माळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील - खास.मंडलिक

माळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील - खास.मंडलिक

कोल्हापूर /प्रतिनिधी:-

टेकवाडी, ता.गगनबावडा हे गाव पुराच्या पाण्याने वेढले होते.  यागावचा संपर्कपुर्णपणे तुटला होता.  स्थानिक नागरीकांनी गावचे पुनर्वसन व्हावे, याकरीता गाव बंद पाळून ग्रामस्थांनी निषेध नोंदविल्याने काल खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या गगनबावडा, पन्हाळा तालुक्याच्या दौऱ्यात टेकवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना माळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे लवकरच पुनर्वसन बाबत शासन दरबारी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. 
            दरम्यान, काल पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील बाजारभोगाव, मल्हारपेठ, गोटे, टेकवाडी, तांदूळवाडी, आकूर्डे, सुळे, वाघूर्डे, आसगाव आदी गावातील पूरग्रस्त नागरीकांना भेट दिली असून यापुर्वी राधानगरी, चंदगड, करवीर, गडहिंग्लज, तालुक्यातील पूरबाधीत नागरीकांनाही भेटी दिल्या आहे.  काही गावात पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरल्याने बहुतांशी नागरीकांची घरे व त्यातील जीवनावश्यक साहित्य, शैक्षणिक कागदपत्रांचे पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  पशुधन आणि इतर प्राणी या पुरामध्ये मृत पावले आहेत.  बाजारभोगाव येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून ज्यांचे विमा नसतील अशा व्यापाऱ्यांनाही शासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी, याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविल्याचे खास.मंडलिक यांनी यावेळी सांगितले. 
            खास.मंडलिक यांचे पूरग्रस्तांसाठीचे मदत कार्यालय स्टेशन रोडवर, रेल्वे स्टेशनच्या समोरच असून याठिकाणाहून पूरग्रस्तांसाठी लागणारे धान्य, तसेच दैनंदीन उपयोगाचे साहित्य - पँकींग करुन ज्या-त्या गावांना पाठवले जाते.  मदत केंद्राव्दारे आवश्यक असलेल्या ठिकाणी  रक्तदान व आरोग्य शिबीर घेवून त्यांना लागणारे औषधोपचार दिले जात आहेत.  स्थलांतरीत कुटूंबीयांना दररोजचे जेवण व नाष्टा मिळावा या हेतूने हॅाटेल रजत येथे सेंटर किचन करुन दररोज तीन हजार नागरीकांना दहा दिवस सकस जेवण व नाष्टा पुरविण्यात आला होता.  जनावरांना लागणारा चारा मदतकेंद्राव्दारे मागणीनुसार पुरविला असल्याचेही त्यांनी सांगितले.