केंद्रीय पथकाच्या दिखाव्यासाठी हातगाडे गायब

केंद्रीय पथकाच्या दिखाव्यासाठी हातगाडे गायब

कराड/प्रतिनिधी :  

                        येथील नगरपालिकेने  स्वच्छ सर्व्हेक्षण उपक्रमांतर्गत केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्र शासन अधिकाऱ्यांच्या पथकाने शहराला भेट दिली. सदर पथक शहरात दाखल झाल्याची माहिती मिळताच पपालिका प्रशासनाने बसस्थानक परिसरातील विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे हातगाडे गायब केले. त्यामुळे पालिकेने केवळ केंद्रीय पथकाच्या दिखाव्यासाठी हात गाड्यांवर कारवाई केल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याचे दिसून आले. 

                      शहरातील बसस्थानक परिसर मोठ्या प्रमाणावर चायनीज, विविध खाद्य पदार्थ, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी गजबजलेला असतो. त्यामुळे बसस्थानक समोरील पादचारी मार्गावरून प्रवाश्यांना धड चालताही येत नाही अशी परिस्थिती असते. मात्र, बुधवारी 25 रोजी सकाळी नगरपालिकेने  स्वच्छ सर्व्हेक्षण उपक्रमांतर्गत केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्र शासन अधिकाऱ्यांच्या पथकाने शहराला भेट दिली. याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाची पुरती तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पालिकेने तत्काळ हालचाली गतिमान करत शहरातील दर्शनी व वर्दळीच्या रस्त्यावरील हातगाडे हटवण्यासाठी धडक मोहीम सुरू केली. या कारवाईत बसस्थानक परिसरातील फुटपाथवर असलेल्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे हा फुटपाथ एकदम मोकळा, चकाचक झाल्याचे चित्र दिसत होते.