कराडात मुख्य बाजारपेठेत युवकांच्या दोन गटात राडा

शहरात युवकांच्या दोन गटात राडा झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील मोमीन मोहल्ला परिसरात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कराडात मुख्य बाजारपेठेत युवकांच्या दोन गटात राडा
संग्रहित फोटो

कराडात मुख्य बाजारपेठेत युवकांच्या दोन गटात राडा 

मोमीन मोहल्ला परिसरतील घटना :  एकजण जखमी, शहरात घबराटीचे वातावरण

कराड/प्रतिनिधी :

          शहरात युवकांच्या दोन गटात राडा झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील मोमीन मोहल्ला परिसरात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

          याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मोमीन मोहल्ला परिसरात सोमवारी 21 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास युवकांच्या दोन गटात राडा झाला. या परिसरातील बॅंक ऑफ इंडीयाच्या गेटसमोर मोमीन मोहल्ला येथील काही युवक थांबले होते. त्यावेळी त्याठिकाणी शुक्रवार पेठेतीलही काही युवक आले. त्यादोन गटांमधील युवकांनी एकमेकाकडे पहिल्याच्या कारणावरून त्यांच्यात शब्दीक चकमक उडाली. त्यातून वाद वाढत गेला. याप्रसंगी झालेल्या आरडाओरडा ऐकून मोमीन मोहल्ला परिसरातूनही काही युवक धावत आले. त्यानंतर बॅंक ऑफ इंडीयाच्या शाखेपासून शुक्रवार पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिघा-चौघांनी एकास अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार शहराच्या  मुख्य बाजारपेठेत सुरू होता. त्यामुळे तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना  देण्यात आली. 

           घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातून पोलिसांची मोठी गाडी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याने सायरन वाजवत घटनास्थळी पोचली. त्याठिकाणी पोलीस गाडी पोहोचल्याचे पाहून युवकास मारहाण करणाऱ्यांनी तेथून पलायन केले. या मारहाणीत एकजण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतु, पोलिसांनी सदर घटनेची नोंद घेतली होती. 

           दरम्यान, शहरात काही दिवसांपूर्वीच झालेल्या दोन खुनाच्या घटनांनी शहरासह तालुका हादरला असतानाच सोमवारी भर दुपारीच शहराच्या मुख्य बाजारपेठेत झालेल्या युवकांच्या दोन गटातील राड्याने  मोमीन मोहल्ला परिसरासह शहरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.