढला. यावेळी त्यांच्या गळाला ग्रेनेड हातबॉम्ब लागल्याचे दिसून आले. गळाला लागलेले हातबॉम्ब पाहून त्या युवकांचीही काही काळ भंबेरी उडाली. संबंधित युवकांनी याबाबतची कल्पना पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करण्याचे काम सुरु केले आहे. 

            दरम्यान, कराड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ याबाबतची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला दिली. त्यांनतर या पथकाने घटनास्थळी दाखल होत याप्रकरणी अधिक माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. नदीपत्रात सापडलेले ग्रेनेड हातबॉम्ब सैन्य दलातील असावेत, असा प्राथमिक अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने तांबवे, साकुर्डी गावात भीतीचे वातावरण पसरले असून तालुक्यासह जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.