भोसलेंची पोस्टरबाजी, मोहितेंच्या बैठका

भोसलेंची पोस्टरबाजी, मोहितेंच्या बैठका

भोसलेंची पोस्टरबाजी, मोहितेंच्या बैठका


कराड/प्रतिनिधीः-


संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणूक अखेर जाहिर झाली. या कारखान्यात सत्तेवर असलेले सहकार पॅनेलचे नेते व विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या कामकाजाची पोस्टरबाजी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावागावात लावण्यात आली आहे. तर दुसरीकडे मोहितेंच्या बैठका सुरू आहेत. माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते आणि अविनाश मोहिते हे दोन गट एकत्रित येणार यासाठी गेल्या काही दिवसापासून मोजक्या कार्यकार्त्यांच्या बैठका सुरू आहेत. बैठकाचे फलित काय झाले. हे जरी समजू शकले नसले तरी, काही जागा वगळता दोन्हीही गटामध्ये एकमत झाल्याचे समजते. काँग्रेसचे नेते आणि रष्ट्रवादीतील काही नेते या दोन गटांनी एकत्रित यावे म्हणून प्रयत्नशील आहेत. तर निवडणुकीच्या आदीच सहकार पॅनेलने आपल्या कामकाजाची ठळक माहिती असणारी फ्लेक्स बोर्ड मतदार संघात झळकवले आहेत. या फ्लेक्स बोर्डवर डॉ. सुरेश भोसले यांचा एकमेव फोटो लावण्यात आला आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार यात तीळ मात्र शंका नाही.


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळया कारणाने परिचित आहे. 1989 पासून या कारखान्यात सख्खे भाऊ, पक्के वैरी झाल्याचे पहायला मिळाले. कृष्णेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ही तशाच गाजल्या. एकमेकावर आरोप करत 1987 च्या दरम्यान रयत संघर्ष मंचची स्थापना करून थोर विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी आपले धाकटे बंधू सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आणि निवडणूकही लढविली. तब्बल तीस वर्षाची जयवंतराव आप्पांची सत्ता उलथून भाऊंनी इतिहास घडविला. हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. दोन्हीही नेते आपआपल्या जागी मोठे होते. मात्र भाऊंनी ही लढाई जिंकली आणि कारखान्यात परिवर्तन करून रयत संघर्ष मंचच्या झेंड्याखाली सत्ता बनवली. ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याचा मालक आहे, ऊस पिकवणारा प्रत्येक शेतकरी सभासद झाला पाहिजे. कराखाना आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा...! बघताय काय सामिल व्हा...! अशा घोषणा देत हे परिवर्तन घडविले होते. कारखान्यात सत्तेवर आल्यावर आपले पुतने मदनराव मोहिते यांना त्यांनी चेअरमन केले व कामकाजाला प्रारंभ केला.
तदनंतर मदनराव मोहिते यांच्या कामाचा ठसा सभासदांच्या स्मरनार्थ राहिला आणि 1994 च्या निवडणूकीत पुन्हा भोसलेंना सत्तेपासून दूर ठेवत त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचा पराभव करून भाऊंनी ही सत्ता रयत पॅनेलच्या नेतृत्वाखाली जिंकली आणि मदनदादा चेअरमन झाले. सलग दहा वर्ष चेअरमनपदाची पूर्ण झाल्यानंतर 1999 च्या निवडणूकीत कारखान्यात जयवंतराव आप्पांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली रयत पॅनेल यांच्यात संघर्ष झाला. दहा वर्षाची सत्ता घालवनू आप्पांनी कारखान्याची निवडणूक जिंकली व कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांना संधी दिली. डॉ. सुरेश भोसलेंचे नेतृत्व व स्मित स्वभाव फार काळ टिकू शकला नाही. मात्र डॉ. सुरेश भोसले यांना एक वर्षाचा कालखंड लोकरी मावा आल्याने वाढवून मिळाले सहा वर्षाची सत्ता त्यांच्याकडे राहिली. आणि पुन्हा एकदा परिवर्तन झाले व रयत पॅनेलची सत्ता आली. यावेळी मात्र यशवंतराव मोहिते यांचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहिते हे कारखान्याचे चेअरमन झाले. त्यांची कार्यपद्धती परखड होती. कारखान्याच्या हिताच्या आड येणार्‍याची ते गयी करत नव्हते. यातून कर्मचार्‍यांंसह अनेक सभासद दुखावले गेले. केवळ पाच वर्षाची सत्ता डॉ. मोहिते यांना भोगता आली.


