कृष्णाकाठी नुसताच बोलबाला

कृष्णाकाठी नुसताच बोलबाला
कृष्णाकाठी नुसताच बोलबाला

कृष्णाकाठी नुसताच बोलबाला

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीचा धुरळा उडाला, चर्चा झाल्या, बैठका झाल्या काहींनी अपयश आले म्हणून बाहेर जाणे पसंद केले. तर कोरोनाच्या लाटेत सातारा-सांगली जिल्हा हेलकावे खात होता. अशातच कृष्णाकाठी बोलबाला झाला. निवडणूक झाली. पृथ्वीराजबाबांनी अंग काढून घेतले, ना. विश्वजित कदमांची एन्ट्री झाली, उदयदादांनी सवता सुभा मांडत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, नुसताच बोलबाला ठरला. भोसले भारी पडले आणि कृष्णेत विरोधकांचे पाणीपत करत बोलबाला करणार्‍यांची अवस्था दयनीय करून आपली मोहर सत्तेच्या सारापाटावर ऐतिहासिकपणे नोंदवली. हे का घडले? कसे घडले? यावर मतिगुंग करणारा हा निर्णय विरोधकांसह सर्वांनाच चिंतन करायला लावत आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा कारखाना म्हणून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याकडे पाहिले जाते. या कारखान्याची निवडणूक म्हटली की, मोठा बोलबाला होतो. कृष्णेत मोहिते-भोसले असा संघर्ष 1989 पासून सुरू झाला. तो कायम आहे. कधी मोहितेंच्याकडे तर कधी भोसलेंच्याकडे कृष्णेचे सभासद कारखाना चालवण्याच्या चाव्या आजअखेर पर्यंत देत आले आहेत. 47 हजाराच्यावर सभासद असलेल्या या कारखान्यात अनेकवेळा अनेकांनी सभासद हा कृष्णेचा मालक आहे. अशा आरोळया ठोकल्या आहेत. 1989 ते 2010 पर्यंत कृष्णाकाठी अनेक वाद-विवाद झाले आहेत. ते वाद-विवाद न्यायालयीन प्रक्रिये पासून ते लाठयाकाठयापर्यंत झाले आहेत. कृष्णा कारखाना हा अनेक संस्था उभा करणारा कारखाना आहे. कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांचे संसार चालले जातात. यामुळेच कृष्णेत कालच्या निवडणूकीपर्यंत सत्तांतराचा खेळ सुरू होता. या सत्तांतराच्या खेळाला 1994 नंतर पुन्हा एकदा सभासदांनी मुठमाती देत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या कार्याला साथ देत सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडेच दिल्या. हे करत असताना सभासदांनी जो विश्वास व्यक्त केला तो मोठ्या प्रमाणात आहे. असे बहुमत आणि मताधिक्याचा फरक यापूर्वी कृष्णेच्या निवडणूकीत कधीच कोणत्या पॅनेलला दिला नव्हता.


