कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत?

दिल्ली पाठोपाठ गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७०० ते २००० च्या घरात आहे. ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही तर अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा कोरोनाबाबत अजुनही सुरक्षित आहे. परंतु काही  खबरदारी घेतली पाहिजे. तरच कोरोनाचे रुग्ण आटोक्यात येतील. 

कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत?

कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत?

संपादकीय / अग्रलेख 

                  देशात गेल्या २४ तासात करोनाचे १५९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे ६०रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अमेरिका, स्पेन, इटली आणि इत्तर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण व मृत्यूसंख्या कमी असली तरी चिंताजनक आहे. महाराष्ट्र हे राज्य सर्वात जास्त कोरोनाबाधित व कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमुळे चर्चेत आले आहे. सुरुवातीला मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सांगली या शहरांची चर्चा होती. हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यात सातारा जिल्हा आता पुढे येऊ लागला आहे. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. परवा १२ जण सापडले, काट्यानंतर दोन जण तर मंगळवारी सहा जण कोरोनाग्रस्त आढळून आले. कराड हे मोठे शहर असून ते पाटण, खटाव, कोरेगाव, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यांना जोडलेले आहे. कराडमध्ये या नव्हे तर रत्नागिरी, सांगली, चिपळूण, इस्लामपूर येथून रुग्ण येत आहेत.  मुंबई, पुण्याहून येणाऱ्या रुग्णांसोबत परदेशांतून येणारे लोकही आहेत. कराडमध्ये येणाऱ्या या लोकांमुळे कराड शहरात जास्त रुग्ण असल्याचे दिसत आहे. परंतु हे रुग्ण आसपासच्या परिसरातील आहेत. कराडमधील रुग्णांची संख्या का वाढत आहे ? अचानकपणे रुग्ण का वाढत आहेत ? याचे कारण म्हणजे कराडमध्ये बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण कराड मध्यवर्ती ठिकाण आहे. लॉकडाऊनचे पालन योग्य प्रकारे होत आहे, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा योग्य रीतीने काम करीत आहे. परंतु कराडमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत असल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. यावर उपाय म्हणजे लॉकडाऊन कडक करणे, लोकांचा सामाजिक संपर्क कमी करणे, लोकांमध्ये जनजागृती करणे होय. कराडमध्ये बाहेरगावाहून आलेल्या लोकांची चौकशी, तपासणी करणे महत्वाचे होईल. लॉकडाऊन असतानाही अनेक जण पुण्या- मुंबईहुन कराडात कसे काय येतात, यावर पोलीसयंत्रणेने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. काही कठोर उपाय केल्याशिवाय कराड व परिसरातील कोरोना रुग्ण कमी होणार नाहीत.                        कोविड १९ या विषाणूविरोधात लस शोधण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे अशी माहिती सोमवारीच जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी दिली. मात्र करोनाचे संकट इतक्यात टळणारे नाही, असेही त्यांनी कबुल केले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना संदर्भात आणि लॉकडाउन संदर्भात चर्चा केली. ३ मे पर्यंत लॉकडाउन कायम आहे. आता यापुढे तो वाढणार की नाही ? की काही राज्यांमध्ये लॉकडाउन वाढणार आणि काही राज्यांमध्ये शिथील होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच केली जाईल. ३ मे रोजी म्हणजेच येत्या रविवारी देशभरातला लॉकडाउन संपणार आहे. मात्र त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात २३ मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. या निर्णयाला आता महिना पूर्ण झाला आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादूर्भावामुळे आता काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. लॉकडाऊनची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही का ? आरोग्य व्यवस्था योग्य दिशेने काम करतेय का ? पुरेशा टेस्ट होत आहेत का ? कोरोनाची लक्षणे लवकर  दिसत नसल्यामुळे त्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होतोय का ? असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत. लोकांना लॉकडाऊनच्या काळात ३-४ तास बाजारात जाण्याची सूट देण्यात आली होती. त्यादरम्यान सोशल डिस्टंसिंग पाळले गेले होते का, लोक घरी आल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतात का, हे आता पाहिले पाहिजे. खरे तर प्रत्येक व्यक्तीने स्वतःची सुरक्षा, काळजी घेतली पाहिजे. कोरोना कोणालाही होऊ शकतो. योग्य काळजी घेतली तर कोरोनावर लवकर मात करता येते. कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग लॉकडाऊननंतर मंदावला आहे. सुरुवातीला दर अडीच दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत होती. आता हाच कालावधी सहा दिवसांवर गेला आहे. ही दिलासादायक बाब आहे. आज जी रुग्णसंख्या वाढत आहे, कारण आजही २० टक्के लोकं घराबाहेर पडत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात लोकं दाटीवाटीच्या वस्तीत राहतात. मुंबईची घनता २९ हजार व्यक्ती/चौ.मीटर इतकी आहे. तिथे सोशल डिस्टंसिंग पाळणे शक्य होत नाही. मुंबईत धारावी, वरळी कोळीवाडा, वडाळा अशा गर्दीच्या परिसरात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळत आहेत. पुण्यात भवानी पेठ, सय्यद नगर, कोलवा अशा दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. त्यामानाने कराडात जास्त दाटीवाटी दिसत नाही. कराडात बाहेर बाहेरगावाहून आलेल्या  रुग्णांमध्ये कोरोना रुग्ण जास्त आहेत. कोरोनाची लक्षणे लवकर आढळून येत नसल्यामुळे जोपर्यंत चाचणीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीमुळे अनेक जण  बाधित होत आहेत. कोरोनाचे रुग्ण अशा पद्धतीने वाढत आहेत.                                                                                        इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी म्हटले आहे कि, राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे. पण तरीही कोरोनाच्या टेस्ट वाढवण्याची गरज आहे. दर १० लाख नागरिकांमागे किमान 5 हजार टेस्ट होणं गरजेचे आहे. पण आपण महाराष्ट्रात पाहिलं तर १० लाख नागरिकांमागे केवळ १५०० ते १७०० टेस्ट होत आहेत. या नक्कीच पुरेशा नाहीत. राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ८१ टक्के कोरोना रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.आजही डॉक्टर्स आणि नर्सेसना पीपीई किट्स पुरेशा मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्टर आणि नर्सेसना कोरोनाची लागण होत आहे. आपली संपूर्ण मदार याच डॉक्टर आणि नर्सेसवर असल्याने त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.देशातला पहिला रुग्ण 30 जानेवारीला केरळ राज्यात आढळला. पण आज केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे, तर महाराष्ट्रात 9 मार्चला कोरोनाचे दोन रुग्ण पुणे शहरात आढळले आणि आज दीड महिन्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराहून अधिक आहे.महाराष्ट्रानंतर राजधानी दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. दिल्लीत रुग्णांची संख्या २००० च्या घरात आहे. दिल्ली पाठोपाठ गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७०० ते २००० च्या घरात आहे. ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही तर अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा कोरोनाबाबत अजुनही सुरक्षित आहे. परंतु काही  खबरदारी घेतली पाहिजे. तरच कोरोनाचे रुग्ण आटोक्यात येतील.