2010 च्या निवडणूकीपूर्वी यांचे तथाकथीत मनोमिलन झालेे. मोहिते-भोसले एकत्रित झाले. याचा पुढाकार खुद्द डॉ. इंद्रजित मोहितेंनी घेतला आणि आपल्या कुटुंबातील संघर्ष संपवण्याचा प्रयत्न केला. पण हे कृष्णाकाठच्या सभासदांना मान्य नव्हते. इथे आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते हा युवक या सत्ताधिशांच्या विरोधात उभा ठाकला. निवडणूक चांगलीच गाजली आतून त्यांना काही नेत्यांनी मदत केली तर विलासकाका उंडाळकर यांनी उघड भूमिका घेत अविनाश मोहिते यांचा प्रचार केला. या मनोमिलना विरोधात मोठा असंतोष होता. नवखे चेहरे दवून अविनाश मोहिते निवडणूकीच्या रणांगणात फिरत होते. कोणीही म्हणत नव्हते की कारखान्यात पुन्हा सत्तांतर होईल पण कृष्णा कारखान्याचे सभसाद सुज्ञ आहेत हे त्यांनी अनेकवेळा वेगवेगळे पॅनेल निवडून दिल्याचे ख्याती सिद्ध केले. आणि तथाकथित भोसले-मोहितेंचे मनोमिलन नाकारून पुन्हा एकदा कृष्णेत इतिहास घडला. अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनेल निवडूण आले. अविनाश मोहिते चेअरमन झाले. त्यांचा 2010 ते 2015 चा कालखंड होता. 2015 च्या निवडणूकीत पुन्हा मोहिते-भोसलेंचे मनोमिलन तुटले कारखान्याच्या निवडणूकीत तीन पॅनेल उभी राहिली. या तिरंगी लढतीत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने सत्ता हस्तगत केली खरी पण कृष्णेच्या इतिहासात क्रॉस वोटिंग झाले. आणि अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनेलचे सहा सदस्य निवडून आले. स्वतः अविनाश मोहितेही निवडून आले. कृष्णेच्या या रणांगणात पैशाच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल झाला आणि अविनाश मोहिते यांच्यासह काही जणांना अटक झाली. कायदेशीर लढाई सुरू झाली ही अद्यापही न्यायालयात सुरू आहे.


2015 ते 2021 कारखान्याचा कारभार डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. त्यांना कोरोना महामारीमुळे काही कालखंड वाढवून मिळाला. आज या कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असली तरी गेल्या तीन महिन्यापासून निवडणूकीची रणनीती आखण्यामध्ये तीनीही पॅनेलचे नेते व्यस्थ आहेत. कारखान्याची निवडणूक केव्हाही लागू शकते हे गृहीत धरून डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते हे सभासदांच्या संपर्कात होते. निवडणूकीचे बिगुल केव्हाही वाजू द्या, आम्ही तयार आहोत.. असे तीन्हीही नेते म्हणत आहेत. डॉ. सुरेश भोसले यांच्या चेअरमनपदाच्या कालखंडातून फ्लेेक्स बोर्ड सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झळकत आहेत. या फ्लेक्सवर एकटयाची छवी आहे. तर दुसरीकडे मोहितेंच्या बैठका सुरू आहेत. त्यांच्यातील काही मोजके कार्यकर्ते हे दोन गट एकत्रित झाल्यास संभाव्य उमेदवारी कोणी कोणाला द्यायची यावर बैठका करत आहेत. काही जागांवर त्यांचे एकमत झाले आहे. तर ज्या जागा वादग्रस्थ आहेत त्या जागेवर वरिष्ठ नेत्यांच्या समोर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. कारखान्याची निवडणूक दुरंगी का तिरंगी हा प्रश्न अद्याप जरी बाकी असला तरी कारखान्याची निवडणूक दुरंगीच होईल अशी शक्यता सध्या चर्चेली जात आहे.