कराडमध्ये स्कूल ऑफ जर्नालिझम सुरू व्हावे - डॉ. अतुल भोसले

कराडमध्ये स्कूल ऑफ जर्नालिझम सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांचीच एक कमिटी तयार करून एखादी एनजीओ स्थापन करावी. यामाध्यमातून जर्नालिझम सुरू करावे. त्याला अनेक सामाजिक संस्था हातभार लावतील. तसेच स्कुल ऑफ जर्नालिझम उभे करण्यासाठी प्राचार्य डॉ. सतीश घाडगे यांनीही आपले योगदान द्यावे.

कराडमध्ये स्कूल ऑफ जर्नालिझम सुरू व्हावे - डॉ. अतुल भोसले

कराडमध्ये स्कूल ऑफ जर्नालिझम सुरू व्हावे

डॉ. अतुल भोसले : डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळा संपन्न 

कराड/प्रतिनिधी :

          कराडमध्ये स्कूल ऑफ जर्नालिझम सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांचीच एक कमिटी तयार करून एखादी एनजीओ स्थापन करावी. यामाध्यमातून जर्नालिझम सुरू करून त्यामध्ये पत्रकारांव्यतिरिक्त कोणाचाही हस्तक्षेप राहणार, नाही याची दक्षता घ्यावी. या  एनजीओला  अनेक सामाजिक संस्था हातभार लावतील. परंतु, स्कुल ऑफ जर्नालिझम उभे करण्यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे यांनीही आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केली. 

         येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात गुरुवारी ६ रोजी पत्रकार दिनानिमित्त आयोजित  पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाडगे होते. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रमोद सुकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

         डॉ. अतुल भोसले म्हणाले, लोकशाहीला उभा करणारा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. काळानुरूप पत्रकारिता बदलत गेली. त्यानुसार जांभेकर, टिळकांनंतर आता कलियुगात बदलत गेलेली पत्रकारिता पहायला मिळते. अनेकदा पूर्वीच्या आणि आत्ताच्या पत्रकारितेची तुलना केली जाते. परंतु, त्यावेळचा समाज आणि आजचा समाज यात खूप मोठा बदल असून त्यानुसार पत्रकारांनीही समाजाचा आरसा म्हणून पत्रकारिता केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

       ते म्हणाले, बदलत्या काळानुसार प्रिंट मीडियासह इलेक्ट्रिक व सोशल माध्यमांचेही महत्त्व सर्वांना समजले आहे. या सर्व माध्यमांनी लोकमान्य होऊन काम करण्याची गरज असून ती खरी पत्रकारांचे कसोटी आहे. तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून वैयक्तिक मत व्यक्त न करता समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, याची जाणीवही पत्रकारांनी ठेवली पाहिजे. समाजामध्ये डॉक्टर आणि पत्रकारांना एखादी चूक करायला फार कमी जागा आहे. डॉक्टरांकडून चूक झाल्यास ती केवळ एखाद्या व्यक्ती पुरती मर्यादित राहते. परंतु,  पत्रकारांकडून एखादा शब्द चुकीचा गेल्यास दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. याचीही जाणीव पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. 

        ते पुढे म्हणाले, कोरोना काळात पत्रकारांनी स्वतःच्या जीवावर बेतेल अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे सर्वच पत्रकार खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कृष्णा हॉस्पिटलने पत्रकारांना सहकार्य केले. त्यानंतरही हॉस्पिटलने पत्रकारांना वेळोवेळी मदत केली आहे. सध्या, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संसर्गाविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे. याकडे दुर्लक्ष न करता सर्वांनी स्वतःसह कुटुंबाचीही काळजी घ्यावी. कृष्णा हॉस्पिटलमध्ये पत्रकारांसाठी 10 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु, हा कोरोनाचा शेवट टप्पा असल्याचे मानले जात असले. तरीही यामध्ये जोखीम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

           दरम्यान, याप्रसंगी उपस्थित  पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लोहार मॅडम यांनी केले. तर आभार प्रा. जीवन अंबुडारे यांनी मानले. यावेळी बीजेसीच्या प्राध्यापिका स्नेहलता शेवाळे, सुशील लाड यांच्यासह  कराड शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थिती होते.