महिला साक्षरता लोकसंख्या स्थिरतेसाठी रामबाण उपाय - आ. पृथ्वीराज चव्हाण

महिला साक्षरता लोकसंख्या स्थिरतेसाठी रामबाण उपाय - आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधीः 

                          लोकप्रतिनिधीत्व करत असताना नवभारत निर्मितीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या युवकांच्या मनात काय आहे, हे जाणण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी युवा संवाद या कार्यक्रमाचा सिलसिला प्रथमच कराडमध्ये सुरु केला. सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय व शिक्षणमहर्षि बापूजी साळुंखे महाविद्यालयातील युवक-युवतींशी संवाद साधल्यानंतर त्यांचा हा संवादाचा सिलसिला आज (शुक्रवारी) कराडच्या महिला महाविद्यालयात पोहचला. आ. चव्हाण हे उद्याचा भारत कसा असावा, यासाठी युवा संवाद साधत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महिला महाविद्यालयात आज कार्यक्रम झाला. 

                          यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, प्राचार्या स्नेहल प्रभुणे, उपप्राचार्य, विद्यार्थी प्रतिनिधी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी आ. चव्हाण यांनी आपल्या आयुष्याचे विविधांगी पैलू उलगडत युवतींशी स्थानिक पातळीपासून देश व जागतिक पातळीपर्यंतच्या घडामोडींविषयी संवाद साधला. 

                        ते म्हणाले, भारताची मोठी शक्ती म्हणजे युवाशक्ती आहे. आपल्या देशातील लोकसंख्या स्थिरतेसाठी महिला साक्षरता हा रामबाण उपाय आहे. शिक्षण व सबलीकरण हे आपल्या महिला कॉलेजचे ब्रीदवाक्य युवतींसाठी महत्वाचे आहे. राज्यघटनेने भारतातील प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत. दरडोई उत्पन्न वाढले तरच देशाचा आर्थिक विकासदर सुधारेल. आपल्या देशातील जनतेचे वार्षिक दरडोई उत्पन्न १९१३ डॉलर आहे. ते आपल्याला किमान ९.५ हजार डॉलर दरडोई उत्पन्न करता आले तर देशात योग्य विकास साधता येऊ शकतो. आपल्या देशातील दरडोई उत्पन्न सिंगापूर व चीनच्या तुलनेत खूपच कमी आहे. ते वाढवण्यासाठी आपला अर्थिक विकास दर सुधारला पाहिजे. विकासदर किती आहे, यावरुन देशाची परिस्थिती समजते. आपल्या देशाचा असणारा विकासदर पाच टक्के आहे. हा गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी विकासदर आहे. 

                        आज देशात जी आर्थिक मंदी आहे त्याचा परिणाम रोजगारावर होत आहे. सेवा क्षेत्र व निर्मिती क्षेत्रातील मंदीचा परिणामही रोजगारावर होत आहे. मुलगा व मुलगी हे दोन्हीही समाजाचे महत्वाचे घटक आहेत. असे सांगून आ. चव्हाण यांनी यावेळी युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरे दिली. पक्षांतरामुळे भारतातील लोकशाही टिकेल का या प्रश्नावर ते म्हणाले, आपली संसदीय प्रतिनिधीक पध्दती आहे. सद्याच्या सरकारचे विरोधी पक्ष संपवायचे काम सुरु आहे. हिटलरने खुर्चीत बसून कशी त्या देशात हुकूमशाही केली. बहुपक्षीय लोकशाही ही लोकशाही टिकवण्यासाठी आहे. नेत्यांनी जरी पक्षांतर केले असले, तरी जनता त्यांच्या मागे गेलेली नाही. निवडणूकीत पक्ष व उमेदवार आश्वासने देतात पण पुढील पाच वर्षात ते काहीच करत नाहीत. या प्रश्नावर ते म्हणाले, मी या विभागात कारखाना आणायचा प्रयत्न केला पण जमीनी देण्यासाठी लोकांनी विरोध केला.

                       शिक्षणाची सद्यस्थिती सुधारण्यासाठी काय उपाययोजना असाव्यात या प्रश्नावर ते म्हणाले, एकूण अर्थव्यवस्थेतील 6 टक्के खर्च शिक्षणावर केला पाहिजे. असा कोठारी समितीचा अहवाल मान्य करायला काय हरकत आहे. राज्याचा विकास करायचा सोडून सरकारने बुलेट ट्रेनला प्राधान्य दिले आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, आज आपल्याला रस्त्यातील खड्डे भरता येत नाहीत. व हे सरकार बुलेट ट्रेन आणत आहेत. हा खरंच विरोधाभास आहे. आपल्या देशातील दरडोई उत्पन्न 20 ते 30 हजार असते तर बुलेट ट्रेनचा निश्चित विचार करु शकतो. वाढत्या गुंडगिरीवरील नियंत्रणासाठी काय करु शकतो. या प्रश्नावर ते म्हणाले, झुंडशाहीविरुध्द कायदा करण्याची गरज असावी का याचा विचार करणे गरजेचे वाटते. राजकारणात चांगली माणसे पाहिजेत हे जरी महत्वाचे असले, तरी आपला उद्योग बघून राजकारण व समाजकारणात आले पाहिजे. असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कराडच्या विकासासाठी काय योजना आहे. यावर ते म्हणाले, कराड जिल्हा व्हावा, हे आमचे स्वप्न आहे. यासाठी कराडात प्रशासकीय इमारती आणल्या असल्याचे त्यांनी सांगितले.