जिल्हाधिकारीसाहेब वनवासमाचीसाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा राबवा अन्यथा धोका गंभीर वनवासमाचीची साखळी तुटता-तुटेना, त्यातच साकुर्डीची भर

साकुर्डीत कोरोना आला कसा? तांबवे, म्हारूगडेवाडी, बाबरमाची, ओगलेवाडी, डेरवण, चरेगांव, कोरोनामुक्त झाले. मात्र, आगाशिवनगर, मलकापूर, वनवासमाची यांची अवस्था कोरोनाच्या बाबतीत दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यातच भर म्हणून साकुर्डीचे दोन रूग्ण कोरोना बाधित म्हणून समोर आले आहेत. येथील एक वीटभट्टीवरील कामगार कोरेगावांत गेला आणि तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तो जावून 15दिवस उलटले असताना साकुर्डीत आज नवीन दोनजण सापडले. तेही विटभट्टीवरील कर्मचारी आहेत. मग साकुर्डीत कोरोना आला कोठून, याची उत्तर अद्यापही प्रशासनाने नाही.

जिल्हाधिकारीसाहेब वनवासमाचीसाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा राबवा अन्यथा धोका गंभीर वनवासमाचीची साखळी तुटता-तुटेना, त्यातच साकुर्डीची भर