कृष्णेची निवडणूक कोरोना महामारीच्या सावटाखाली पार पडली. ही निवडणूक काही दिवस दुरंगी-तिरंगी चर्चेत अडकली. दुरंगीसाठी प्रयत्न करणारे पृथ्वीराजबाबा यांनी चर्चेच्या फैरी झडवल्या. या चर्चेत रयत पॅनेल आणि संस्थापक पॅनेलचे नेते गुंतले. त्यांच्याबरोबरच पहिल्यांदाच चर्चेत राज्याचे राज्य सहकार मंत्री विश्वजित कदम आणि विलासराव उंडाळकरांचे सुपुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील सहभागी होते. रयत पॅनेलचे डॉ. इंद्रजित मोहिते आणि संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते हे ही सहभागी राहिले. उमेदवारी अर्ज भरावयास सुरूवात झाली तरी चर्चेचे गुराळ संपत नव्हते. अखेर हे जुळत नाही हे लक्षात आल्यानंतर पृथ्वीराजबाबांनी आपली एग्झिट करत आपण चर्चेतून बाहेर जात आहे. असे सांगून कराड सोडले आणि मुंबईत तळ ठोकला. व्हायचे ते झाले. कृष्णेत तीन पॅनेल उभी राहिली. मोठया सभा घेता येत नव्हत्या. संपर्क अभियात तोकडे होते. अशात धावपळ सुरू झाली. कालखंड कमी आणि सोंगे जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या निवडणूकीत काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेसचे अर्धे कार्यकर्ते डॉ. इंद्रजित मोहितेंच्या पाठीशी तर अर्धे अविनाश मोहितेंच्या पाठीशी. दक्षिणेतला स्व. विलासकाकांचा प्रभाव यापूर्वीच्या निवडणूकात सातत्याने होता. तसाच प्रभाव आपणही दाखवू शकतो अस कयास करून उदयदादांनी अविनाश मोहितेंच्या बरोबर जाणे पसंत केले. तर विश्वजित कदम डॉ. इंद्रजित मोहितेंच्या पाठीशी राहिले. 50 वर्षापूर्वी जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते भाऊंनी आपल्या कुटुंबीयाला मदत केली. एवढेच लक्षात ठेवून विश्वजित कदमांनी निवडणूकीत जय-पराजय न पाहता सामोरे जायचा निर्णय घेतला. इंद्रजित मोहितेंच्या पेक्षा एक पाऊल पुढे ठेवत प्रचारात सहभागी झाले. तर उदयदादाही तेवढयाच तोलामोलाने फिरू लागले. प्रचाराचा धुरळा उडाला होता. कृष्णाकाठी चर्चा रंगू लागल्या होत्या. निवडणूकीत काय होणार यावर गावच्या पारावर चर्चा रंगत होत्या. जो ज्याचा समर्थक, तो आपले गणिते मांडत होता. गणितात या तालुक्यातील लोक फार हुशार मात्र, बांधावर असलेला शेतकरी सभासद नेमके काय करणार हे ज्याला समजले तोच यशाचा मानकरी ठरतो. गावातल्या चर्चेत बरेच घडते पण मातीत राबणारा शेतकरी जे ठरवतो तेच उगवते हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.


कृष्णेच्या निवडणूकीत कृष्णाकाठी नेत्यांच्या नावाचा बोलबाला झाला. याला अनेकांनी साद घातली. मात्र कृष्णेचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची छबी सर्व निवडणूकीत भारी पडली. सोजवळ व्यक्तीमत्त्व, संयम आणि शांत स्वभाव अशी असलेली प्रतिमा जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेतृत्व करत होते. त्यांच्या नेतृत्वावर कृष्णेतील सभासदांनी विश्वास दाखवत सहकार पॅनेलला 11 हजाराच्या फरकाने सत्तेवर बसविले. डॉ. सुरेश भोसले हे त्यांचे पिताश्री जयवंतराव भोसले यांच्या नंतर सर्वाधिक काळ चेअरमन म्हणून काम करण्यास पात्र आहेत असा विश्वासच सभासदांनी व्यक्त केला. त्यांचा कालखंडही आप्पांच्या नंतर मोठा ठरणारा आहे. हे करत असताना कृष्णेत वारंवार सत्तांतर करून लोकांचे, शेतकर्‍यांचे आणि सभासदांचे हाल होत आहेत. नोकरदारांवर सातत्याने अन्याय झाला आहे. हे सर्व बंद करायचे असेल तर आपण एकहाती आणि कारखान्याचे भले करू शकणार्‍या सुरेशबाबांच्या पाठीशी उभे राहूया, सत्तांतराचा खेळ थांबवूया असाच निर्णय या निकालातून कृष्णेच्या सभासदांनी ठरविला असावा. कारण, विरोधातील दोन्हीही पॅनेलची बेरीज केली तरी, ते सत्ताधारी सहकार पॅनेलच्या आसपासही पोहोचत नाहीत. अस ऐतिहासिक निर्णय सभासदांनी घेतला आहे. गेल्या सहा वर्षाच्या कारभारावर उस उत्पादक शेतकरी सभासद समाधानी आहे. कारखान्यातील सर्व कर्मचारी समाधानी आहेत. असेच या निकलातून सिद्ध होत आहे. भविष्यात या कारखान्याची प्रगती डॉ. सुरेशबाबाच करू शकतात असेही सर्वांना वाटले असावे. म्हणूनच लोकशाही पद्धतीने पण मोठया फरकाने सुरेशबाबांच्या हाती कारखान्याची सत्ता दिली आहे. ही सत्ता राबवताना त्यांनीही उस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानत काम करावे आणि मलीन झालेल्या कृष्णेची प्रतिमा राज्यात एक नंबरवर नेवून सहकार चळवळीत आपल्या कार्याचा दबदबा निर्माण करावा. या निवडणूकीच्या निकालात कृष्णाकाठी बोलबाला अनेकांचा झाला असला तरी सर्वांना डॉ. सुरेशबाबा भोसले हेच भारी ठरले..!