कोरोना महामारीमुळे देशासमोर तिहेरी संकट

कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीमुळै देशासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थिक संकट अधिक गडद बनले असून याकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणारे नाही. कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र खिळखिळे होत असल्याने रोजगाराची मोठी समस्या निर्माण होणार आहे. याकरिता केंद्र सरकारने दिलेले पॅकेज हे अत्यल्प असून हे पॅकेज वाढवण्याची गरज आहे. केंद्र सरकारला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील आणि त्यांनी ते घ्यावे, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दैनिक प्रीतिसंगमशी दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

कोरोना महामारीमुळे देशासमोर तिहेरी संकट

कराड/प्रतिनिधीः-
कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीमुळै देशासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थिक संकट अधिक गडद बनले असून याकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणारे नाही. कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र खिळखिळे होत असल्याने रोजगाराची मोठी समस्या निर्माण होणार आहे. याकरिता केंद्र सरकारने दिलेले पॅकेज हे अत्यल्प असून हे पॅकेज वाढवण्याची गरज आहे. केंद्र सरकारला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील आणि त्यांनी ते घ्यावे, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दैनिक प्रीतिसंगमशी दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. केंद्राने व राज्याने जाहिर केलेला लॉकडाऊन हा या महामारीवर योग्य उपाय आहे. सरकारने कोणत्याही उपाययोजना कराव्यात. मात्र, जनतेला सुविधा पुरवाव्यात आज देशात सर्व ठप्प आहे. यामुळे देश तिहेरी संकटात सापडला आहे. अर्थव्यवस्था पुर्णपणे ठप्प झाली आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र अडचणीत आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधाही गरजेच्या आहेत. सेवा क्षेत्रामध्ये माल उत्पादन, ट्रान्स्पोर्ट, रेल्वे, विमान, एसटी सेवा येतात. त्याचबरोबर विमा कंपन्या, बँका, ई-विक्री सेवा असे विविध प्रकार गणले जातात. तर उद्योग क्षेत्रामध्ये तयार होणारा मालच निर्माण झाला नाही तर या सेवा चालणार कशा. अर्थव्यवस्था पुर्णपणे बंद असून यामुळे रोजगार कसा टिकवायचा ह गंभीर प्रश्न आहे. समाजरचनाच बदलायला लागली आहे. जर एखादा माल तयार झाला तर त्याला बाजार पेठेतून मागणी मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे अंशतः काही क्षेत्रांना चालना देणे गरजेचे आहे. प्रामुख्याने कृषी अर्थव्यवस्थेला भक्कमपणे चालना द्यावी लागेल. याकरिता सरकारने धाडसी निर्णय घेणे गरजेचे आहे.
आ. चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, कोरोनाची वैश्विक महामारी ही सुमारे 100 वर्षानंतर आली आहे. यापुर्वी स्पॅनिश नावाच्या आजाराच्या साथीने थैमान घातले आणि यामुळे सुमारे 3 कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. जगासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या विषाणूवर कसल्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटना सांगते त्या आधारावर सर्वजण काम करत आहेत. त्यांनी मानवी साखळी तोडणे हा उपाय सुचविला आहे. त्यानुसारच देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला. त्याचबरोबर त्यांनी सुचवलेल्या तोंडाला मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे गरजेचे आहे. मलेरिया या आजारावर वापरण्यात येत असलेले औषधच सध्या सर्वत्र वापरले जात आहे. कोरोना या विषाणूवर औषध निर्माण होण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करणे, हाच या आजारवर उपाय आहे. वैद्यकीय क्षेत्रात हजारो शास्त्रज्ञ औषधाच्या संशोधनासाठी कार्य करत आहेत. त्यांना यश येईल पण त्यासाठी कालावधी जाणार आहे. आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. जर पगार झाले नाही तर त्यांनी काय करायचे. कारखाने बंद झाले तर तेथील कामगारांनी काय करायचे. यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. आज माझ्या मतदार संघात 14 हजार 500 जण मुंबईहून आले आहेत. त्यांना गावामध्ये येवू नये म्हणून काही गावात रस्तेच खोदण्यात आलेले आहेत. कदाचित यामुळे सामाजिक सलोखा बिघडून कायमचे अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी बाजार समित्या खुल्या केल्या पाहिजेत आणि त्यांच्यामार्फत शेतकर्‍यांचा माल आधारभूत किंमत देवून खरेदी केला पाहिजे व त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत यावर प्राधान्याने काम केल्यास थोडाफार हातभार लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने धाडसी निर्णयही घेणे गरजेचे आहे. देशासाठी जाहिर केलेले पॅकेज हे अत्यल्प असून ते वाढवणे गरजेचे आहे. केंद्राने लागेल तेवढी मदत केली पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढावे आणि त्यातूनही काही वाटलेच तर चलन छापावे आणि अर्थव्यवस्थेला चालना द्यावी. जर बाजारपेठेत उत्पादन केले तरच पुरवठा आणि मागणी याचे समिकरण घातले जावू शकते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
सामाजिक सलोखा बिघडू देवू नका
कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीमुळे मुंबई पुणे येथे नोकरीला व व्यवसायानिमित्त असलेले नागरिक सध्या आपआपल्या गावी आले आहेत. त्यांनी त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. मात्र, पुर्वी दिवाळी गणपती व यात्रेला येण्यासाठी त्या त्या गावातील कुटुंबिय विनंत्या करत होते. ते आल्यानंतर त्यांनी दिवाळीला काय आणले, मला काय आणले असे आवर्जुन विचारणा करत होते. एकीकडे हे पहायला मिळत होते. मात्र, आज ते गावात आल्यानंतर काही गावांनी ते येवू नयेत म्हणून रस्तेच उकरून टाकले आहेत. जर अशा प्रसंगी त्यांना साथ केली नाही तर कदाचित सामाजिक सलोखा आणि नाती तुटण्याची भिती वाटत आहेत. प्रत्येकाने आपल्यात दुरावा निर्माण होईल असे कृत्य आपल्या हाथून घडू नये याची काळजी घ्यावी.