तरीही निवडणूक का...?

यशवंतराव मोहीते कृष्णा कारखान्याची व गोकूळ दूध संघाची निवडणूक सुरू आहे.

तरीही निवडणूक का...?

 

तरीही निवडणूक का...?


त्यांचे जीवित महत्वाचे आहे असे एका याचिकेचा निवाडा करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी नमूद केल्याचे वाचले नि गिरीष कुबेर यांच्या   ‘उत्सव’ बहुत थोर होत ह्या लेखातील लस संशोधन केट बिंग्हॅम व ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यातील सृजनाची कास धरणाच्या संवादाची आठवण झाली.  प्रथम प्रथम पंतप्रधान एवढच म्हणाले, आपल्याला माणसं वाचवायची आहेत. पंतप्रधानाच्या या एका वाक्याने लस संशोधन केट बिंग्हॅम कामाला लागतात. त्यांच्या संशोधनातून जी लस निर्माण झाली. त्या लसीकरणामुळे आज ब्रिटनमधील 60 टक्के जनता कोरोना मुक्तीचा श्वास घेत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची ही मानवाला वाचवू पाहणारी विधाने आमच्या जनमाणसाच्या व राजकारण्यांच्या खिसगणतीत दिसतात. काहीही करा आम्ही गर्दी करणारच, उत्सव घेणारच, निवडणूकीत जलोष करणारच, लसीकरणावरून राजकारण करणारच, कुंभमेळ्यात गंगोदक उधळणारच...! मग सामान्यांच्या जीवीताची चाड का धरावी?


यशवंतराव मोहीते कृष्णा कारखान्याची व गोकूळ दूध संघाची निवडणूक सुरू आहे. या संस्थाच्या निवडणूकीबरोबर 167 संस्थाच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीतील एक हक्कदार आम्ही कोर्टोत गेलोय असं घरातूनच टेंभा मिरवतोय तर कुणालाही हस्तांदोलन न करणार्‍या हक्कदारास कोविडचा धोका अजिबात संभावत नाही तर तिसरा हक्कदार स्वत: वैद्यकीय व्यवसायिक असल्यामुळे त्यांना कोरोनाचे भय नाही. अशांनाच ही निवडणूक हवी आहे. कारण त्यांच्या समाजसेवेचे ते एकमेव साधन आहे.


महाराष्ट्रात फेब्रुवारी 2020 मध्ये पहिला कोविड रूग्ण मिळाला. 10 मार्च 2020 पासून लॉकडाऊनची छाया दाट होवू लागली. 15 मार्च ला 2020 ला सर्व शाळा बंद करण्यात आल्या. कोरोनाची लाट वाढली आक्टोबर 2020 त्याची घसरण सुरु झाली. पण आता परत आपण कोरोनाच्या दुस-या लाटेत अडकलो आहेात. गतवर्षीच्या या तारखेला असणा-या रुग्णसंख्येच्या कितीतरी जास्त बाधितांची संख्या आज आपल्यासमोर आहे. सातारा जिल्हयात दि. 19 एप्रिल अखरे 12681 रुग्ण आहेत तर 1406 नवीन रुग्ण आहेत. सांगली जिल्हयात 7053 रूग्णसंख्येत 830 नवीन रूग्ण आहेत. ही रुग्ण बाधितांची संख्या अंगावर काटा आनणारी आहे.


कृष्णा कारखान्याची निवडणूक सातारा जिल्ह्यातील कराड व सांगली जिल्ह्यातील वाळवा व खानापूर - कडेगाव इतर दोन जिल्ह्यातील तीन तालुक्यामधील 38 हजार सभासदांच्यामधून होणार आहे. ( मयत सोडून ) निवडणूक न्यालयाच्या आदेशाने होवू घातलेली आहे . न्यायालयाने दिलेला निवाडा व आजची परीस्थिती यामध्ये खूप अंतर पडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की न्यायलयानेच रिव्यू करून योग्य निर्णय घ्यावा लागेल.  असे झाले नाही तर आपल्याच उच्च न्यायलयाच्या मानवतावादी विधानाला आत्मीयता असणार नाही.

 

मेडिकल, इंजिनियरिगंच्या प्रवेश परिक्षा, एसएससी, एचएससी, जेईई या भारतातील तरुणाई घडविणा-या परीक्षा राज्यकर्ते पुढे ढकलतात. सर्व देशाची नवीन पिढी घडविणारी ही शिक्षण प्रक्रिया स्थागित करताना राजकारणी नियमांच्या आटापिटा करतात. मात्र निवडणुकांसाठी ते आग्रही का असतात. मला याची कल्पना आहे की आता संचालक मंडलाला मुदत वाढ देणे शक्य नाही. तरीही पर्याय शोधून धोका टाळावाच लागेल. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोरोना वाडतोय. पश्चिम महाराष्ट्रातील आजची परिस्थिती भयावह आहे. महाराष्ट्राच्या तूलनेत पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 27 टक्के आहे तर मृत्यू दर ही तेवढाच आहे. (मृत्यू 16535)रोजच्या वाढीचा वेगही अगदीच गतीमान आहे. कोविड 19 नॅशनल टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. नरेंद्रकुमार आरोरा यांनी येत्या 15 मे पर्यत कोरोनाची संक्रमण वेगाने वाढणार आहे असा गर्भिैत इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत सांगली व सातारा जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग चिंताजनक आहे. अशा परिस्थिीतीत सांगली जिल्ह्यात दि.20 एप्रिल 992 नवीन बाधित सापडले आहेत.


