कराड-विटा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात नागरिकांचा रास्तारोको

कराड-विटा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात नागरिकांचा रास्तारोको

कराड/प्रतिनिधी : 

                         गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने शहर, तालुक्यासह जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे कराड ओगलेवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील सखल भागात पाणी साचून नांगरेनगरमधील काही घरे बाधीत झाली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी सकाळी कराड-विटा रस्त्यावर रास्तारोको केला. तसेच महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

                       मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कराड-विटा रस्त्यावरील कराड-ओगलेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच या रस्त्यासह आसपासच्या काही घरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हा भाग पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. 

                     कृष्णा नाका ते ओगलेवाडी दरम्यान वारंवार पावसाचे पाणी साठण्यामुळे नागरिकांना आजारपणाबरोबरच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर घरात पाणी शिरल्याने लोकांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी सकाळी 10 वाजता रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उभे राहून रास्ता रोको आंदोलन केले.