काँग्रेस ‘आऊट’ राष्ट्रवादी ‘इन’

कृष्णेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी दोन राष्ट्रवादीचे नेते सहभागी

काँग्रेस ‘आऊट’ राष्ट्रवादी ‘इन’

काँग्रेस ‘आऊट’ राष्ट्रवादी ‘इन’


कृष्णेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी दोन राष्ट्रवादीचे नेते सहभागी


कराड/प्रतिनिधी :


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून तिनही पॅनेल प्रमुख प्रचार यंत्रणेत मग्न झाले आहेत. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन मोहित्यांच्या एकीकरणाच्या शर्यतीतून मी बाहेर असे जाहिर केल्यानंतर कृष्णेच्या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. काँग्रेस ऑऊट आणि राष्ट्रवादी इन अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन नेते आणि संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्यात कमराबंद चर्चा झाली असल्याची खात्रीदायक माहिती हाती आली आहे.


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर होण्यापुर्वीच माजी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम आणि अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेऊन रयत पॅनेलचे नेते कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व संस्थापक पॅनेलचे नेते माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यात एकीकरण व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केले. चर्चेच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. खरेतर डॉ. इंद्रजित बाबा हे काँग्रेसच्या विचाराचे आणि आज अखेर काँग्रेस बरोबर राहिलेले नेतृत्व तर अविनाश मोहिते हे राष्ट्रवादीचे सरचिटणीस अशा या दोन नेत्यांना एकत्रित आणताना काँग्रेसचे नेते प्रयत्न करत होते. मात्र जिल्ह्यावर जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही राष्ट्रवादीचा एकही नेता या चर्चेत सहभागी नव्हता. राष्ट्रवादीचे नेते वेट अ‍ॅन्ड वॉचच्या पवित्र्यात होते.


कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड दक्षिण आणि वाळवा तालुक्या बरोबर कडेगाव व शिराळा आणि कराड उत्तर असे असले तरी कृष्णेची बहुतांश सभासद हे कराड दक्षिण आणि वाळवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. वाळवा तालुक्याचे नेते आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर सातारचे पालकमंत्री हे कराडचे आहेत. त्यामुळे हे दोन नेते अविनाश मोहितेंच्या कडून चर्चेत येतील आणि कृष्णेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बनेल याची धडकी कारखान्याचे विद्यमान चेअरमन यांना होती. कारण ते भाजपवासीय आहेत. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही.


काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेच्या निवडणुकीत इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांनी आपले मतभेद बाजुला ठेऊन आपला प्रचार केला हे लक्षात घेऊन ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीत एकत्रित आले त्याचप्रकारे कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र यावे आणि शेतकरी सभासदांना त्याचा फायदा व्हावा असा प्रयत्न केला. चर्चेच्या बैठकामधून मार्ग निघण्याची शक्यता वाटत असतानाच अचानक या दोन नेत्यांच्यात एकमत होताना दिसत नव्हते म्हणून पृथ्वीराजबाबांनी मी चर्चेपासून बाहेर जात असल्याचे जाहिर करताना पुढे काय होईल मला माहित नाही असेही स्पष्ट केले.


त्यांनी घोषणा केली आणि रयत व संस्थापक पॅनलचे नेते आत आपल्या प्रचारात मग्न झाले. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनीही आपल्या जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचाराला प्रारंभ केला व ते जाहिर सभांमधून या दोनही नेत्यांच्यावर टिका करु लागले. हे मनोमिलन नव्हे तर मनी मीलन आहे असा थेट हल्ला त्यांनी केला. तर डॉ. अतुल भोसले यांनीही टिका करताना बड्या नेत्याने हात काढून घेतले. कारखान्याचा कारभार डॉ. सुरेश भोसले यांनी पारदर्शकपणे केला आहे. म्हणून हतबल झालेले दोन माजी अध्यक्ष सैरबैर झाले आहेत असा हल्ला केला.


काँग्रेस दोन मोहितेंच्या एकीकरणातून बाहेर पडल्यानंतर कृष्णेच्या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आणि सातारा जिल्ह्यातील दोन राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते यांच्याशी चर्चा करुन या निवडणुकीत आपणांला काय भुमिका बजावता येते याची चाचपणी करु लागले आहे. अद्याप या नेत्यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्याशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे हे नेते संस्थापक पॅनेलला जी जी मदत करता येईल ती तयारी दर्शवित आहेत. अद्यापही ते पडद्याआडून राजकिय डावपेच आखत आहेत. काल शरद पवार यांच्या निवासस्थानी कृषि धोरणाबाबत राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री व सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची बैठक सिल्वर ओक येथे पार पडली आणि बैठकीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसव्हा शरद पवार यांनी विश्वजीत कदम यांच्याशी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात घडत असलेल्या घडामोडीची माहिती घेतली असल्याचे समजते. या दोन नेत्यांमध्ये या निवडणुकीवर चर्चा झाली असून आज उद्या विश्वजित कदम हे कराड येथे येऊन डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या प्रचारार्थ मग्न होणार आहेत. अशी माहिती हाती आली आहे. यामुळे काँग्रेस आऊट आणि राष्ट्रवादी इन अशी परिस्थिती झाली आहे.


दुसरीकडे दक्षिणेतील युवा नेत अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी आपल्या समर्थकांची बैठक कोयना संघावर बोलावून मते जाणून घेतली आहेत. त्यांच्यापुढे आगामी होऊ घातलेल्या शेती उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा गंभीर प्रश्न असून कार्यकर्त्यांनी अविनाश मोहितें बरोबर जाण्याचा आवळलेला सूर आणि काँग्रेसबरोबर राहण्याची इच्छा अशा तिहेरी कात्रीत उदयदादा अडकले असून पृथ्वीराज चव्हाण सध्या मुंबईत असल्याने त्यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय उदयसिंह पाटील कुठलाही निर्णय जाहिर करणार नाहीत. कारखान्याच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 17 जून ही तारीख आहे. त्याआधी पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये येथील आणि या दोघांच्यात निर्णय होईल त्यानंतरच उदयसिंह पाटील आपली भुमिका स्पष्ट करु शकतात यासाठी काही कालावधी जाणार आहे. यामुळे कारखान्याच्या या निवडणुकीत कोणत्याही नाट्यमय घडामोडी घडू शकतात अशी चर्चाही कृष्णाकाठी सुरु आहे.