महाआघाडी सरकार पत्रकारांसाठी सकारात्मक - ना. शंभूराज देसाई

पत्रकारांनी अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन आदी. आपत्तीसह कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून काम केले. परंतू, राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत असून दोन वर्षात त्यासंबंधीचे कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत. पत्रकारांच्या विविध अडीअडचणी, समस्या सोडवण्यासाठी राज्य पत्रकार संघटना प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील असून महाआघाडी सरकार हे पत्रकारांसाठी सकारात्मक आहे.

महाआघाडी सरकार पत्रकारांसाठी सकारात्मक - ना. शंभूराज देसाई
कराड : शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई.

महाआघाडी सरकार पत्रकारांसाठी सकारात्मक

ना. शंभूराज देसाई : पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील 

कराड/प्रतिनिधी : 

         पत्रकारांनी अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन आदी. आपत्तीसह कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून काम केले. परंतू, राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत असून दोन वर्षात त्यासंबंधीचे कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत. पत्रकारांच्या विविध अडीअडचणी, समस्या सोडवण्यासाठी राज्य पत्रकार संघटना प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील असून महाआघाडी सरकार हे पत्रकारांसाठी सकारात्मक असल्याचे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. 

         येथील शासकीय विश्रामगृहात नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवारी 9 रोजी आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कराड शहर, परिसरासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. 

        ना. शंभूराज देसाई म्हणाले, पत्रकार दिनाच्या औचित्याने साताऱ्यात नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी, राज्य पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकारांना अधिस्वीकृतीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात, पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे, तसेच त्यांची फ्रंटलाईन वर्कर म्हणून गणना करावी, आदी. मागण्या केल्या. या गोष्टी जरी माझ्या अखत्यारीत येत नसल्या तरी, मंत्रिमंडळाची संयुक्तिक जबाबदारी म्हणून त्या खात्याच्या राज्यमंत्री आदितीताई तटकरे आणि माहिती जनसंपर्क महासंचालक यांच्याशी बैठक लावून पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी काय-काय करता येईल, यावर चर्चा करू. तसेच जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रेझेंटेशनमधील पर्यायानुसार एक चांगला प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

        ते म्हणाले, राज्यातील कोणत्याही विभागात पत्रकारांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्यास एस. एम. देशमुख आणि किरण नाईक हे तात्काळ त्याबाबतची माहिती देतात. त्यानुसार घटनेची वस्तुस्थिती पाहून अनेकदा कडक कारवायाही करण्यात आल्या आहे. पत्रकारांनी गुंडगिरी, अवैद्य धंदे, गैरकारभाराबाबत आवाज उठवल्यास त्यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण यासह त्यांच्यावर जीवघेणे हल्लेही होतात. यावर पोलिसांसह गृहखात्याचेही लक्ष असले पाहिजे. माझ्याकडे गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी आल्यापासून दोन वर्षात त्यासंबंधीचे कायदे अधिक कडक करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

        तसेच कोरोनाकाळात अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला. राज्य सरकारने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पत्रकार सहाय्य योजना सुरु केली असून यावर्षी त्यामध्ये १० कोटींची जादा मदत करण्यात आली आहे. अर्थात, ही मदत पुरेशी नसून पत्रकारांसाठी अधिकची मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून महाआघाडी सरकार पत्रकारांचे विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचा पुनोरुचारही ना. शंभूराज देसाई यावेळी केला.