कोरोना’मेभी... कोई रो ना... ! कराडकरांचा निर्धार

कराडकर कोणत्याही  संकटकाळात गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतात. मग तो महापूर असो वा महामारी. अनेकदा कराडकरांना याचा प्रत्ययही आलाय. सध्या कोरोना संकटात वेळेत उपचार न मिळाल्याने डोळ्यांदेखत अनेकांनी जीव गमावल्याचे पाहताना लोकांच्या अश्रुंचे बांध फुटू लागले आहेत. अशा प्रसंगी विविध स्व’रुपात कराडकर देवदूतासारखे त्यांच्या मदतीसाठी धावत असून कोरोना’मेभी... कोई रो ना... ! असा जणू निर्धारच कराडकरांनी केला आहे.

कोरोना’मेभी... कोई रो ना... ! कराडकरांचा निर्धार

राजेंद्र मोहिते/ कराड : 

         कराडकर कोणत्याही  संकटकाळात गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतात. मग तो महापूर असो वा महामारी. अनेकदा कराडकरांना याचा प्रत्ययही आलाय. सध्या कोरोना संकटात वेळेत उपचार न मिळाल्याने डोळ्यांदेखत अनेकांनी जीव गमावल्याचे पाहताना लोकांच्या अश्रुंचे बांध फुटू लागले आहेत. अशा प्रसंगी विविध स्व’रुपात कराडकर देवदूतासारखे त्यांच्या मदतीसाठी धावत असून कोरोना’मेभी... कोई रो ना... ! असा जणू निर्धारच कराडकरांनी केला आहे. 
          जिल्ह्यात कराड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. परंतु,पहिल्या लॉंकडाऊनपासून आत्तापर्यंत कराडकरांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था,  व्यापारी, लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरीकही वैयक्तिक व सामुहिकरित्या पुढे आली. त्यांनी गरजूंना धान्य, भाजीपाला कीट, अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश, आयुर्वेदिक काढे व अन्य औषधे आदींची मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या सगळ्यातून कराडकरांमधील दातृत्वाची झलक दिसून येते.
           सध्या बाधितांची शहरासह तालुक्यात झपाट्याने वाढ होत आहे. परंतु, त्यामानाने येथील कोविड सेंटरमध्ये त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वेळेवर बेड व उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तसेच घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही  ऑक्सिजनसह तातडीच्या उपचाराविना तडफड होत आहे. अशा परिस्थितीत काळ, वेळ, प्रसंगी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता शहरातील तरुणाई लोकांच्या मदतीसाठी सरसावत असल्याचे दिसत आहे. या युवक, तरुणांमुळेच अनेकजण अक्षरशः मृत्युच्या दारातून परतल्याचे वास्तवही अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांनी मान्य केले आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जागतिक महामारीत खर्या अर्थाने या तरुणाईच्या रुपात कराडकरांना देवदूतच भेटत असल्याची चर्चा सध्या शहराच्या चौकाचौकात सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
            शहरात बेड, ऑक्सिजन,  व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेसाठी रुग्णांच्या कुटुंबिय, नातेवाईकांची ससेहोलपट चालू आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात तर अशाप्रसंगी लोकांची घबराहट होत असून नेमके काय करायचे? कुठे जायचे?आदी. प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहेत. अशांना मानसिक आधार देत कराडमधील काही युवक रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना ऑक्सिजन मशीन लावत आहेत. तर काहीप्रसंगी आवश्यकतेनुसार रुग्णांच्या विविध चाचण्या करण्याचा सल्ला देत त्यांना त्यानुसार बेड, उपचार, औषधे, इंजेक्शन आदी. मिळण्यासाठी ते रुग्णालय, औषध दुकानांमध्ये धावाधाव करत आहेत. 
          तसेच जवळपास आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यास इतर जिल्ह्यातून त्या उपलब्ध करण्यासाठीही त्यांची अहोरात्र धडपड चालल्याचे दिसून येते. या रुग्णांशी कोणतेही नाते-गोते नसताना केवळ त्यांचा जीव वाचवण्यासाठी संबंधित युवकांचे निस्वार्थी भावनेतून त्यांनी चालविलेले प्रयत्न व विविध स्वरुपात त्यांनी सुरु केलेल्या मदतीचा अनोखा महापूर पाहता अनेक कराडकर भावूक होत असल्याचे हृदयस्पर्शी चित्रही सध्या अनेकठिकाणी पाहायला मिळत आहे. 


*कराडकर नागरिकांचीही माणुसकी ...* 

आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक संकटकाळात कराडकरांनीही तितकीच जागरुकता दाखवत परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. गतवर्षीच्या महापूर काळात  पूरग्रस्त, स्थलांतरित झोपडपट्टीवासीय,  अतिवृष्टीच्या काळात महामार्गावर अडकलेल्या वाहन चालकांनाही अनेक नागरिकांनी मोलाची मदत केली. तसेच कोरोनासारख्या महामारीतही अनेकांनी  सामाजिक बांधिलकी जोपासत घरी अन्नधान्यांची पाकिटे बनवून गरजूंना मदत केली. शिवाय, माणुसकीची भिंत या उपक्रमाच्या माध्यमातूनही आपापल्या परीने गरजूंना मदत केली आहे. त्यामुळे कराडकारांनीही प्रत्येक संकटावेळी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 


*हेही नसे थोडके ...*  

सध्या कोरोनाच्या समूह संसर्गसदृश्य परिस्थितीला सुरुवात झाली आहे. अशा काळात नागरिकांनी आणखी खबरदारी घेणे गरजेचे आहे. किरकोळ लक्षणे आढळल्यास तात्काळ आवश्यक चाचण्या करून त्यानुसार उपचार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी अंगावर आजार न काढता सरकारने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला शंभरटक्के प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच आपापली जबाबदारी स्विकारून आपल्यामुळे कोणाला संसर्ग होऊ नये, याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अयोग्य पथकाला सत्य माहिती सांगून नागरिकांनी स्वतःसह कुटुंबियांचा, परिणामी कराडकरांचा जीव धोक्यात येणार नाही, याचीही काळजी घेतल्यास शहरातील वाढता कोरोना संसर्ग थोपवता येईल.