सातारा जिल्ह्यात लॉकडाउन मध्ये दिली शिथिलता ; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ओदश जारी

सातारा जिल्ह्यात लॉकडाउन मध्ये दिली शिथिलता ; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ओदश जारी

सातारा/प्रतिनिधी :

राज्यातील कोविड-19 विषाणू संसर्गाबाबत  शासनाने पारित केलेल्या दिनांक 19 मे रोजीच्या आदेशामध्ये सातारा जिल्हा हा नॉन रेड झोमध्ये समाविष्ट केलेला आहे.त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार  31 मे  खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
  
 जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे (कंटेन्मेंट झोन) वगळून तसेच सातारा शहरातील 6 कंटेन्मेंट झोन आणि  पोवई नाका ते नगरपालिका रस्ता, नगर पालिका रस्ता ते राजवाडा (राजपथ), पोवई नाका ते  शाहू स्टेडीयम रस्ता, एसटी स्टॅन्ड ते राधिका चौक (राधिका रोड), पोवई नाका ते पोलीस मुख्यालय मार्गे मोती चौक हे प्रतिबंधित रस्ते वगळून हे आदेश सर्व क्षेत्रासाठी लागू राहतील 

 या आदेशानुसार  सातारा जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहे. वय वर्षे 65 वर्षावरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती   (PERSONS WITH COMORBIDITIES) ,  गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच रहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिटयूट या बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा. व इतर हॉस्पिटीलिटी सेवा बंद राहतील. फक्त या सेवा आरोग्य, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विषयक काम करणारे कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक, कामगार व क्वारंटाईन सुविधा चालविणाऱ्या ठिकाणी यांच्यासाठी या सेवा चालू राहतील. तथापि रेस्टॉरंट यांना त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थ तयार करुन घरपोच सेवा देता येतील. सर्व चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पुल, एंटरटेंमेंट पार्क, बार्स ॲन्ड ऑडिटोरियम, असेंम्बली हॉल, मंगल कार्यालय हे सर्व बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे बंद राहतील.
इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधित नसलेल्या कृती करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. क्रीडांगण, स्टेडीयम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत, सामाजिक अंतर ठेवून शारिरिक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी राहील,  यामध्ये दुचाकी वाहनावर  1 चालक, तीनचाकीवर 1+2 व्यक्ती, चार चाकी वाहनात 1+2 व्यक्ती.
सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहीत केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50%  क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एस टी  बस सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वा. या वेळेमध्ये चालू राहतील. जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील. 
कोरोना प्रतिबंध उपाययोजना करणे सर्वांसाठी बंधनकारक राहील
 सार्वजनिक  ठिकाणी, घराबाहेर व  घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रु. दंड आकारण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु. दंड आकारण्यात येईल.जिल्ह्यात सार्वजनिक लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनांमध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
अंत्यविधी व लग्न समारंभ या काय्रक्रमाध्ये 50 पर्यत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. तथापि लोकांची गर्दी होऊ नये म्हणून संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे राहील. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. दुकामानध्ये प्रत्येक ग्राहकात किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे.  या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल. व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. 
या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/-, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/-दंड आकारण्यात येईल व  शहरी भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन  दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची आहे. 
शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्कॅनिग, हँडवॉश, सॅनिटायझर याची एन्ट्री पाँईट व एक्झिट पाँईंट वर व्यवस्था करावी.  कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे अधून मधून सॅनिटायझेशन करण्यात यावे. सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांच्या कामगारांमध्ये कामाची वेळी,  कामाची पाळी बदलण्याची वेळी , जेवणाच्या व इतर सुट्टीचे वेळी , कामावर येताना व कामावरुन  सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील.
 या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांना टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधिताच्या विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी करावी, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.