कोणेगाव, तासवडेत बेसुमार गाळ उपसा; नियत्रंण कोणांचे ?

कोणेगाव,तासवडे बरोबरच या परिसरातील वराडे, शिवडे, हनुमानवाडी,उंब्रज कोर्टी आदी गावांमध्ये बेसुमार गाळ उपसा सुरू आहे. यावर कोणाचेही नियत्रंण नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

कराड तालुक्यातील कोणेगाव,तासवडे येथील शेतकऱ्यांनी गाळ उपशाचा कहर केल्याने कृष्णाकाठची नैसर्गिक साधन संपदा अक्षरशः धोक्यात आली आहे. मागील दहाबारा वर्षापासून कृष्णा नदीच्या कडेला राजरोसपणे गाळ उपसा केला जात असुन या अवैद्य उत्खननाला कोण कोण  पाठींशी घालतय हा संशोधनाचा विषय आहे. येथील कृष्णाकाठ वाचवण्यासाठी बेसुमार गाळ उपसा रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.

       कोणेगाव,तासवडे गावाला लाभलेला कृष्णा काठ सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासासाठी वरदायिनी ठरला आहे. कृष्णा नदीमुळे संपूर्ण गाव सिंचनाखाली असुन प्रगतीशील बागायतदारांचे गाव म्हणून पंचक्रोशीत या गावांची ओळख निर्माण झाली आहे. पंरतू मागील पाच दहा वर्षात गावाची ओळख बदलु पहात  असुन गाळ व वाळु वाल्यांचे गाव अशी नवी ओळख होवू पहात आहे. नदीकाठच्या बहुतांश शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधन संपत्ती लुटून वैयक्तिक मालमत्ता जमा करण्याचा घाट बांधला आहे. त्यामुळे राजरोसपणे गाळ उपसा व वाळु उपसा करून कृष्णा नदीचा काठ पोखरण्याचे काम सुरू आहे.  सध्यस्थितीत कोणेगाव, तासवडेतील कृष्णा नदीकडेच्या शेतजमीनीतील गाळ उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कागदोपत्री परवानगीचे घोडे नाचवत नियमांची पायमल्ली करत गाळ उपसा केला जातो. अनेक शेतकरी तर नदीपात्राचेही मालक असल्याचा आव आणून गाळ उपसा करीत आहेत.         

 

कोणेगाव,तासवडे बरोबरच या परिसरातील वराडे, शिवडे,  हनुमानवाडी,उंब्रज कोर्टी आदी गावांमध्ये बेसुमार गाळ उपसा सुरू आहे. यावर कोणाचेही नियत्रंण नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

     सातारा जिल्ह्यातील वीटभट्टयांचे प्रंचड मोठे जाळे उंब्रज, कराड या परिसरात तयार झाले आहे.  मोठ्या प्रमाणावर या परिसरात वीटभट्ट्या सुरू आहेत. मागील दहा वर्षात वीटभट्ट्याची संख्या कमालीची वाढली असून या वीटभट्ट्याना लागणारा गाळ कोणेगाव,तासवडेसह  परिसरातील कृष्णाकाठच्या अन्य गावातील शेतकऱ्यांकडून वीटभट्टी चालक, मालक  विकत घेतात. शेती कसण्या पेक्षा गाळ विकून बकळ पैसा मिळत असल्याने शेतकरी बिनधास्तपणे गाळ विकत आहेत. अलिकडे या व्यवसायाला बेसुमारपणा आला असुन नियमांची पायमल्ली सुरू आहे. वीटभट्टी व्यावसायिक पोटापेक्षा ज्यादा गाळ घेवून थप्पी लावून बसले आहेत. तर कृष्णाकाठच्या गाळ उपशाला कोणताही नियम नसल्याने नदी पात्राचे लचके तोडण्याचा प्रकार सुरू आहे. अनेकांनी गाळ उपसा करुन शेती नष्ट केली आहे. तसेच एका शेतकऱ्यांने गाळ उपसा केल्यास त्याचा शेजारच्या शेतकऱ्यांना फटका बसतो.  पावसाळ्यात गाळाच्या धडी नदीत कोसळून शेत जमीनी वाहुन जातात. त्यामुळे गाळ न विकणारा शेतकरीही अडचणीत आहे. सध्यस्थितीत जेसीबीच्या साहय्याने गाळ उपसून ट्रक्टर व डंपरच्या साहय्याने गाळाची वाहतूक केली जाते. या वाहतुकीने कोणेगाव,तासवडेतील रस्तेही खराब झाले असुन रस्तांवर गाळाचा थर साचून धुळींचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर कृष्णानदीची अक्षरक्षः चाळण झाली असुन आगामी दहा वर्षासाठी गावातील गाळ उपसा व वाळु उपसा बंद करावा तरच नदी पात्राची झालेली झीज भरुन निघेल अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका ...!

पोलिस यंत्रणा येड पांघरून पेडगावला जात असल्याची तक्रार तासवडे ,कोणेगाव परिसरतील ग्रामस्थ करीत आहेत सूर्योदय आणि सूर्यास्त यामधील फरक पांढर्‍या कपड्यातील खाकीच्या रक्षकांना दिसत नसून महसूल यंत्रणेकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत तर बेकायदेशीर वाहतूक होत असताना नियमांचा अभ्यास अपुरा असल्याने सगळीकडे आनंदी आनंद दिसत आहे