उत्तरप्रदेशमधील बलात्कारीत मुलीच्या अत्याचाराचा कराडला महिलांकडून निषेध

उत्तरप्रदेशमधील बलात्कारीत मुलीच्या अत्याचाराचा कराडला महिलांकडून निषेध

 

कराड/प्रतिनिधी :

हाथसर (उत्तर प्रदेश) येथे पिडीत दलित तरुणीची सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाली. या घटनेचा मिळून साऱ्याजणी, सौ. जाई यशवंतराव मोहिते महिला नागरी सहकारी पतसंस्था व इनरव्हील क्लब कराड यांच्यावतीने कराडमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून महिलांनी निषेध नोंदवला. व डॉ. सविता मोहिते, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा छाया पवार, ऍड. वंदना कोरडे, सरृती जोशी, वृषाली पाटणकर, विजयाश्री पाटील, संगिता पाटील, विजया पाटील, राजश्री सुतार, उजवला यादव, उमेरा मुल्ला, सविता यादव, स्वाती माने तसेच भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना याबाबतचे निवेदन दिले. 

निवेदनामध्ये म्हंटले आहे की, महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर व जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेचा अभिमान असलेल्या आपल्या देशात उत्तर प्रदेश येथे १९ वर्षीय दलित पिडीत महिलेवर घडलेली घटना अतिशय लांच्छनास्पद असून, आपल्या देशाच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. 

पिडीत दलित महिला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याऐवजी ज्या तऱ्हेने रात्रीतून त्या महिलेच्या देहावर क्रियाकर्म घडवून आणले. हे सर्व देशातील सर्वसामान्य जनतेचे कायदा व न्याय व्यवस्था यावरील विश्वास समूळ उखडून टाकणारे आहे. आपण या लोकशाही संस्थेचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे समस्त महिला परिवाराच्यावतीने आम्ही आपणाला विनंती करू इच्छितो, ज्या महिलेच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची व ओघाने देशाची संस्कृती, समृद्धी व सभ्यता अवलंबून आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जास्तीत जास्त कडक व प्रभावी उपाययोजना त्वरीत अंमलात आणावी. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. पिडीत दलित कुटुंबाला संरक्षण, नुकसान भरपाई व न्याय मिळावा. तसेच संबंधित पोलीस व प्रशासकीय अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर खटला भरण्यासाठी आग्रही रहावे. भविष्यात महाराष्ट्रात किंवा इतर कोठेही असे प्रकार घडू नयेत याबाबत दक्षता घेण्यात येऊन कठोर कारवाईची अंमलबजावणी व्हावी.

डॉ. सविता मोहिते म्हणाल्या, अतिशय घृणास्पद व अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. १९ वर्षीय मनीषावर शेतात गवत काढत असताना समाजव्यवस्थेने सामुहिक बलात्कार केला आहे. तिचा मणका मोडून जीभ कापून वाचा बंद केली. समस्त संवेदनशील जनतेसाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. ही मुलगी मागासवर्गीय होती. तिच्याबाबतचा गुन्हा केवळ बलात्काराऐवजी फक्त छेडछाडीचा दाखल केला गेला हेही फारच क्लेशदायक आहे. न्याय, कायदा, धर्म सर्व धाब्यावर बसवून रात्रीतून शासकीय यंत्रणेचा वापर करून इतमानाने तिच्यावर क्रियाकर्म करून सर्व पुरावे नष्ट करण्यात आले. ज्या देशात संस्कृती आणि संस्काराच्या आपण वलग्ना करतो. व राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करतो. त्याच्या पायात समस्त महिला वर्गाचीच नव्हे तर देशाची अस्मिता व न्याय व्यवस्था गाडली गेली असे म्हणायला हरकत नाही. महिलांपेक्षा पुरुषवर्गाने संवेदनशील होणे जास्त गरजेचे आणि त्यांनी खरं म्हणजे जास्त संख्येने रस्त्यावर येऊन त्या कृत्याचा निषेध नोंदवणे व जागृत करणे जास्त महत्वाचे आहे. कारण त्यांच्या बहिणीवर व त्यांच्या आईवर हा अमानुष बलात्कार करणारेही तेच आहेत. उपस्थित पुरुष मंडळींना ह्या लढ्यात सहभागी होण्याची, जबाबदारी घेण्याची विनंती करते.