मलकापूरात युवकावर अंदाधुंद गोळीबार करून खून

मलकापूरात युवकावर अंदाधुंद गोळीबार करून खून

टोळीयुद्ध व वर्चस्व वादातून खून झाल्याचा संशय : मलकापूरसह कराड शहरात तणावाचे वातावरण 

कराड/प्रतिनिधी : 
                        आगाशिवनगर-मलकापूर येथे बुधवारी रात्री युवकाचा एका युवकाचा अज्ञातांनी गोळ्या झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. टोळीयुद्ध व वर्चस्व वादातून हा खून झाल्याची चर्चा असून या खुनामुळे आगाशिवनगर, मलकापूर, कराड शहरासह संपूर्ण परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. कराडमध्ये अल्पावधीतच दुसरा खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 
                          विकास रघुनाथ लाखे रा. मलकापूर (दांगटवस्ती) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार करून त्याचा खून केला. या घटनेमुळे मलकापूर-कराड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
                        याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री रात्री साडेनऊच्या सुमारास आगाशिवनगर येथील जँकवेल जाणाऱ्या रस्त्यावर हा खून झाला. त्यामध्ये दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी विकास रघुनाथ लाखे रा. मलकापूर (दांगटवस्ती) याच्यावर अंदाधुंद गोळीबार करून अज्ञातांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या हल्ल्यात सुमारे 11 गोळ्या लाखे  याला लागल्या असून त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
                      सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव व अन्य अधिकारी दाखल झाले. टोळीयुद्ध व वर्चस्व वादातून हा खून झाल्याची परिसरात चर्चा असून या घटनेमुळे आगाशिवनगर, मलकापूरसह कराड शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.