किल्ले वसंतगडावरील चुन्याचा घाणा साडेतीनशे वर्षानंतर सुरू

किल्ले वसंतगडावरील ऐतिहासिक चुन्याचा घाणा तब्बल साडेतीनशे वर्षानंतर घाण्याला बैलजोडी जुंपून सुरू करण्यात आला. किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी या घाण्यात शिवकाळात बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची मळणी करण्यात आली. त्यामुळे तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन वास्तुकलेला उजाळा मिळाला आहे.

किल्ले वसंतगडावरील चुन्याचा घाणा साडेतीनशे वर्षानंतर सुरू
वसंतगड : किल्ले वसंतगडावरील शिवकालीन घाण्याला बैलजोडी जुंपून तटबंदीच्या डागडुजीसाठी बांधकाम साहित्यांची मळणी करताना सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे, तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, स्वराज्यकार्य टीम वसंतगड व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दुर्गसेवक आदी.

किल्ले वसंतगडावरील चुन्याचा घाणा साडेतीनशे वर्षानंतर सुरू 

महाराष्ट्रातील पहिलीच घटना : गडावरील ढासळलेल्या तटबंदीच्या डागडुजीस सुरुवात 

कराड / राजेंद्र मोहिते : 

          छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि स्वराज्य सौदामिनी भद्रकाली ताराराणी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले वसंतगडावरील ऐतिहासिक चुन्याचा घाणा तब्बल साडेतीनशे वर्षानंतर सुरू झाला. किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी रविवारी घाण्याला बैलजोडी जुंपून हा घाणा सुरू करत बांधकाम साहित्याची मळणी करण्यात आली. त्यामुळे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन वास्तुकलेला उजाळा मिळाला. 

         कराड जवळील किल्ले वसंतगडावर टीम वसंतगड आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून ऑगस्ट 2020 मध्ये ढासळलेल्या तटबंदीच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी 27 नोव्हेंबर रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी चैतन्य कणसे आणि तळबीड गावचे सरपंच जयवंतराव मोहिते (नाना) यांच्या हस्ते पूजन करून या शिवस्वराज्यकार्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यावेळी टीम वसंतगड व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे मावळे, शिलेदार, दुर्गसेवक यांच्यासह तळबीड व परिसरातील शिवप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

         माझ्या थोरल्या व धाकल्या धन्याचे चरण कमल ज्या-ज्या ठिकाणी पडले. तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचा; हा एकच ध्यास घेत टीम वसंतगड आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळे आणि शिलेदारांनी शिवस्वराज्यकार्य आरंभिले आहे. त्यानुसार वसंतगडाच्या पश्चिम दरवाजाजवळील ढासळलेल्या तटबंदीची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा रविवारी प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. 

         गडावरील चुन्याच्या घाणीला बैलजोडी जुंपून या घाण्यात शिवकाळात बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या उडीद डाळ, काळा गूळ, चुना, रेती यासह विविध प्रकारच्या साहित्याची मळणीही करण्यात आली. तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर स्वराज्यातील एखाद्या किल्यावर ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करण्यासाठी तत्कालीन चुन्याचा घाणा सुरू करण्याची ही महाराष्ट्रातील बहुदा पहिलीच वेळ आहे. या घटनेने साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन वास्तुकलेला उजाळा मिळाला असून हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवताना गडावरील मातीही थरथरली असेल, अश्या भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाल्याचे मत टीम वसंतगड व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गसेवक, मावळे, शिलेदारांनी व्यक्त केले. 

         दरम्यान, किल्ले वसंतगडावर प्रत्येक रविवारी दुर्गसंवर्धनाचे काम करण्यात येत असून तळबीड व परिसरासह तालुका आणि जिल्ह्यातील शिवप्रेमी, दुर्गसंवर्धन, संरक्षण करणाऱ्या मावळे, शिलेदार, दुर्गसेवकांनी या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही टिम वसंतगड व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळे, शिलेदार, दुर्गसेवक यांच्याकडून करण्यात आले आहे.  

 

वसंतगडावर ढालेल्या तटबंदीच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यासाठी गडावरील शिवकालीन ऐतिहासिक घाण्याला बैलजोडी जुंपून तत्कालीन बांधकाम साहित्याची मळणी करण्यात येत आहे. त्यापासून बुरुज, तटबंदीची डागडुजी करण्यात येणार आहे. अशाप्रकारेे जुना घाणा वापरात आणूूून ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ असावी. याची सुरुवात वसंतगडावरून झाल्याचे, तसेच हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा वापरात आणल्याचे खूप मोठे समाधान आहे. 

- जयवंतराव मोहिते (सरपंच, तळबीड)