गणपती विसर्जनावेळी कृष्णा नदीत बुडून अनिरुद्ध मोहिते यांचा मृत्यू

गणपती विसर्जनावेळी कृष्णा नदीत बुडून अनिरुद्ध मोहिते यांचा मृत्यू

गणपती विसर्जनावेळी कृष्णा नदीत बुडून अनिरुद्ध मोहिते याचा मृत्यू 

 

कराड/प्रतिनिधी : 

                        मालखेड ता. कराड येथे गणपती विसर्जनादरम्यान कृष्णा नदीत तीन युवक बुडल्याची घटना घडली. दरम्यान, यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून त्यातील एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी 12 रोजी सायंकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अनिरुद्ध संजय मोहिते (वय 19)  रा. बेलवडे बुद्रुक ता. कराड असे या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

                      तर या घटनेतील योगेश अजित मोहिते व प्रज्वल राजेंद्र सुतार (दोघेही रा. बेलवडे बुद्रुक) यांच्यावर कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

                      याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बेलवडे बुद्रुक येथील काही युवक गणपती विसर्जनासाठी मालखेड येथे कृष्णा नदीवर गेले होते. येथील विष्णू-लक्ष्मी मंदिरा नजीकच्या कृष्णा घाटावर सायंकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जनादरम्यान यातील अनिरुद्ध संजय मोहिते, योगेश अजित मोहिते व प्रज्वल राजेंद्र सुतार हे तीघे पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर वाहत चालल्याचे अन्य युवकांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या युवकांसह मालखेड येथील स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच बेलवडे ग्रामस्थांसह कराड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

                       यातील योगेश मोहिते व प्रज्वल सुतार या दोघांना वाचवण्यात शर्थीच्या प्रयत्नांनंतर यश आले. मात्र, नदीतील जास्त पाणीपातळीमुळे अनिरुद्ध मोहिते याचा वेळीच ठाव न लागल्याने, तसेच तो प्रवाहाबरोबर खोलवर वाहत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अनिरुद्धचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, ही घटना समजताच अनिरुद्ध याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या घटनेत बचावलेले योगेश व प्रज्वल यांची प्रकृती सध्या सुस्थितीत असून त्यांच्यावर कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिरुद्धच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.