महापुर-राजकारण नको - फडणवीस

महापुर-राजकारण नको - फडणवीस


सांगली / प्रतिनिधी
महापुरासारखी गंभीर परिस्थिती ओढवली आहे. सरकार तेथील नागरिकांना मदत करण्यास प्राधान्य देत आहे. अशावेळी विरोधी पक्षांनी या महापुराचे राजकारण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. विरोधकांनी आमच्या चुका जरुर दाखवून द्याव्यात. सध्याची त्यांची वागणूक पाहता मला जास्त काही बोलायचे नाही कारण शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे नागरिकांना मदतीचा हात देण्यामध्ये आपत्ती यंत्रणांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापुराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सांगलीत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, महावितरणच्या संचालिका नीता केळकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील काही वर्षांत पडलेल्या पावसाचा अभ्यास केल्यास सध्या तीन महिन्यांचा पाऊस आठ दिवसात पडत असल्याचे लक्षात येईल. २००५ साली जो पाऊस पडला त्यापेक्षा तिप्पट पाऊस यंदा पडला आहे. त्यामुळे शंभर वर्षाचे पावसाचे रेकॉर्ड तुटले आहे. आजघडीला जेथे महापूराचे पाणी आले आहे ते गृहीत धरुन नव्याने पूरनियंत्रण रेषेचा आराखडा तयार करावा लागेल. तसे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. यासाठी जो निधी लागेल तो शासनातर्फे देण्यात येणार आहे. अद्यापही जगात कोठेही प्रतिवर्षी नेमका किती पाऊस पडणार याबाबतची माहिती देण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. परिणामी आपत्ती व्यवस्थापनाचा देखील अंदाज चुकत आहे. यापूर्वी जेव्हा महापूर आलेला होता त्या आधारावर दहा ते पंधरा टक्के अधिक पूर येऊ शकतो. हे गृहीत धरुन प्रशासन तयारी करीत असते. मात्र तो अंदाजही यावेळी चुकला आहे.
ब्रह्मनाळ येथे झालेली दुर्घटना दुर्दैवी असून तेथेही तहसील कार्यालय अपयशी ठरले का, याची माहिती मागविण्यात आलेली आहे. महापूरात मदत देण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडले आहे का, याचीही मी स्वत: चौकशी करणार आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार करण्यात येणार आहे. कर्नाटक शासनाचे महाराष्टÑाला चांगले सहकार्य असून त्यांनी त्यांच्या राज्यात पूरपरिस्थिचा धोका पत्करुन सध्या पाच लाख तीन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ठेवला आहे. त्यामुळे कृष्णेची पातळी उतरण्यास प्रारंभ झाला आहे. नजीकच्या ४७ तासात पाणीपातळी निश्चितपणे कमी होईल.
महापूरास कृष्णा, कोयना आणि पंचगंगा या नद्यांना आलेला पूर देखील कारणीभूत आहे. शिवाय कोयना धरणक्षेत्रात केवळ नऊ दिवसात पन्नास टीएमसी पाण्याचा साठा होईल इतका पाऊस पडला आहे. साहजिकच कोयना धरणातून पुढे पाणी सोडणे भाग होते. हा मुद्दा देखील लक्षात घेतला पाहिजे. नजीकच्या काळात तातडीने पूरग्रस्तांना सर्वाेपरी मदत देण्यास प्राथमिकता दिली असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.