अशा परिस्थितीत निवडणूक प्रकियेतील हालचालीमुळे कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत जाईल. आज समोरून आलेला माणूस पॉझिट्व्हि आहे की निगेटिव हे कसे कळणार .. मला काही समस्या अशा वाटत आहेत.


1) ज्या घरात सभासद आहे. पण तेथील व्यक्ती पॉझिट्व्हि असल्यास त्याचा शोध कसा घेणार. आजचेच माझ्या गावातील उदाहरण घेवू . एका शेतकरी कुटुबात चार शेअरधारक पात्र सभासद आहे  पण त्या एकत्र कुटुंबातील सहा व्यक्ती कोरोना बाधित आहेत. ही बाब परगावच्या उमेदवारास कसे समजणार .?


2) उद्या कडक संचारबधी लागू झाली नि निवडणूक कार्यक्रम लागला तर सांगली जिल्ह्यातील वाळवा, खानापुर-कडेगाव तालुक्यातील लोक कराडला कसे जाणार?


 3) कृष्णेच्या निवडनुकीला तर कृष्णा कारखाना, कृष्णा उद्योग समूह, इरिगेशन, शिक्षणप्रसारक मंडळ, कृष्णा बँक ,पतसंस्था कारखाना शेती विभाग एवढया संस्थांचे विनाथकीतचे दाखले गोळा करण्यास होणा-या गर्दीला कसे टाळणार .?


4) यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीसांठी तीन पॅनेलनी दंड थेापटले तर 63 उमेदवार त्यांचे डमी धरून कमीतकमी 126 उमेदवारांच्या गर्दीत घुसून फिरणे म्हणजे कोरोनाच्या तिरडी वरुन फिरण्यासारखे आहे.


5) अशा परिस्थितीत संभाव्य उमेदवार मतदार सभासदांना कसे भेटणार .?


6) प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान पत्रिका देणे घेणे, बोटाला शाई लावणे, मतदान पेटी व तेथील वस्तूंना होणारा स्पर्श हे सर्व कोरोना बाधित होणार नाही कशावरून ?  काल इस्लामपूर व आष्टा या दोन शहरात विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन टेस्ट केल्या तर त्यातून आठजण कोरोना बाधित निघाले. मतदाना दिवशी मतदान केंद्रावर येणारा मतदार कोरोना बाधित नाही ते कसे ठरणार ?  निवडणूक आली दारी कोरोना हातपाय पसरी अशी या दोन जिल्हांची अवस्था आहे.


7) या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 38 हजारांची निवडणूक जवळजवळ दहाबारा लाख लोकसंख्येला बाधित करण्याची शक्यता आहे. कराड, वाळवा, खानापूर, कडेगाव तालुक्यातील शेतकरी या परिस्थितीने भयभीत झाला आहे. या भयानक महामारीचा विचार करून निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी या तालुक्यातील शेतकरी व सामान्य जनता करीत आहे.
या पार्श्वभूमीवर या कारखान्यावर हक्क सांगणार्‍या तिन्ही पॅनेल प्रमुखांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येवून ज्यांनी याचिका दाखल केली आहे अशा वादीला घेवून बदलत्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी उच् न्यायालयात रिव्हिजनसाठी याचिका दाखल करावी. मला तर वाटते बदलत्या परिस्थितीचा विचार करून संभाव्य तिन्ही पॅनेल प्रमूखांना एकत्र आणण्याचे प्रयत्न मा. मदन मोहिते सारख्या पोक्त व्यक्तीने करावेत. मदन मोहितेंनी या मानवी जीवितांसाठी या कामी पुढाकार घ्यावा.


या बदलत्या परिस्थितीचा विचार करूनही संचालक मंडळाला मुदत वाढ देणे शक्य नसेल सर्व समावेशक तज्ञांची समिती नियुक्त करावी. अगदीच पर्याय सापडत नसेल तर प्रशासक नेमावा पण कोरोनाच्या या उद्रेकापासून सामान्य जनतेला दिलासा देवून कोरोना भयमुक्त करण्यासाठी निवडणूक पुढे ढकलणे हे जनतेच्या हिताचे आहे.

प्रा.अनिल पाटील
कामेरी