हम गाव नहीं जायेंगे,हमरा जो भी होगा इधर ही होगा परप्रांतीय युवकांची मानसिकता बदलली

हम गाव नहीं जायेंगे,हमरा जो भी होगा इधर ही होगा  परप्रांतीय युवकांची मानसिकता बदलली

अनिल कदम/उंब्रज

 

उंब्रजसह परीसरात अनेक परप्रांतीय युवक रोजंदारीवर काम करण्यासाठी आलेले आहेत.कोरोनाच्या भीतीने भावनेच्या भरात परिस्थितीचे भान विसरून काहीजण गावाकडे पोचलेले आहेत,तर काहीजण निम्म्या रस्त्यात आहेत.परंतु काहीजण परिस्थितीचा विचार करून आहे त्या जाग्यावरच थांबले आहेत.तेच सध्या सुरक्षित असल्याचे जाणवत आहे,कारण अनेक मरणयातना भोगून मार्गस्थ झालेले परप्रांतीय याची झालेली फरफट फोन वरून एकमेकांना सांगितली जात असल्याने,उरलेले परप्रांतीय हम गाव नहीं जायेंगे,हमरा जो भी होगा इधर ही होगा असे चर्चा करताना दिसत आहेत.

 

रोटी च्या शोधात सुरू झालेला अनेक परप्रांतीय युवकांचा प्रवास महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात स्थिरस्थावर झाला होता.जीव मारून मुटकून पैसे साठवायचे,मिळेल ते खायचे, पडेल ते काम करायचे, असा दिनक्रम ठरलेला वर्ष दोन वर्षातून गावाकडे जाणे आणि दोन तीन महिन्यांनी पुन्हा रहाट गाडगे सुरू असा जीवनाचा दिनक्रम ठरलेला होता.मिळेल त्यात सुखसमाधान मानणारी परप्रांतीय भैय्या आणि भाभी कधी गणपती आणि दुर्गादेवी उत्सवात रममाण झाले हे महाराष्ट्रातील जनतेला कळले सुद्धा नाही. परप्रांतीयांची मुलंबाळं स्थानिक पोरांच्या नादान जय शिवाजी जय भवानी म्हणू लागली होती.समाजातील सर्व सुख दुःख जातपात धर्म भेद न मानता जपली जात होती. अनेकांना महाराष्ट्रान शिकवलं आणि सांभाळलं सुद्धा अनेक जण मोठे झाले, पैसे वाले झाले, परंतु महाराष्ट्राच्या जनतेत एकरूप झाले होते.

 

परप्रांतीय लोकांमुळे "अरगड मे बोकड घुस्या"म्हणणाराची हिंदी भाषा सुधारली,भाषेत आमूलाग्र बदल झाले चालीरीती,परंपरा यांची देवाणघेवाण झाली तसेच भेळपुरी,पाणीपुरी,रगडा पॅटिस याची ओळख होऊन मिसळ पाव,कोल्हापुरी जेवण व कंदी पेढा देशात प्रसिध्द झाला, स्त्रियांना नऊवारी आणि सहावारी बरोबरच आधुनिक पॅशन आत्मसात करायला वाव मिळाला मांग मे सिंधुर तसेच घागरा चोली,पंजाबी ड्रेस सह गाऊन ला अमाप प्रसिद्धी मिळाली.काही चालीरीती नव्याने रूढ झाल्या तर काही परंपरागत चालत आलेल्या विसमरणात गेल्या लोक प्रांत,भाषा विसरून एकरूप झाली तर उपवर मुलांची सोयरीक परराज्यातील नात्यांना खुणावू लागली होती.इंटरकास्ट म्हणता म्हणता इंटरस्टेट विवाह उरकले जाऊ लागले होते.

 

कोरोना महामारीच्या उद्रेकाने गेल्या पन्नास वर्षाचे समाजजीवन उद्धवस्त करून टाकले आहे.मायभूमीची आस प्रत्येकालाच लागून राहिली असून काहीजण भीतीने तर काही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने परतीचा रस्ता पकडत आहेत.महाराष्ट्राने कोणालाही जावा असे सांगितले नाही तरीही लोक जात आहेत,अंगा खांद्यावर खेळती बागडती पोरं बाळं राज्य सोडून जाताना सह्याद्री सुद्धा गलबलून गेला असून समुद्राला उधाण आलं आहे.प्रत्येक राज्याच्या सीमेवर होणारी फरफट बघून परक्याला ही आपलंसं करणाऱ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला सुद्धा गहिवर आला असून कोणाला जगावयच आणि कोणाला वाचवायच या विवंचनेत सारेच धडपडत असून डॉक्टर,पोलीस जीवाचा आटापिटा करून प्रयत्न करतात यश मिळेल सर्व काही सुरळीत होईल जरा कढ काढा असे सरकार जीव तोडून सांगत आहे फक्त लोकांनी विश्वास ठेवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.