तुम्ही जाल निघून, उंब्रजकर जातील गुदमरून, जाण्यापूर्वी काम करा झटून; उंब्रजकर नाव घेतील रेटून...

तुम्ही जाल निघून, उंब्रजकर जातील गुदमरून, जाण्यापूर्वी काम करा झटून; उंब्रजकर नाव घेतील रेटून...

अनिल कदम/उंब्रज

कोरोनाच्या महामारीने उंब्रज पंचक्रोशीतील काही गावात घट्ट होत चाललेली पकड, त्यातून बाहेर पडण्यासाठी जनतेची चाललेली धडपड, या महामारीचा मुकाबला करताना प्रशासनाची झालेली गडबड, ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना केबिनमधून बाहेर पडण्यासाठी नसलेली सवड, कर्मचाऱ्यांना कामास लावणे झाले अवघड, अधिकाऱ्यांची प्रशासनावरील सुटलेली पकड, त्यातून निर्णय घेताना होत असलेली धरसोड यामुळे उंब्रजकरांची होत असलेली परवड पाहता काहीच धड नसल्याचे दिसून येत आहे.अशा वेळेस सनदी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसारखे काम नाही केले तर उंब्रजचे काम तमाम होईल.

अधिकाऱ्यांचे काय? ते उद्या निघून जातील; पण तोपर्यंत उंब्रजचा श्वास गुदमरून जाईल, याचे भान ठेवून बेभान होऊन प्रशासनाने कोरोनाशी दोन हात करणे आवश्यक आहे. माणसाचे हित हेच सरकारचे ध्येय असते. हे ध्येय साध्य करण्याची जबाबदारी ही प्रशासनावर असते. अधिकाऱ्यांनी यंत्रणेला हाताशी धरून सरकारचे ध्येय प्रत्यक्षात आणले पाहिजे. या प्रक्रियेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका ही सरकारचा कणा असते. हा कणा कमकुवत असला की सरकारचे धोरण अपयशी ठरते आणि त्यात जनतेचे मरण होते. सध्या उंब्रजमध्ये हेच चित्र पाहण्यास मिळत आहे. उंब्रज तसे पाहिले तर या बाबतीत शापितच आहे तर मग या महामारीत मागे राहणार तरी कसे! 

डेरवण,तांबवे, चरेगाव,उंब्रज नंतर सर्वात शेवटी इंदोली रुग्ण भेटला आणि ६० दिवसातच सातारा जिल्ह्याने २०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा पल्ला गाठला आहे.या पेक्षा मोठं दुर्दैव दुसरे काय असू शकणार. काही दिवसांपूर्वी आपल्या उंब्रज नगरीत पहिला रुग्ण भेटला आणि चीन मधील वुहान ते सातारा हा ३८७५ किलोमीटरच्या अंतरावर असलेला सूक्ष्म जीव उंब्रज परीसरात कसकाय दाखल झाला हे एक कोडंच आहे. या महामारीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे त्या नुसार जिल्ह्याधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख आहेत या काळात सर्व अधिकार एकवटलेले आहेत प्रशासनाचे इतर अधिकारी जरी याचे सदस्य असले तरी त्यांची भूमिका जिल्ह्याधिकारी सहाय्यक अशीच आहे. काही अधिकारी वगळता समितीतील सर्व सदस्य हे नवीन आणि बिना अनुभवी असल्याने ते गोंधळून गेले आहेत. आपण करतोय काय आणि त्याच होतय काय? हेच त्यांना समजेनासे झाल्यामुळे त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत आणि कोरोना चा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे नाहक उंब्रजकारांचे गैरसोयी वाढत आहे.

नुसत्या चुकांवर चुका

रात्री अपरात्री कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट जाहीर होत आहेत अशा वेळी पोलीस प्रशासन झटून काम करीत आहे.मात्र ग्राम दक्षता समितीच "वराती मागणं घोडं"अशी अवस्था आहे.कोरोना प्रतिबंधासाठी उंब्रज ग्रामपंचायत प्रशासन काय करत आहे त्यांचे त्यांनाच कळत नाही कोणत्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत कोणता भाग सील करण्यात आला आहे, कोणता भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे याची माहिती मीडिया आणि जनतेला देताना ग्रामपंचायत प्रशासन अनेक चुका करत आहे. कधी रुग्णाचा परिसर सांगितला जातो एक आणि तो रुग्ण तिथे राहात नसून असतो दुसरी कडे राहायला पण त्या परिसराचे नाव आल्याने तो संपूर्ण परिसर त्या दशहती खाली दबत असतो त्या मुळे जनते मध्ये भीती निर्माण झाली आहे बर हे ग्रामपंचायत प्रशासन ही भीती देखील घालवत नाही. ज्या परिसरात पॉझीटीव्ही रुग्ण आढळला आहे तो परिसर फक्त नावालाच सील केला जातो वेळ मिळाला तर हे अधिकारी तिथे येतील आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रसिद्धी तयार.

