कराड तालुका प्रशासनाचा 'कोरोना'शी यशस्वी मुकाबला,प्रांताधिकारी उत्तम दिघे सेनापतीच्या भूमिकेत

कराड तालुका प्रशासनाचा 'कोरोना'शी यशस्वी मुकाबला,प्रांताधिकारी उत्तम दिघे सेनापतीच्या भूमिकेत

कराड/प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना कराड तालुक्यात कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या नेतृत्वाखाली महसूल, आरोग्य, नगरपालिका, ग्रामपंचायत विभाग आवश्यकतेनुसार कृषि, पाटबंधारे, शिक्षण, सरकारी व शैक्षणिक संस्था आदींंच्या मदतीला उपविभागीय पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव यांनी पोलीस प्रशासन ठामपणे उभे केले आहे.तालुका प्रशासनातील समन्वय व जिद्दीच्या जोरावर कोरोनाशी यशस्वी मुकाबला केला आहे. तालुक्यातील अनेक गावे व शहरातील करोना साखळी खंडित करण्यात यश आले आहे. 

कोरोना लढ्याची सुरूवात मार्च महिन्यातील संचारबंदीने झाली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदी आदेश लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आली.महसूल, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन मदतीला पुढे आले. बॅरिकेटींगसह महत्चाच्या ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले. सर्व विभागांच्या सममन्वयातून संचारबंदीची कडक अंमलबजावणी तालुक्यात करण्यात आली. हॉटेल,मंगल कार्यालय ,जिम, देवस्थाने बंद करण्यात आली. गावोगावच्या यात्रा महसूल, पोलीस, ग्रामपंचायत यांनी एकत्रित बैठक घेऊन रद्द करण्यात आल्या. गाव पातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती नेमली गेली. 

लॉकडऊनच्या काळात स्थलांतरित मजूरांचा मुद्या ऐरणीवर आला. यावेळी स्थलांतरित मजुरांसाठी तालुक्यात विराज मल्टीपर्पज हॉल (वाठार), आकाश मल्टीपर्पज हॉल (उंब्रज) या दोन ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्यासाठी दररोज चहा, जेवण, नाष्टा याची व्यवस्था तलाठी व  मंडलअधिकारी यांनी केली. तर मजुरांची दैनंदिन आरोग्य तपासणीसह पोलिसांनी संरक्षण देण्यात आले. हे निवारागृह दि. 25 मार्च ते दि. 10 मेपर्यंत चालू होती. 


शासनाने परराज्य व परजिल्ह्यातील मजुरांना गावी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कराड तालुक्यातून परराज्य व परजिल्ह्यातील मजुरांची माहिती तलाठी, ग्रामपंचायत व नगरपालिका यांच्यामार्फत एकत्रित केली गेली. त्यांनी ऑनलाईन केलेल्या रजिस्टरवरून टोकन नंबर घेणे सर्वांची राज्यनिहाय वेगवेगळी यादी तयार करणे सर्व मजुरांना एकत्रित करून एसटी महामंडळाचे बस द्वारे सातारा रेल्वे स्टेशन वर पोहोच करणे, एसटीमध्ये प्रत्येक सीटवर एक व्यक्ती याप्रमाणे नियोजन करून प्रत्येक मजुरास फूड पॅकेट व पाण्याची बॉटल्या देण्याचे काम प्रशासनाने चोख बजावले. आतापर्यंत मध्यप्रदेशमध्ये 166, राजस्थानमध्ये 625, उत्तरप्रदेश मध्ये 1500, झारखंडमध्ये 94, पश्चिम बंगालमध्ये 210, कर्नाटकमध्ये 522, तमिळनाडूमध्ये 409 अशी एकूण 3 हजार392 मजुरांना पाठवण्यात आले आहे.

करोनाच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून करोनाशी दोन हात करणारे कराडचे वॉरियर्स  प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, मलकापूरच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, कराड शहर वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यासर्वाच्या तालुक्यातील टीमनी करोनाच्या लढ्यातील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

तालुक्यात एखादा करोनाबाधित व्यक्ती सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा शोध घेणे त्यांना तात्काळ संस्थात्मक विलिनीकरण कक्षात म्हणजे, पार्ले येथील दोन वस्तीगृह, सैदापूर इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेजची पाच वस्तीगृह, कृषी महाविद्यालय, विजयनगर येथील एक वसतिगृह, वाठार येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे एक वसतीगृह दाखल केले जात आहे. सहाशे व्यक्तींची क्षमता असलेले हे कक्ष कित्येक वेळा हाऊसफुल झाले. 

 

होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूट क्वारंटाईन मुळे कोरोनावर नियंत्रण

मुंबई-पुणेसह बाहेरहून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी सोय असल्यास घरीच होमक्वारंटइन तर ज्यांची घरी सोय नाही त्यांना गावातील शाळा, समाज मंदिरे याठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम ग्रामस्तरीय समिती करत आहे. तसेच दररोजची  आरोग्य तपासणी आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका करत आहेत. गावात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांनी संकलित करून तालुक्यात प्रत्येक गावात किती लोक बाहेरून आले याची माहिती संकलित केली आहे.  

शिवभोजन थाळी व धान्य वाटप ठरले भुकेलेल्यांना आधार

उपासमारीवर पर्याय म्हणून संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात पुरवठा विभागाने कराड-मलकापूर परिसरात नगरपालिका हद्दीत 13 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. यामध्ये सुमारे 725 थाळीचे वाटप करण्यात आहे. हातावर पोट असणार्‍या कुटुंबाची उपासमार होऊ नये, यासाठी महसूल, पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाने धान्याचे किट वाटप केले. अनेक स्वयंसेवी संस्था तसेच व्यक्तींनाही आवाहन केले. या सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यात 23 हजार पेक्षा जास्त कुटुंबांना धान्य वाटप केले.  त्याचबरोबर मार्च-एप्रिल-मे व जून महिन्याचे धान्य रेशनकार्ड धारकांना वाटप करण्याचे नियोजन तसेच शासनाने जाहीर केलेला मोफत तांदुळ प्रत्येक कार्डधारकांना वाटप केले आहे.