सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी.

महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी.जिल्ह्यातील शाळा सुरू राहणार मात्र शाळांमध्ये तपासणी पथके पाहणी करणार : पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील

सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी.

 

नाममात्र अंमलबजावणी, बेभान नागरिक

 

मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे लागलेला कडक लॉकडाऊन गोरगरीब जनतेचे अर्थकारण बिघडवणार ठरला आहे.अनेक प्रयास तसेच उपयोजना करीत सरकारने या महामारीवर काही अंशी नियंत्रण मिळवले आणि लॉकडाऊन शिथिल केला.यामुळे सर्वसामान्य जनतेची गाडी कशीबशी रुळावर यायला लागली होती परंतु पुन्हा एकदा घात होण्याची चिन्हे दिसू लागल्याने गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.मूठभर बेभान नागरिकांमुळे समस्त राज्यातील नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोना महामारीचा नायनाट झाला अशा गैरसमजात प्रजा तसेच प्रशासन वागत असल्याने सोशल डिस्टन्स,मास्क आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर संपल्यातच जमा झाला आहे.राजकीय नेतेमंडळी बेफाम झाल्यासारखे राजकीय कार्यक्रम आयोजित करत असून यामुळे कोरोनाचे थैमान पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.विदर्भातील जिल्हयात याची चाहूल लागली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात काही अशी बंधने आली आहेत.यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा दिला असून आठ दिवसाचा निरीक्षण कालावधी दिला आहे यामुळे आपल्या वागणुकीत सुधारणा करायची की घरी बसायचे याचा निर्णय संपूर्णतः जनतेला घ्यायचा असुन बिकट प्रसंगी धीराने तोंड देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गलेलठ्ठ पगार असलेले नोकरशहा,शासकीय कर्मचारी किंवा मुळचेच गर्भश्रीमंत असणाऱ्या व्यक्तींनी लॉकडाऊन एका दीर्घकालीन उन्हाळी सुट्टीसारखा उपभोगला महिन्याला मिळणार बक्कळ पगार आणि दोनवेळच्या पोटापाण्याची झालेली सोय यामुळे गोरगरीब जनतेचे दुःख त्याच्या वाट्याला आले नाही.लॉकडाऊन शिथिल होताच तुरुंगातून मुक्त झाल्यासारखे गर्भश्रीमंत लोक उधळले यामुळे पर्यटन स्थळे तसेच लग्न समारंभ झोकात गर्दीने फुलून गेले पैशाची उधळण आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला तर मास्क वापरणे कमीपणाचे वाटू लागल्याने कोरोना महामारीचा धोका मानगुटीवर बसतो की काय अशी शक्यता निर्माण झाल्याने गर्भश्रीमंत जगतील वाचतील किंवा महागडे उपचार घेऊन तंदुरुस्त ही होतील परंतु गोरगरिबांनी काय करायचे आणि कुठे जायचे  हा प्रश्न निर्माण होणार आहे यामुळे पुन्हा लॉकडाऊन सर्वसामान्य जनतेला परवडणारा नाही यासाठी गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांनीच शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही.