सह्याद्रि हॉस्पिटल व कराडातील २१ फिजिशियन यांच्या प्रयत्नांना यश, कॉटेज स्थलांतरित सर्व ३१ रुग्ण कोरोनामुक्त

शुक्रवारी ७ रुग्णांसह, ९ दिवसांमध्ये सह्याद्रि मधून एकूण ३१ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज,ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असतानाच कराड शहर मात्र आज कोरोनामुक्त तर वनवासमाची येथील ३९ पैकी ३६ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

सह्याद्रि हॉस्पिटल व कराडातील २१ फिजिशियन यांच्या प्रयत्नांना यश, कॉटेज स्थलांतरित सर्व ३१ रुग्ण कोरोनामुक्त

कराड/प्रतिनिधी


    सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथून आज आणखी सात कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथून  गुरुवार दि.१४ मे  ते  शुक्रवार दि. २२ मे या  नऊ दिवसांमध्ये एकूण ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना उपचार हे प्रामुख्याने एम. डी. मेडिसिन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात. सातारा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कराड मधील २१ फिजीशियन्स एकत्र येऊन सह्याद्रि हॉस्पिटल येथील कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे करोनाविरुद्ध हा लढा अधिक व्यापक झाला असून कराड तालूक्यामध्ये याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. सलग सुरु असेल्या करोनामुक्त रुग्णांच्या डिस्चार्ज मुळे एक नवा आशेचा किरण निर्माण झाला असून, साकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

  शुक्रवारी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचे सर्व स्टाफ ने टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. या ७ रुग्णांपैकी ४ पुरुष असून ३ महिला आहेत. ४५ वर्षीय दोन महिला व ४९ वर्षीय एक पुरुष  आहे हे मलकापूर येथील आहेत तर एक ४० वर्षीय पुरुष व ६० वर्षाचे वृद्ध हे वनवसमाची येथील आहेत. तसेच उप जिल्हा रुग्णालय येथील एक २४ वर्षाचा पुरुष कर्मचारी तर मंगळवार पेठ कराड येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला यांचा देखील समावेश आहे. या मंगळवार पेठेतील महिले बरोबरच कराड शहर कोरोनामुक्त झाले आहे. या सर्व रुग्णांना २८ एप्रिल ते ७ मे दरम्यान रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि. २० मे रोजी रुग्णांचे तपासणी अहवाल नेगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कुंभार, क.न.पा. नियोजन सभापती विजय वाटेगावकर, पुढारी कार्यालय व्यवस्थापक सतीश मोरे, सह्याद्रि हॉस्पिटलचे मुख्य फिजिशियन डॉ संदीप बानुगडे, सह्याद्रि हॉस्पिटलचे संचालक मा.अमित चव्हाण, सह्याद्रि हॉस्पिटलचे कामकाज प्रमुख डॉ वेंकटेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्कर ढिकले व मार्केटिंग प्रमुख विश्वजीत डुबल आदी उपस्थित होते.           

        सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे मुख्य फिजिशियन, डॉ संदीप बानुगडे म्हणाले, "उपजिल्हा रुग्णालय कराड येथील ३१ कोरोना बाधित पेशन्ट हे सह्याद्रि हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित केले होते. हे सर्व रुग्ण ९ दिवसांमध्ये कोरोनमुक्त होऊन डिस्चार्ज झाले आहेत. एका बाजूला झपाट्याने वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या तर दुसऱ्या बाजूला कोरोनमुक्तांच्या संख्येमधील लक्षणीय वाढ हि गोष्ट वाखाणण्याजोगी आहे व याचे श्रेय सह्याद्रि हॉस्पिटल बरोबरच कराड मधील सर्व २१ फिजीशियन्सना देखील जाते ज्यांनी आपला रुग्णसेवेचा वसा कायम ठेवत तत्पर सेवा दिली आहे"