‘कृष्णा’च्या आईसाहेब हरपल्या!

सहकार, सामाजिक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले (वय ८९) यांचे सोमवारी १ रोजी रात्री ११.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कृष्णा परिवाराच्या ‘आईसाहेब’ हरपल्या असून कृष्णाकाठच्या परिसरात शोककळा पसरली आहे.

‘कृष्णा’च्या आईसाहेब हरपल्या!

‘कृष्णा’च्या आईसाहेब हरपल्या! 

श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन; कृष्णाकाठच्या परिसरात शोककळा 

कराड/प्रतिनिधी :

     सहकार, सामाजिक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले (वय ८९) यांचे सोमवारी १ रोजी रात्री ११.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कृष्णा परिवाराच्या आईसाहेब’ हरपल्या असून कृष्णाकाठच्या परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मंगळवारी २ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास के.सी.टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

      कोल्हापूरातील कर्नल नानासाहेब दत्ताजीराव इंगळे यांच्या कन्या असलेल्या जयमाला यांचा जन्म १३ डिसेंबर १९३२ रोजी झाला. हायर सेकंडरीपर्यंत शिक्षण घेतल्यावर १९ मे १९५२ रोजी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर जयमाला भोसले (आईसाहेब) यांनी आप्पासाहेबांच्या प्रत्येक कार्याला पाठबळ देत, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलली. या भागात समृद्धी नांदावी यासाठी आप्पासाहेब कृष्णा कारखान्यासह अन्य सहकारी संस्थांच्या उभारणीत तसेच सार्वजनिक कार्यात सतत व्यस्त असत. अशावेळी एक गृहिणी म्हणून कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी पेलली. कौटुंबिक जबाबदारी जपतानाच आपल्या २ मुलांचे आणि २ मुलींचे संगोपन व पालनपोषण समर्थपणे केले. याचवेळी त्यांनी आप्पासाहेबांच्या शैक्षणिक कार्यात सक्रीय सहभाग घेत, शैक्षणिक कामामध्ये प्रत्यक्ष योगदान दिले. कृष्णा हॉस्पिटलसह कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूल, कृष्णा विद्यापीठ या संस्थांच्या वाटचालीत कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त या नात्याने त्यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. किंबहुना आप्पासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाबरोबरच आप्पासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कृष्णाकाठच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला मायेची सावली दिली.

     श्रीमती जयमाला भोसले (आईसाहेब) गेले काही दिवस आजारी होत्या. सोमवारी १ रोजी रात्री ११.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कृष्णा परिवाराच्या आईसाहेब हरपल्या असून कृष्णाकाठच्या परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मंगळवारी २ रोजी दुपारी १२ च्या सुमारास के.सी.टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.

     त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. सुरेश भोसले, श्री. पृथ्वीराज भोसले, मुलगी सौ. उज्वला घाटगे, पद्मजा शिर्के, सून सौ. उत्तरा भोसले, सौ. वसुंधरा भोसले, जावई श्री. राजेंद्रसिंह घाटगे, नातू डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, डॉ. जयवर्धन भोसले, नातसून सौ. गौरवी भोसले असा मोठा परिवार आहे.

     दरम्यान, सकाळी १०.३० ते १२ या वेळेत कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात स्व. जयमाला भोसले यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याठिकाणी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते, सिद्धार्थ घाटगे, ऋतुराज इंगळे, विजय शिर्के, यशवर्धन देशमुख, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, सारंग पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, संजय पाटील, गुणवंतराव पाटील, धोंडीराम जाधव, वसंतराव शिंदे, जितेंद्र पाटील, बाबासो शिंदे, जे. डी. मोरे, शिवरुपराजे खर्डेकर, बाजीराव निकम, अविनाश खरात, निवासराव थोरात, सयाजी यादव, माजी सभापती रवींद्र बर्डे, भगवानराव पाटील, संदीप पाटील, ड. बी. डी. पाटील, ब्रह्मानंद पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पृथ्वीराज देशमुख, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, दादा शिंगण, आर. टी. स्वामी, सचिन पाचुपते, धैर्यशील मोरे, विलास पाटील, बाळासाहेब चोरेकर, शेतकरी संघटनेचे देवानंद पाटील, रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा कापूरकर, दीपक जाधव, व्ही. टी. पाटील, रणजित लाड, एस. व्ही. पाटील, संग्राम पाटील, शेतीमित्र अशोकराव थोरात, राजेश पाटील-वाठारकर, पैलवान आप्पासो कदम, प्रमोद पाटील, उमेश शिंदे, नगरसेवक दिनेश रैनाक, व्ही. के मोहिते, मोहनराव जाधव, मनोज पाटील, वैभव जाखले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, माजी नगराध्यक्ष आबा गावडे, राजू मुल्ला, नेताजीराव पाटील, एम. के. कापूरकर, बाळासाहेब निकम, शिवाजीराव थोरात, डॉ. परेश पाटील, जे. के. जाधव, अक्षय सुर्वे, रविराज जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून आदरांजली वाहिली. त्यानंतर श्रीमती जयमाला भोसले यांचे पार्थिव अंत्ययात्रेने केसीटी कृष्णा स्कूलच्या पांगणात नेण्यात आले व तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

स्व. जयमाला जयवंतराव भोसले (आईसाहेब) यांचा रक्षाविसर्जन विधी बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता कोयना वसाहतीतील केसीटी कृष्णा स्कूलच्या प्रांगणात होणार आहे. 

 

पंचगंगेकाठी जे धन उपजलं; ते कृष्णाकाठी फुललं.. 

श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे माहेर कोल्हापूर; तर सासर कराड.. याचा संदर्भ देत आपल्या आदरांजलीपर भाषणात खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, की पंचगंगेकाठी जे धन उपजलं; ते कृष्णाकाठी फुललं. लहान असल्यापासून दर दिवाळीला मी भाऊ-आप्पांचा आणि आईसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असे. त्यावेळी त्यांच्याशी चांगल्या कौटुंबिक गप्पा होत. येत्या २ दिवसांत दिवाळी असल्याने यंदाही त्यांच्या घरी जाण्याचा विचार होता. पण आईसाहेबांच्या अकाली निधनाने येथून पुढे मात्र त्यांची भेट होऊ शकणार नाही. त्यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे भावोद्गार खासदार पाटील यांनी काढले.