कराड/प्रतिनिधीः-
कोरोना महामारीमुळे जिल्ह्याचा आकडा शंभरीकडे वाटचाल करीत आहे. अशातच कराड तालुक्यात 71 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. ही बाब गंभीर बनत चालली आहे. कराडच्या वेशीबाहेर हा कोरोना घोंगावत आहे. मात्र, याचे हाल कराडकर सोसत आहेत. कराडमध्ये सोशल मिडियावरून साहित्य पोहोच करण्याच्या घोषणांचा पाऊस पडत आहे. तर अनेकजण लॉकडाऊन कडकच करा, असे सुचवत आहेत. लोकांना खायला नाही, पैसे असून काढता येत नाहीत अशा अवस्थेत कराडकर किती दिवस कंटेनमेंट झोनमध्ये राहणार हा न सुटणारा प्रश्न आहे. जिल्हाधिकारी साहेब आपण वनवासमाचीसाठी स्वतंत्र आरोग्य तपासणी मोहिम राबवा. अन्यथा या गावाचे काय खरे नाही. ज्या लोकांना क्वारंटाईन करून ठेवले आहे. ते लोक बिंधास्त फिरत आहेत. हा आरोग्य यंत्रणेच्या चुकीमुळे ही संख्या दिवसागणीस वाढत आहे. स्वॅब घेतले की रिपोर्ट यायला चार ते पाच दिवस लागतात. त्यादरम्यान ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो तो बिंधास्त फिरत राहत आहे. यामुळेच ही साखळी लांबतच राहिली आहे. गावाची संख्या दोन हजाराच्या आसपास आणि कोरोनाबाधित 35 हे जरा अतीच झाले आहे. आगाशिवनगर, मलकापूर आणि वनवासमाची या गावांची झळ मात्र, कराडकरांच्या माथी... हे सोडवायचे असेल तर रूतलेले चाक पुन्हा सुरू करा आणि शहरातील तो कोरोनबाधित भाग सिल करून बाकीची बाजारपेठ खुली करा... तरच तालुक्यातील अनेक प्रश्न सुटू शकतील अन्यथा तालुक्यातील इतर गावे कंटेनमेंट झोनच्या खाली मोकळी असली तरी तेथील ही अवस्था दयनीय झाल्याचे पहायला मिळेल.
कराड तालुक्यातील तांबवे येथे पहिला कोरोनाबाधित रूगण सापडला. हा रूग्ण सापडल्यानंतर म्हारूगडेवाडी येथील मुंबईहून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित म्हणून पुढे आली आणि तिचा मृत्युही झाला. मात्र, तांबवेची चैन जागेवर तुटली केवळ एकजणच कोरोनाबाधित राहिला. तर म्हारूगडेवाडीतून त्याच्या आई व्यतिरिक्त अन्य कोणालाही लागण झाली नाही. यावेळी प्रशासन सतर्क होते. प्रशासनाने या गावामध्ये ज्या तात्काळ मोहिम राबवल्या. त्या बाबरमाची येथील रूग्णांच्या बाबतीत वापरल्या नाहीत. बाबरमाचीने प्रारंभ केला पण या रूग्णाने कोणालाही बाधित केले नाही. असे गावापुरते घडले असले तरी या रूग्णाच्या साखळीतूनच आगाशिवनगर आणि वनवासमाची पुढे आली आणि कराड तालुका हॉटस्पॉट झाला. आणि जिल्हाही रेड झोनकडे गेला. जिल्हाधिकारीसाहेब स्वतः फिरत आहेत. काम करत आहेत... हे करण्यासाठी ते कशाचाही विचार करत नाहीत. मात्र, त्यांच्या हाताखाली इतर प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने काम करते का? आणि जर करतच होती तर वनवासमाचीची रूग्णसंख्या का वाढली? पहिलाच रूग्ण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या संबंधित रूग्णांची संख्या वाढत वाढत आज 35 वर पोहोचली आहे. हे एकीकडे घडत असतानाच नव्याने साकुर्डीचे रूग्ण कोरोनाबाधित म्हणून पुढे आले आहेत.
वनवासमाचीची साखळी तुटता-तुटेना, आगाशिवनगर व मलकापूर भयभीत झाले आहे. कराडकर मात्र, या सर्व झळा सोसत आपले कसेबसे दिवस घालवत आहेत. अशातच कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाच आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाल्या. उलटया काळजाचा तेथील डॉक्टर म्हणतो की, कोरोना होऊद्या अथवा कोरोना निगेटिव्ह व्हा पण कामावर आलेच पाहिजे. मग या व्यक्तीला कराडमध्ये कोरोनाचे थैमान माजवायचे आहे का? हा नविन प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्याकडे मोठी इमारत आहे. सुसज्ज असे वॉर्ड आहेत. मात्र, उपचार करण्यासाठी डॉक्टर नाहीत. अशा परिस्थितीत या ग्रस्थाने कोविड-19 चा वॉर्ड का स्थापन केला? त्याच्या या चुकीमुळेच तेथील महिला कोरोना बाधित झाल्या. येथे काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना कसलेही पीपीटी किट, सॅनिटायझर, मास्कही दिले जात नाही. घ्यायचे झाले तर त्यांनी स्वतः विकत घ्यायचे अशी गंभीर परिस्थिती आहे. आणि हे महाशय म्हणतात. तुम्हाला काम करावेच लागेल. कराडकरांनी थोडाफार सोशल मिडियातून विरोध केला. पालिकेच्या प्रशासनाने येथील लोकप्रतिनिधींना अथवा पालकमंत्र्यांना साधे पत्रही दिले नाही. मग पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी याबाबत लक्ष कसे घालणार? खरच गावाचे हित जोपासावयाचे आहे तर पालिकेने राजकारण बाजूला ठेवून गावासाठी आणि गावातील लोकांचे हाल थांबवण्यासाठी पुढे येवून गाव कसे पुन्हा चालू करता येईल याचा प्रयत्न करावा. अन्यथा कराडकर माफ करणार नाहीत. हाल सोसतायत याचा हिशेब द्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. लोकांना नगरेसवक जीवनावश्यक वस्तू देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ज्याच्या घरामध्ये माल आणण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत त्यांचे काय. किरकोळ दुकानदाराच्या लिस्ट घेवून माल पोहोचवण्याची भाषा होत आहे.पण बँका बंद असल्याने लोकांच्याकडे पैसे नाहीत. तुमच्याकडे याद्या देणार कसे याचा थोडाफार तरी विचार त्यांनी करावा. शहरातील बँका आणि दुकाने सुरू ठेवली तरच गावातील लोकांचा प्रश्न मिटू शकेल. अन्यथा एकीकडे कोरोनाची भिती दुसरीकडे जगण्याची भिती अशा द्विधा मनस्थितीत नागरिकांचे व्हायचे हाल ते होत राहतील.
तालुक्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बाबतीत तर काय सांगायचे. ते कोठे आहेत, ते काय काम करतात, हे अद्याप आम्हाला समजले नाही तर लोकांना काय समजणार. उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत लाखो लोक येतात. तेथील कर्मचारी काय करणार मग वनवासमाचीत कोरोनाबाधितांची संख्या वाढणारच. जिल्हाधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून वनवासमाचीकरांना वाचवणे गरजेचे आहे. त्या गावातील प्रत्येकाची घरटी तपासणी करा, असा आदेश देवून प्रत्यक्षात काम होते की नाही याची खातरजमा करून घ्यावी कारण तालुक्यातील प्रशासनावर आता विश्वासच राहिलेला नाही.