महाराणी येसूबाई आणि सातारा राजधानी 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यात महत्वाची कामगिरी बजावली होती. छत्रपती संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्याची राजधानी रायगडला बादशहा औरंगजेबाने वेढा दिला.त्यावेळी महाराणी येसूबाई यांनी खचून न जाता १० महिने रायगड लढवला. परंतु सुटकेचा दुसरा मार्ग नसल्याने महाराणी येसूबाई व संभाजीपुत्र शाहू हे औरंगजेबाच्या सैन्याच्या हवाली झाल्या. त्यांना औरंगजेबाच्या छावणीत तब्बल २९ वर्षे राहावे लागले. चौथाईचा करार झाल्यानंतर येसुबाईंची सुटका होऊन त्या दि. ४ जुलै १७१९ रोजी राजधानी सातारा येथे आल्या. महाराणी येसुबाईंच्या आगमनाला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत.   

     महाराणी येसूबाई आणि सातारा राजधानी 
महाराणी येसूबाई

     
      कृष्णाकाठ : अशोक सुतार 

         धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यात महत्वाची कामगिरी बजावली होती. छत्रपती संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्याची राजधानी रायगडला बादशहा औरंगजेबाने वेढा दिला.त्यावेळी महाराणी येसूबाई यांनी खचून न जाता १० महिने रायगड लढवला. परंतु सुटकेचा दुसरा मार्ग नसल्याने महाराणी येसूबाई व संभाजीपुत्र शाहू हे औरंगजेबाच्या सैन्याच्या हवाली झाल्या. त्यांना औरंगजेबाच्या छावणीत तब्बल २९ वर्षे राहावे लागले. चौथाईचा करार झाल्यानंतर येसुबाईंची सुटका होऊन त्या दि. ४ जुलै १७१९ रोजी राजधानी सातारा येथे आल्या. महाराणी येसुबाईंच्या आगमनाला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत.                                                                                        हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-जमातीच्या मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्य कारभार सुरळीत चालवला. त्यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे शूर आणि लढवय्या होते. छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक लढाया करून बादशहा औरंगजेबाला नामोहरम केले होते. त्यावेळी छत्रपती संभाजी राजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी स्वराज्याचा कारभार मुत्सद्दीपणाने सांभाळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात येसुबाईंकडे स्वराज्याच्या कुलमुखत्यार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना डावलून छत्रपती राजारामांना गादीवर बसवण्याचे षडयंत्र तत्कालीन कारभाऱ्यांनी केले. या प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांनी पन्हाळ्याहून रायगडी जाऊन स्वराज्य रक्षणासाठी राज्यकारभार ताब्यात घेतला. नंतर त्यांचा राज्याभिषेकही झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी सांभाळण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. त्यावेळी महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यातील राज्यकारभाराची जबाबदारी योग्य रीतीने हाताळली. त्या मुत्सद्दी व हुशार होत्या. छत्रपती संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्याची राजधानी रायगडला बादशहा औरंगजेबाने वेढा दिला.त्यावेळी महाराणी येसूबाई यांनी खचून न जाता १० महिने रायगड लढवला. या बिकट परिस्थितीत छत्रपती राजाराम राजेंना जिंजीला पाठवून महाराणी येसूबाई व संभाजीपुत्र शाहू यांच्यासोबत औरंगजेबाच्या सैन्याच्या हवाली झाल्या. त्यांना औरंगजेबाच्या छावणीत तब्बल २९ वर्षे राहावे लागले. या दरम्यान शाहूंची सुटका करण्यात आली होती. सय्यद हुसेन याच्या मदतीने शाहूमहाराज व बादशहा यांच्यात इ.स. १७१८ मध्ये चौथाईचा करार झाला व त्यानुसार महाराणी येसुबाईंची सुटका होऊन दि. ४ जुलै १७१९ रोजी राजधानी सातारा येथे त्यांचे आगमन झाले. आज या घटनेला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराणी येसूबाई साताऱ्याला पुत्र शाहू महाराजांसोबत राहिल्या. महाराणी येसूबाई यांचे निधन इ.स.१७३१ नंतर झाले असावे, असा इतिहासकारांचा कयास आहे. साताऱ्यात संगम माहुली येथे त्यांचा अंत्यसंस्कार झाला होता. छत्रपती शाहू महाराजांनी संगम माहुली येथे कृष्णा नदीच्या काठी वृंदावन बांधून पूजा व्यवस्थेची जबाबदारी खास लोकांकडे सोपवली होती. परंतु आज तिथे काहीही पाहायला मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. महाराणी येसुबाईंचे स्मारक होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल.                                                                                                                      महाराणी येसूबाई या मोंगलांच्या छावणीत २९ वर्षे मुत्सद्दीपणाने राहिल्या. संभाजीपुत्र शाहू यांची सुटका करण्यात आली. परंतु त्यावेळी येसूबाई व इतर सेवकांना ओलीस म्हणून दिल्लीला नेण्यात आले. येसुबाईंची कैद कायम राहिली. इकडे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी राजसत्ता ताब्यात घेतली. त्या शाहू यांना स्वराज्याचा वारस मानायला तयार नव्हत्या. शाहू महाराजांनी बादशाहशी चौथाईचा करार करून येसुबाईंची सुटका केली. त्या सातारला बाळाजी विश्वनाथ व इतर सेवकांसह दाखल झाल्या. येसूबाई आणि त्यांचे पुत्र शाहूंची भेट झाली, त्याला आज ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत येसुबाईंनी राजकीय व न्यायनिवाड्याची कामे केली. येसूबाई या मुत्सद्दी, अनुभवी व सुसंस्कृत स्वभावाच्या होत्या. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांपासून ते शाहू महाराजांच्या कारकिर्दीत सर्व प्रकारचे कल्याणकारी निर्णय घेतले. येसूबाई यांनी साताऱ्यात राहून शाहू महाराजांना राज्यकारभार करण्यात मदत केली. येसुबाईंच्या मृत्यूची निश्चित तारीख इतिहासात मिळत नाही. कोल्हापूरचे संभाजी व साताऱ्याचे शाहू महाराज यांच्यात १७३१ साली वारणेचा तह झाला होता. त्यानंतर येसुबाईंचा मृत्यू झाल्याचे मानण्यात येते. त्यावेळी त्या ६०-६५ वयाच्या असाव्यात.                               महाराणी येसूबाई यांचे माहेर कोकणातील असले तरी रायगड, पन्हाळा, सातारा येथे त्यांचे वास्तव्य झाले. त्या आयुष्यातील २९ वर्षे मोंगलांच्या छावणीत राहिल्या. तिथे त्या निश्चल, सावधानता बाळगून राहिल्या. येसूबाई या घोड्यावरून रपेट करायच्या, युद्धशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांचा स्वभाव निश्चयी होता, त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्याचे कुलमुखत्यार पद दिले होते. महाराणी येसूबाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांनी संगम माहुली येथे कृष्णा नदीकाठी त्यांचे अंत्यसंस्कार केले. त्या जागेवर वृंदावन उभारले. परंतु शोकांतिका ही की आज हे वृंदावन अथवा स्मारक संगम माहुली येथे पाहायला मिळत नाही. स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांसोबत महत्वाचे कार्य करणाऱ्या महाराणी येसूबाई यांचे यथोचित स्मारक होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.