पोलीस यंत्रणेची धावपळ

उंब्रज पोलिसांच्या कार्यक्षेत्रात १११ गावे येतात यामध्ये तारळे,मसूर आणि चाफळ ही दुरक्षेत्र येतात सध्या खालकरवाडी,उंब्रज,इंदोली आणि शामगाव या गावातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असल्याने सर्व गावे सील केली आहेत तर डेरवण आणि चरेगाव येथील रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत यामुळे औरस चौरस असणारी हद्द आणि पोलिसांची तोकडी संख्या तसेच यामध्ये 55 वर्षावरील पोलीस तसेच महिला कर्मचारी वर्ग या सर्व बाबींचा विचार केला असता साधारणतः 20 ते 25 धडधाकट पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावण्यासाठी उपलब्ध आहेत यामुळे पोलिसांची धावपळ होत असून पॉझिटीव्ह रुग्ण घोषित करण्यासाठी रातवा धरल्याने सर्वांचीच पळापळ होत आहे.


ही मंडळी तर गायबच आहे

गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, गावकामगार तलाठी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहताना कुचराई करत आहेत.सर्वच राजकीय पक्ष,राजकीय वर्तुळ, सामाजिक संस्था,भाई ,दादा, भाऊ, विविध ठिकाणचे आंदोलन धरणे करणारी ही मंडळी गायब झाली तरी कुठे हे त्यांनाच माहीत नेहमी अवैध धंद्या विरोधात आमरण उपोषण, मोर्चे, धरणे देणारी ही मंडळी वेळ पडली तर आत्मदहन करणारे हे स्टंटबाज आज कुठे दडून बसले आहे ते कळेनासे झाले आहे.

या धोक्याला नागरिक ही तेवढेच जबाबदार

एके काळी आरक्षणा साठी पेटून उठलेली जनता आज अगदी मूग गिळून गप्प बसली आहे. मान्य आहे की बाहेर पडणे शक्य नाही आणि लॉकडाऊन मध्ये बाहेर पडू देखील नाही पण तुमच्या जवळ सोशल मीडियाचे साधन आहे त्याचा उपयोग आरक्षण, धरणे, आंदोलन, या साठी केला जायचाच ना मग आता कोणी सुजाण जगरिकांनी गृप नाही बनवला? ना कोणी कोणत्या पोस्ट काढल्या तुम्ही पण एक सुशिक्षित सुजाण नागरिक आहात तर तुमचे पण काही कर्तव्य आहेच ते दाखवणार कधी? माय बापहो हे जाती पातीच राजकारण बाजूला सारून फक्त मानवता धर्म स्वीकारून उंब्रजकरांनी आपले बळ दाखवायची वेळ आली आहे नाहीतर हाच तुमच्या परिसराच्या वेशीवर येऊन धडकलेला कोरोना तुमचा कधी घात करेल हे सांगता येणार नाही.वेळीच आपण समजदार झालोत तर ठीक, अन्यथा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही.

संपूर्ण मीडिया तयार पण यांच्या गोंधळाने बेजार

फक्त मीडिया पोहचवेल ते वाचायचं आणि गप्प बसायचं याची जनतेला सवय झाली आहे पण एक तुम्ही पण विसरता आहात आम्ही मीडिया वाले देखील माणसच आहोत आम्हाला पण परिवार आहे भीती आमच्या पण मनात आहे पण ती बाजूला सारून आणि तुमच्या पर्यंत प्रत्येक घटना बातमी सखोल पोहचवायचा प्रयत्न आम्ही पत्रकार मंडळी करतोच आहोत तालुक्यातील भयावह परिस्थिती पाहता संपूर्ण मीडिया एकवटली आहे मग ते न्युज पेपर असोत न्युज पोर्टल असो की नॅशनल, लोकल, किंवा युट्युब चॅनल असुदेत सर्वजण एकवटून काम करत आहेत पण या ढेपाळलेल्या कार्यप्रणाली समोर ते सुद्धा हतबल झाले असल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाला आणखी काही मदत लागली तर त्यांनी प्रसार माध्यमांना जरूर सांगून विश्वासात घ्यावे मीडियाचा प्रत्येक कर्मचारी हा अगदी कंबर खोचून तयार आहे शेवटी प्रश्न आहे तो आपल्या गावाचा

नुकसान उंब्रजकरांचे होईल

ग्राम समितीच्या सदस्यांमध्ये ताळमेळ नाही कामात सुसूत्रता नाही मुळात कामाचा आवाका कोणालाच नाही तहसीलदारांनी बैठक घ्यायच्या गट विकास अधिकारी  यांच्या कडे बोट दाखवायत असुविधा लपवायच्या, पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून जनतेची वाहने जप्त करायची, या पलीकडे या समितीचे काम पुढे सरकत नाही, त्यातून उंब्रजकरांचे अफाट नुकसान होईल. अधिकाऱ्यांचे काय होणार? ते उद्या बदलून जातील बदलून जाताना उंब्रजकरांनी शेवट पर्यंत आदराने तुमची आढवण काढली पाहिजे असे काम करून जा त्यातच अधिकाऱ्यांचे लोकहीत आणि यश आहे.