दुरंगी का तिरंगी?

दुरंगी का तिरंगी?

दुरंगी का तिरंगी?


कृष्णा कारखान्याची 2010 ची निवडणूक जसजशी जवळ येवू लागली. तसतसे कृष्णेच्या कार्यक्षेत्रात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या. तब्बल 22 वर्षे मोहिते-भोसलेंचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्या दोन घरांना एकत्रित आणण्यासाठी भारती विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यातील कॉग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांनी पुढाकार घेत चर्चा घडविल्या. त्याला नातेवाईकांनीही साथ दिली. आणि अखेर मोहिते-भोसलेंचे मनोमिलन झाले. मनोमिलन झाल्यानंतर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक मोहिते-भोसले एकत्रित झाल्याने तेच जिंकणार अशी चर्चा रंगत होती.

त्याचवेळी कृष्णेच्या कार्यक्षेत्रात आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते हे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावाला भेट देत सभासदांशी संपर्क करत होते. त्यांनी नवीन चेहर्‍यांना बरोबर घेत संस्थापक पॅनेल रणांगणात उतरीले. त्याला विलासकाका उंडाळकर यांनी साथ दिली व वाळव्यातूनही बलाढ्य राजकीय नेत्यांची मदत मिळाली आणि कृष्णाकाठी नवा इतिहास घडला. मोहिते-भोसले यांना सोडून कारखाना पहिल्यांदा दुसर्‍या नेतृत्वाकडे गेला. अविनाश मोहिते चेअरमन झाले. त्यांचा सभासदांशी थेट संबंध होता. प्रत्येक सभासदाच्या सुख,दुखाःमध्ये सहाभागी होण्यावर त्यांनी भर ठेवला. कारखान्याची ही कारकीर्द त्यांनी राबवत असताना सभासदांना खुश ठेवण्याचे काम कायम केले.

नवीन चेहरे बरोबर घेवून इतर नेत्यांचे मार्गदर्शन घेत त्यांचा कालखंड पाच वर्षाचा संपला. आणि 2015 ची निवडणूकीचे पडघम वाजू लागले. 2010 च्या निवडणूकीत झालेले मोहिते-भोसलेंचे मनोमिलन या निवडणूकीच्या निकालानंतर वर्षभरातच संपुष्टात आले होते. घरघुती कार्यक्रम असो अथवा भाऊंची जयंती याच्या कार्यक्रमानिमित्त ते एकत्रित दिसायचे. मात्र मनाने ते दुभंगलेले होते.  2015 च्या निवडणूकीत त्याचा प्रत्यय आला. मदनराव-इंद्रजित मोहिते यांनी रयत पॅनले निवडणूकीच्या रिंगणात उतरविले. तर डॉ. सुरेश भोलसे यांनी सहकार पॅनेल उभे केले. सत्ताधारी अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनेल असा हा तिरंगी सामना कृष्णेच्या फडात गाजू लागला.

रयत व सहकार पॅनेलकडून प्रचारादरम्यान अविनाश मोहितेंच्या कारभारावर प्रश्न उभे केले जात होते. अविनाशदादाही त्याला समर्पक उत्तरे देत होते. निवडणूकीचे मतदान झाले. मतमोजणीवेळी (काहीकाळ गोंधळ) अनेक वेळा ऑब्झेक्शन घेण्यात आली. मात्र निवडणूकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये सत्ताधारी संस्थापक पॅनेलला सहा जागांवर विजय मिळवता आला. तर उर्वरित पंधरा जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. (या निकालावर हरकती घेण्यात आली.) सहकार पॅनेल सत्तेवर आले. पुन्हा डॉ. सुरेश भोसले हे कारखान्याचे चेअरमन झाले.

डॉ.सुरेशबाबांनी आपल्या कारकीर्दीचा दुसरा अध्याय सुरू केला. कृष्णेच्या इतिहासात पहिल्यांदाच संमिश्र सत्ता आली होती. विरोधक म्हणून सहा संचालक काम करत होते. त्यातील महिला राखीव सौ. उमा अजित देसाई यांच्यावर तक्रार करण्यात आली. आणि तक्रारीत त्यांचे संचालक पद रद्द झाले. त्यामुळे अविनाश मोहिते गटाकडे निवडून जरी संचालक आले असले तरी प्रत्यक्ष पाचच संचालक बरोबर काम करत होते. विधान सभेच्या निवडणूकीची धामधूम सुरू झाली. डॉ. अतुल भोसले हे भाजपच्यावतीने निवडणूक रिंगणात होते. तर अविनाश मोहिते हे काँग्रेसचा प्रचार करत होते. अशाच वेळी बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 58 कोटींच्या कर्ज प्रकरणी  अटकेची प्रक्रिया पार पडली. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. काही कालखंडानंतर अविनाश मोहतेंसह इतरांना जामीन मिळाला. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.


कोरोना महामारीमुळे डॉ. सुरेश भोसले यांच्या संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आणि आता प्रत्यक्ष निवडणूकीला सुरूवात झाली आहे. अर्ज भरले गेलेले आहेत. दोन मोहिते गटांच्या एकीकरणाची चर्चा कृष्णाकाठी सुरू आहे. त्यामुळे हे एकीकरण होणार की पुन्हा एकदा तिरंगी निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने प्रचाराचा प्रारंभही केला आहे. त्याच बरोबर डॉ. इंद्रजित मोहिते यांनी रयत पॅनेलचा प्रचार सुरू केला आहे. अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलचा प्रचार सुरू केला आहे. एकीकरण झाले किंवा नाही तरी कृष्णेची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.


तिन्हिही पॅनेलच्या वतीने उमेदवार उभे करण्यात आले आहेत. निवडणूकीसाठी मोठया प्रमाणात अर्ज दाखल झाले असून. अर्ज मागे घेण्याची मुदत 17 जून पर्यंत आहे. तोपर्यंत दोन मोहितेंच्य एकीकरणावर चर्चा होणार का? निर्णय होणार. याकडे कृष्णाकाठचे लक्ष लागले असून जो काय निर्णय व्हायचा तो दोन दिवसात होणे गरजेचे आहे. अन्यथा एकला चलो चा नारा देत प्रत्येकजण प्रचारात मग्न होईल. कालखंड कमी असल्याने प्रत्येक गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते बास झाली चर्चा, निर्णय कळवा..! नाहीतर आपले आपण करू, अशा पवित्र्यात सर्वजणच आल्याचे पहायला मिळत आहेत. दुसरीकडे  सहकार पॅनेलने उमेदवार निश्चित केले आहेत. त्यामुळे ते प्रचाराच्या कामात गुंतल्याचे पहायला मिळत आहेत. डॉ. सुरेश भोसले यांच्यासह युवानेते डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले हे प्रचारात सक्रीय झाले आहेत. उद्याच्या निवडणूकीत काय होईल हे कृष्णाकाठचे सभासदच ठरवतील...